यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् । स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥ ४६॥

म्हणौनि विहित क्रिया केली । नव्हे तयाची खूण पाळिली । जयापसूनि कां आलीं । आकारा भूतें ॥ ९१४ ॥ जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जू ॥ ९१५ ॥ जेणें जग हें समस्त । आंत बाहेरी पूर्ण भरित । जालें आहे दीपजात । तेजें जैसें ॥ ९१६ ॥ तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥ ९१७ ॥ म्हणौनि तिये पूजे । रिझलेनि आत्मराजें । वैराग्यसिद्धि देईजे । पसाय तया ॥ ९१८ ॥ जिये वैराग्यदशें । ईश्वराचेनि वेधवशें । हें सर्वही नावडे जैसें । वांत होय ॥ ९१९ ॥ प्राणनाथाचिया आधी । विरहिणीतें जिणेंही बाधी । तैसें सुखजात त्रिशुद्धी । दुःखचि लागे ॥ ९२० ॥ सम्यक्‌ज्ञान नुदैजतां । वेधेंचि तन्मयता । उपजे ऐसी योग्यता । बोधाची लाहे ॥ ९२१ ॥ म्हणौनि मोक्षलाभालागीं । जो व्रतें वाहातसें आंगीं । तेणें स्वधर्मु आस्था चांगी । अनुष्ठावा ॥ ९२२ ॥

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ ४७॥

अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणीं जरी विषमु । तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ॥ ९२३ ॥ जैं सुखालागीं आपणपयां । निंबचि आथी धनंजया । तैं कडुवटपणा तयाचिया । उबगिजेना ॥ ९२४ ॥ फळणया ऐलीकडे । केळीतें पाहातां आस मोडे । ऐसी त्यजिली तरी जोडे । तैसें कें गोमटें ॥ ९२५ ॥ तेवीं स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु । तरी मोक्षसुरवाडु । अंतरला कीं ॥ ९२६ ॥ आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे । तरी जीये तें नोहे । स्नेह कुऱ्हें कीं ॥ ९२७ ॥ येरी जिया पराविया । रंभेहुनि बरविया । तिया काय कराविया । बाळकें तेणें ? ॥ ९२८ ॥ अगा पाणियाहूनि बहुवें । तुपीं गुण कीर आहे । परी मीना काय होये । असणें तेथ ॥ ९२९ ॥ पैं आघविया जगा जें विख । तें विख किडियाचें पीयूख । आणि जगा गूळ तें देख । मरण तया ॥ ९३० ॥ म्हणौनि जे विहित जया जेणें । फिटे संसाराचें धरणें । क्रिया कठोर तऱ्ही तेणें । तेचि करावी ॥ ९३१ ॥ येरा पराचारा बरविया । ऐसें होईल टेंकलया । पायांचें चालणें डोइया । केलें जैसें ॥ ९३२ ॥ यालागीं कर्म आपुले । जें जातिस्वभावें असे आलें । तें करी तेणें जिंतिलें । कर्मबंधातें ॥ ९३३ ॥ आणि स्वधर्मुचि पाळावा । परधर्मु तो गाळावा । हा नेमुही पांडवा । न कीजेचि पै गा ? ॥ ९३४ ॥ तरी आत्मा दृष्ट नोहे । तंव कर्म करणें कां ठाये ? । आणि करणें तेथ आहे । आयासु आधीं ॥ ९३५ ॥

सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् । सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ ४८॥

म्हणौनि भलतिये कर्मीं । आयासु जऱ्ही उपक्रमीं । तरी काय स्वधर्मीं । दोषु । सांगें ? ॥ ९३६ ॥ आगा उजू वाटा चालावें । तऱ्ही पायचि शिणवावे । ना आडरानें धांवावें । तऱ्ही तेंचि ॥ ९३७ ॥ पैं शिळा कां सिदोरिया । दाटणें एक धनंजया । परी जें वाहतां विसांवया । मिळिजे तें घेपे ॥ ९३८ ॥ येऱ्हवीं कणा आणि भूसा । कांडितांही सोसु सरिसा । जेंचि रंधन श्वान मांसा । तेंचि हवी ॥ ९३९ ॥ दधी जळाचिया घुसळणा । व्यापार सारिखेचि विचक्षणा । वाळुवे तिळा घाणा । गाळणें एक ॥ ९४० ॥ पैं नित्य होम देयावया । कां सैरा आगी सुवावया । फुंकितां धू धनंजया । साहणें तेंचि ॥ ९४१ ॥ परी धर्मपत्नी धांगडी । पोसितां जरी एकी वोढी । तरी कां अपरवडी । आणावी आंगा ? ॥ ९४२ ॥ हां गा पाठीं लागला घाई । मरण न चुकेचि पाहीं । तरी समोरला काई । आगळें न कीजे ? ॥ ९४३ ॥ कुलस्त्री दांड्याचे घाये । परघर रिगालीहि जरी साहे । तरी स्वपतीतें वायें । सांडिलें कीं । ॥ ९४४ ॥ तैसें आवडतेंही करणें । न निपजे शिणल्याविणें । तरी विहित बा रे कोणें । बोलें भारी ? ॥ ९४५ ॥ वरी थोडेंचि अमृत घेतां । सर्वस्व वेंचो कां पंडुसुता । जेणें जोडे जीविता । अक्षयत्व ॥ ९४६ ॥ येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावे घेऊनि । आत्महत्येसि निमोनि । जाइजे जेणें ॥ ९४७ ॥ तैसें जाचूनियां इंद्रियें । वेंचूनि आयुष्याचेनि दिये । सांचलें पापीं आन आहे । दुःखावाचूनि ? ॥ ९४८ ॥ म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करितां हिरोनि घे श्रमु । उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ॥ ९४९ ॥ याकारणें किरीटी । स्वधर्माचिये राहाटी । न विसंबिजे संकटीं । सिद्धमंत्र जैसा ॥ ९५० ॥ कां नाव जैसी उदधीं । महारोगी दिव्यौषधी । न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ ॥ ९५१ ॥ मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा । तोषला ईशु तमरजा । झाडा करुनी ॥ ९५२ ॥ शुद्धसत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा । भवस्वर्ग काळकूटा । ऐसें दावी ॥ ९५३ ॥ जियें वैराग्य येणें बोलें । मागां संसिद्धी रूप केलें । किंबहुना तें आपुलें । मेळवी खागें ॥ ९५४ ॥ मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये । कां जालाही जें लाहे । तें आतां सांगों ॥ ९५५ ॥

असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः । नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥ ४९॥

तरी देहादिक हें संसारें । सर्वही मांडलेंसे जें गुंफिरें । तेथ नातुडे तो वागुरें । वारा जैसा ॥ ९५६ ॥ पैं परिपाकाचिये वेळे । फळ देठें ना देठु फळें । न धरे तैसें स्नेह खुळें । सर्वत्र होय ॥ ९५७ ॥ पुत्र वित्त कलत्र । हे जालियाही स्वतंत्र । माझें न म्हणे पात्र । विषाचें जैसें ॥ ९५८ ॥ हें असो विषयजाती । बुद्धि पोळली ऐसी माघौती । पाउलें घेऊनि एकांतीं । हृदयाच्या रिगे ॥ ९५९ ॥ ऐसया अंतःकरण । बाह्य येतां तयाची आण । न मोडी समर्था भेण । दासी जैसी ॥ ९६० ॥ तैसें ऐक्याचिये मुठी । माजिवडें चित्त किरीटी । करूनि वेधी नेहटीं । आत्मयाच्या ॥ ९६१ ॥ तेव्हां दृष्टादृष्ट स्पृहे । निमणें जालेंचि आहे । आगीं दडपलिया धुयें । राहिजे जैसें ॥ ९६२ ॥ म्हणौनि नियमिलिया मानसीं । स्पृहा नासौनि जाय आपैसीं । किंबहुना तो ऐसी । भूमिका पावे ॥ ९६३ ॥ पैं अन्यथा बोधु आघवा । मावळोनि तया पांडवा । बोधमात्रींचि जीवा । ठावो होय ॥ ९६४ ॥ धरवणी वेंचें सरे । तैसें भोगें प्राचीन पुरे । नवें तंव नुपकरे । कांहीचि करूं ॥ ९६५ ॥ ऐसीं कर्में साम्यदशा । होय तेथ वीरेशा । मग श्रीगुरु आपैसा । भेटेचि गा ॥ ९६६ ॥ रात्रीची चौपाहरी । वेंचलिया अवधारीं । डोळ्यां तमारी । मिळे जैसा ॥ ९६७ ॥ का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु । श्रीगुरु भेटोनि करी पाडु । बुभुत्सु तैसा ॥ ९६८ ॥ मग आलिंगिला पूर्णिमा । जैसा उणीव सांडी चंद्रमा । तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ॥ ९६९ ॥ तेव्हां अबोधुमात्र असे । तो तंव तया कृपा नासे । तेथ निशीसवें जैसें । आंधारें जाय ॥ ९७० ॥ तैसी अबोधाचिये कुशी । कर्म कर्ता कार्य ऐशी । त्रिपुटी असे ते जैसी । गाभिणी मारिली ॥ ९७१ ॥ तैसेंचि अबोधनाशासवें । नाशे क्रियाजात आघवें । ऐसा समूळ संभवे । संन्यासु हा ॥ ९७२ ॥ येणें मुळाज्ञानसंन्यासें । दृश्याचा जेथ ठावो पुसे । तेथ बुझावें तें आपैसें । तोचि आहे ॥ ९७३ ॥ चेइलियावरी पाहीं । स्वप्नींचिया तिये डोहीं । आपणयातें काई । काढूं जाइजे ? ॥ ९७४ ॥ तैं मी नेणें आतां जाणेन । हें सरलें तया दुःस्वप्न । जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकाश ॥ ९७५ ॥ मुखाभासेंसी आरिसा । परौता नेलिया वीरेशा । पाहातेपणेंवीण जैसा । पाहाता ठाके ॥ ९७६ ॥ तैसें नेणणें जें गेलें । तेणें जाणणेंही नेलें । मग निष्क्रिय उरलें । चिन्मात्रचि ॥ ९७७ ॥ तेथ स्वभावें धनंजया । नाहीं कोणीचि क्रिया । म्हणौनि प्रवादु तया । नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९७८ ॥ तें आपुलें आपणपें । असे तेंचि होऊनि हारपे । तरंगु कां वायुलोपें । समुद्रु जैसा ॥ ९७९ ॥ तैसें न होणें निफजे । ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे । सर्वसिद्धींत सहजें । परम हेचि ॥ ९८० ॥ देउळाचिया कामा कळसु । उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु । कां सुवर्णशुद्धी कसु । सोळावा जैसा ॥ ९८१ ॥ तैसें आपुलें नेणणें । फेडिजे का जाणणें । तेंहि गिळूनि असणें । ऐसी जे दशा ॥ ९८२ ॥ तियेपरतें कांहीं । निपजणें आन नाहीं । म्हणौनि म्हणिपे पाहीं । परमसिद्धि ते ॥ ९८३ ॥

सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे । समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥ ५०॥

परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि । श्रीगुरुकृपालब्धि\- । काळीं पावे ॥ ९८४ ॥ उदयतांचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु । कां दीपसंगें कापुरु । दीपुचि होय ॥ ९८५ ॥ तया लवणाची कणिका । मिळतखेंवो उदका । उदकचि होऊनि देखा । ठाके जेवीं ॥ ९८६ ॥ कां निद्रितु चेवविलिया । स्वप्नेंसि नीद वायां । जाऊनि आपणपयां । मिळे जैसा ॥ ९८७ ॥ तैसें जया कोण्हासि दैवें । गुरुवाक्यश्रवणाचि सवें । द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती ॥ ९८८ ॥ तयासी मग कर्म करणें । हें बोलिजैलचि कवणें । आकाशा येणें जाणें । आहे काई ? । ॥ ९८९ ॥ म्हणौनि तयासि कांहीं । त्रिशुद्धि करणें नाहीं । परी ऐसें जरी हें कांहीं । नव्हे जया ॥ ९९० ॥ कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पैं किरीटी । वस्तु होऊनि उठी । कवणि एकु जो ॥ ९९१ ॥ येऱ्हवीं स्वकर्माचेनि वन्ही । काम्यनिषिद्धाचिया इंधनीं । रजतमें कीर दोन्ही । जाळिलीं आधीं ॥ ९९२ ॥ पुत्र वित्त परलोकु । यया तिहींचा अभिलाखु । घरीं होय पाइकु । हेंही जालें ॥ ९९३ ॥ इंद्रियें सैरा पदार्थीं । रिगतां विटाळलीं होतीं । तिये प्रत्याहार तीर्थीं । न्हाणिलीं कीर ॥ ९९४ ॥ आणि स्वधर्माचें फळ । ईश्वरीं अर्पूनि सकळ । घेऊनि केलें अढळ । वैराग्यपद ॥ ९९५ ॥ ऐसी आत्मसाक्षात्कारीं । लाभे ज्ञानाची उजरी । ते सामुग्री कीर पुरी । मेळविली ॥ ९९६ ॥ आणि तेचि समयीं । सद्गुरु भेटले पाहीं । तेवींचि तिहीं कांहीं । वंचिजेना ॥ ९९७ ॥ परी वोखद घेतखेंवो । काय लाभे आपला ठावो ? । कां उदयजतांचि दिवो । मध्यान्ह होय ? ॥ ९९८ ॥ सुक्षेत्रीं आणि वोलटें । बीजही पेरिलें गोमटें । तरी आलोट फळ भेटे । परी वेळे कीं गा ॥ ९९९ ॥ जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु । तरी पाविजे वांचूनि वेळु । लागेचि कीं ॥ १००० ॥ तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला । जीवीं अंकुरु फुटला । विवेकाचा ॥ १००१ ॥ तेणें ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती । हेही कीर प्रतीती । गाढ केली ॥ १००२ ॥ परी तेंचि जें परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम । मोक्षाचेंही काम । सरे जेथ ॥ १००३ ॥ यया तिन्ही अवस्था पोटीं । जिरवी जें गा किरीटी । तया ज्ञानासिही मिठी । दे जे वस्तु ॥ १००४ ॥ ऐक्याचें एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे । कांहींचि नुरोनि उरे । जें कांहीं गा ॥ १००५ ॥ तियें ब्रह्मीं ऐक्यपणें । ब्रह्मचि होऊनि असणें । तें क्रमेंचि करूनि तेणें । पाविजे पैं ॥ १००६ ॥ भुकेलियापासीं । वोगरिलें षड्रसीं । तो तृप्ति प्रतिग्रासीं । लाहे जेवीं ॥ १००७ ॥ तैसा वैराग्याचा वोलावा । विवेकाचा तो दिवा । आंबुथितां आत्मठेवा । काढीचि तो ॥ १००८ ॥ तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी । जयाच्या आंगीं निरवधी । लेणें जाली ॥ १००९ ॥ तो जेणें क्रमें ब्रह्म । होणें करी गा सुगम । तया क्रमाचें आतां वर्म । आईक सांगों ॥ १०१० ॥

बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च । शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ ५१॥

तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा । धुऊनियां मळकटा । बुद्धीचा तेणें ॥ १०११ ॥ मग राहूनें उगळिली । प्रभा चंद्रें आलिंगिली । तैसी शुद्धत्वें जडली । आपणयां बुद्धि ॥ १०१२ ॥ सांडूनि कुळें दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी । द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं । पडली तैसी ॥ १०१३ ॥ आणि ज्ञान ऐसें जिव्हार । नेवों नेवों निरंतर । इंद्रियीं केले थोर । शब्दादिक जे ॥ १०१४ ॥ ते रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया । तैसें वृत्तिरोधें तयां । पांचांही केलें ॥ १०१५ ॥ नेणतां अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना । तैसीं वोकविली सवासना । इंद्रियें विषयीं ॥ १०१६ ॥ मग प्रत्यगावृत्ती चोखटें । लाविलीं गंगेचेनि तटें । ऐसीं प्रायश्चित्तें धुवटें । केलीं येणें ॥ १०१७ ॥ पाठीं सात्विकें धीरें तेणें । शोधारलीं तियें करणें । मग मनेंसीं योगधारणें । मेळविलीं ॥ १०१८ ॥ तेवींचि प्राचीनें इष्टानिष्टें । भोगेंसीं येउनी भेटे । तेथ देखिलियाही वोखटें । द्वेषु न करी ॥ १०१९ ॥ ना गोमटेंचि विपायें । तें आणूनि पुढां सूये । तयालागीं न होये । साभिलाषु ॥ १०२० ॥ यापरी इष्टानिष्टींंं । रागद्वेष किरीटी । त्यजूनि गिरिकपाटीं । निकुंजीं वसे ॥ १०२१ ॥

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः । ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ ५२॥

गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया । अंगाचियाचि मांदिया । एकलेया ॥ १०२२ ॥ शमदमादिकीं खेळे । न बोलणेंचि चावळे । गुरुवाक्याचेनि मेळें । नेणे वेळु ॥ १०२३ ॥ आणि आंगा बळ यावें । नातरी क्षुधा जावें । कां जिभीचे पुरवावे । मनोरथ ॥ १०२४ ॥ भोजन करितांविखीं । ययां तिहींतें न लेखी । आहारीं मिती संतोषीं । माप न सूये ॥ १०२५ ॥ अशनाचेनि पावकें । हारपतां प्राणु पोखे । इतुकियाचि भागु मोटकें । अशन करी ॥ १०२६ ॥ आणि परपुरुषें कामिली । कुळवधू आंग न घाली । निद्रालस्या न मोकली । आसन तैसें ॥ १०२७ ॥ दंडवताचेनि प्रसंगें । भुयीं हन अंग लागे । वांचूनि येर नेघे । राभस्य तेथ ॥ १०२८ ॥ देहनिर्वाहापुरतें । राहाटवी हातांपायांतें । किंबहुना आपैतें । सबाह्य केलें ॥ १०२९ ॥ आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखों नेदी वीरा । तेथ कें वाग्व्यापारा । अवकाशु असे ? ॥ १०३० ॥ ऐसेनि देह वाचा मानस । हें जिणौनि बाह्यप्रदेश । आकळिलें आकाश । ध्यानाचें तेणें ॥ १०३१ ॥ गुरुवाक्यें उठविला । बोधीं निश्चयो आपुला । न्याहाळीं हातीं घेतला । आरिसा जैसा ॥ १०३२ ॥ पैं ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारीं । ध्येयत्वें घे हे अवधारीं । ध्यानरूढी गा ॥ १०३३ ॥ तेथ ध्येय ध्यान ध्याता । ययां तिहीं एकरूपता । होय तंव पंडुसुता । कीजे तें गा ॥ १०३४ ॥ म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानीं जाला दक्षु । परी पुढां सूनि पक्षु । योगाभ्यासाचा ॥ १०३५ ॥ अपानरंध्रद्वया । माझारीं धनंजया । पार्ष्णीं पिडूनियां । कांवरुमूळ ॥ १०३६ ॥ आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध । करूनि एकवद । वायुभेदी ॥ १०३७ ॥ कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकाशूनि । आधारादि भेदूनि । आज्ञावरी ॥ १०३८ ॥ सहस्त्रदळाचा मेघु । पीयुषें वर्षोनि चांगु । तो मूळवरी वोघु । आणूनियां ॥ १०३९ ॥ नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाच्या खापरीं । मनपवनाची खीच पुरी । वाढूनियां ॥ १०४० ॥ जालिया योगाचा गाढा । मेळावा सूनि हा पुढां । ध्यान मागिलीकडां । स्वयंभ केलें ॥ १०४१ ॥ आणि ध्यान योग दोन्ही । इयें आत्मतत्वज्ञानीं । पैठा होआवया निर्विघ्नीं । आधींचि तेणें ॥ १०४२ ॥ वीतरागतेसारिखा । जोडूनि ठेविला सखा । तो आघवियाचि भूमिका- । सवें चाले ॥ १०४३ ॥ पहावें दिसे तंववरी । दिठीतें न संडी दीप जरी । तरी कें आहे अवसरी । देखावया ॥ १०४४ ॥ तैसें मोक्षीं प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मीं जाय लया । तंव वैराग्य आथी तया । भंगु कैचा । ॥ १०४५ ॥ म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु । करूनि जाला योग्यु । आत्मलाभा ॥ १०४६ ॥ ऐसी वैराग्याची आंगीं । बाणूनियां वज्रांगीं । राजयोगतुरंगीं । आरूढला ॥ १०४७ ॥ वरी आड पडिलें दिठी । सानें थोर निवटी । तें बळीं विवेकमुष्टीं । ध्यानाचें खांडें ॥ १०४८ ॥ ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारीं सूर्य तैसा असे जातु । मोक्षविजयश्रीये वरैतु । होआवयालागीं ॥ १०४९ ॥

अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् । विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५३॥

तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपटिले । तयांमाजीं पहिलें । देहाहंकारु ॥ १०५० ॥ जो न मोकली मारुनी । जीवों नेदी उपजवोनि । विचंबवी खोडां घालुनी । हाडांचिया ॥ १०५१ ॥ तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा । आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ॥ १०५२ ॥ जो विषयाचेनि नांवें । चौगुणेंही वरी थांवे । जेणें मृतावस्था धांवे । सर्वत्र जगा ॥ १०५३ ॥ तो विषय विषाचा अथावो । आघविया दोषांचा रावो । परी ध्यानखड्गाचा घावो । साहेल कैंचा ? ॥ १०५४ ॥ आणि प्रिय विषयप्राप्ती । करी जया सुखाची व्यक्ती । तेचि घालूनि बुंथी । आंगीं जो वाजे ॥ १०५५ ॥ जो सन्मार्गा भुलवी । मग अधर्माच्या आडवीं । सूनि वाघां सांपडवी । नरकादिकां ॥ १०५६ ॥ तो विश्वासें मारितां रिपु । निवटूनि घातला दर्पु । आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥ १०५७ ॥ क्रोधा ऐसा महादोखु । जयाचा देखा परिपाकु । भरिजे तंव अधिकु । रिता होय जो ॥ १०५८ ॥ तो कामु कोणेच ठायीं । नसे ऐसें केलें पाहीं । कीं तेंचि क्रोधाही । सहजें आलें ॥ १०५९ ॥ मुळाचें तोडणें जैसें । होय कां शाखोद्देशें । कामु नाशलेनि नाशे । तैसा क्रोधु ॥ १०६० ॥ म्हणौनि काम वैरी । जाला जेथ ठाणोरी । तेथ सरली वारी । क्रोधाचीही ॥ १०६१ ॥ आणि समर्थु आपुला खोडा । शिसें वाहवी जैसा होडा । तैसा भुंजौनि जो गाढा । परीग्रहो ॥ १०६२ ॥ जो माथांचि पालाणवी । अंगा अवगुण घालवी । जीवें दांडी घेववी । ममत्वाची ॥ १०६३ ॥ शिष्यशास्त्रादिविलासें । मठादिमुद्रेचेनि मिसें । घातले आहाती फांसे । निःसंगा जेणें ॥ १०६४ ॥ घरीं कुटुंबपणें सरे । तरी वनीं वन्य होऊनि अवतरे । नागवीयाही शरीरें । लागला आहे ॥ १०६५ ॥ ऐसा दुर्जयो जो परीग्रहो । तयाचा फेडूनि ठावो । भवविजयाचा उत्साहो । भोगीतसे जो ॥ १०६६ ॥ तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणाचे जे मेळावे । ते कैवल्यदेशींचे आघवे । रावो जैसे आले ॥ १०६७ ॥ तेव्हां सम्यक्‌ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया । परिवारु होऊनियां । राहत आंगें ॥ १०६८ ॥ प्रवृत्तीचिये राजबिदीं । अवस्थाभेदप्रमदीं । कीजत आहे प्रतिपदीं । सुखाचें लोण ॥ १०६९ ॥ पुढां बोधाचिये कांबीवरी । विवेकु दृश्याची मांदी सारी । योगभूमिका आरती करी । येती जैसिया ॥ १०७० ॥ तेथ ऋद्धिसिद्धींचीं अनेगें । वृंदें मिळती प्रसंगें । तिये पुष्पवर्षीं आंगें । नाहातसे तो ॥ १०७१ ॥ ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखें । स्वराज्य येतां जवळिकें । झळंबित आहे हरिखें । तिन्ही लोक ॥ १०७२ ॥ तेव्हां वैरियां कां मैत्रियां । तयासि माझें म्हणावया । समानता धनंजया । उरेचिही ना ॥ १०७३ ॥ हें ना भलतेणें व्याजें । तो जयातें म्हणे माझें । तें नोडवेचि कां दुजें । अद्वितीय जाला ॥ १०७४ ॥ पैं आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळूनिया पंडुसुता । कहीं न लगती ममता । धाडिली तेणें ॥ १०७५ ॥ ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हें जगु । अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला ॥ १०७६ ॥ वैराग्याचें गाढलें । अंगी त्राण होतें भलें । तेंही नावेक ढिलें । तेव्हां करी ॥ १०७७ ॥ आणि निवटी ध्यानाचें खांडें । तें दुजें नाहींचि पुढें । म्हणौनि हातु आसुडें । वृत्तीचाही ॥ १०७८ ॥ जैसें रसौषध खरें । आपुलें काज करोनि पुरें । आपणही नुरे । तैसें होतसे ॥ १०७९ ॥ देखोनि ठाकिता ठावो । धांवता थिरावे पावो । तैसा ब्रह्मसामीप्यें थावो । अभ्यासु सांडी ॥ १०८० ॥ घडतां महोदधीसी । गंगा वेगु सांडी जैसी । कां कामिनी कांतापासीं । स्थिर होय ॥ १०८१ ॥ नाना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुळे । कां गांवापुढें वळे । मार्गु जैसा ॥ १०८२ ॥ तैसा आत्मसाक्षात्कारु । होईल देखोनि गोचरु । ऐसा साधनहतियेरु । हळुचि ठेवी ॥ १०८३ ॥ म्हणौनि ब्रह्मेंसी तया । ऐक्याचा समो धनंजया । होतसे तैं उपाया । वोहटु पडे ॥ १०८४ ॥ मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य । योगफळाचाही परिपाक । दशा जे कां ॥ १०८५ ॥ ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा । तैं ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु ॥ १०८६ ॥ पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुलें उणेपण शशी । कां सोळे पाऊनि जैसी । पंधरावी वानी ॥ १०८७ ॥ सागरींही पाणी वेगें । संचरे तें रूप गंगे । येर निश्चळ जें उगें । तें समुद्रु जैसा ॥ १०८८ ॥ ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाडु आहे । तेंचि शांतीचेनि लवलाहें । होय तो गा ॥ १०८९ ॥ पैं तेंचि होणेंनवीण । प्रतीती आलें जें ब्रह्मपण । ते ब्रह्म होती जाण । योग्यता येथ ॥ १०९० ॥

ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काण्‌क्षति । समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॥ ५४॥

ते ब्रह्मभावयोग्यता । पुरुषु तो मग पंडुसुता । आत्मबोधप्रसन्नता\- । पदीं बैसे ॥ १०९१ ॥ जेणें निपजे रससोय । तो तापुही जैं जाय । तैं ते कां होय । प्रसन्न जैसी ॥ १०९२ ॥ नाना भरतिया लगबगा । शरत्काळीं सांडिजे गंगा । कां गीत रहातां उपांगा । वोहटु पडे ॥ १०९३ ॥ तैसा आत्मबोधीं उद्यमु । करितां होय जो श्रमु । तोही जेथें समु । होऊनि जाय ॥ १०९४ ॥ आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती । ते भोगितसे महामती । योग्यु तो गा ॥ १०९५ ॥ तेव्हां आत्मत्वें शोचावें । कांहीं पावावया कामावें । हें सरलें समभावें । भरितें तया ॥ १०९६ ॥ उदया येतां गभस्ती । नाना नक्षत्रव्यक्ती । हारवीजती दीप्ती । आंगिका जेवीं ॥ १०९७ ॥ तेवीं उठतिया आत्मप्रथा । हे भूतभेदव्यवस्था । मोडीत मोडीत पार्था । वास पाहे तो ॥ १०९८ ॥ पाटियेवरील अक्षरें । जैसीं पुसतां येती करें । तैसीं हारपती भेदांतरें । तयाचिये दृष्टी ॥ १०९९ ॥ तैसेनि अन्यथा ज्ञानें । जियें घेपती जागरस्वप्नें । तियें दोन्ही केलीं लीनें । अव्यक्तामाजीं ॥ ११०० ॥ मग तेंही अव्यक्त । बोध वाढतां झिजत । पुरलां बोधीं समस्त । बुडोनि जाय ॥ ११०१ ॥ जैसी भोजनाच्या व्यापारीं । क्षुधा जिरत जाय अवधारीं । मग तृप्तीच्या अवसरीं । नाहींच होय ॥ ११०२ ॥ नाना चालीचिया वाढी । वाट होत जाय थोडी । मग पातला ठायीं बुडी । देऊनि निमे ॥ ११०३ ॥ कां जागृति जंव जंव उद्दीपे । तंव तंव निद्रा हारपे । मग जागीनलिया स्वरूपें । नाहींच होय ॥ ११०४ ॥ हें ना आपुलें पूर्णत्व भेटें । जेथ चंद्रासीं वाढी खुंटे । तेथ शुक्लपक्षु आटे । निःशेषु जैसा ॥ ११०५ ॥ तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधें ये मज आंतु । मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला ॥ ११०६ ॥ तेव्हां कल्पांताचिये वेळे । नदी सिंधूचें पेंडवळें । मोडूनि भरलें जळें । आब्रह्म जैसें ॥ ११०७ ॥ नाना गेलिया घट मठ । आकाश ठाके एकवट । कां जळोनि काष्ठें काष्ठ । वन्हीचि होय ॥ ११०८ ॥ नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे । नामरूप भेदें जैसें । सांडिजे सोनें ॥ ११०९ ॥ हेंही असो चेइलया । तें स्वप्न नाहीं जालया । मग आपणचि आपणयां । उरिजे जैसें ॥ १११० ॥ तैसी मी एकवांचूनि कांहीं । तया तयाहीसकट नाहीं । हे चौथी भक्ति पाहीं । माझी तो लाहे ॥ ११११ ॥ येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथीं । ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे ॥ १११२ ॥ येऱ्हवीं तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती । पैं माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ॥ १११३ ॥ जें नेणणें माझें प्रकाशूनि । अन्यथात्वें मातें दाऊनि । सर्वही सर्वीं भजौनि । बुझावीतसे जे ॥ १११४ ॥ जो जेथ जैसें पाहों बैसे । तया तेथ तैसेंचि असे । हें उजियेडें कां दिसे । अखंडें जेणें ॥ १११५ ॥ स्वप्नाचें दिसणें न दिसणें । जैसें आपलेनि असलेपणें । विश्वाचें आहे नाहीं जेणें । प्रकाशें तैसें ॥ १११६ ॥ ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा । तो भक्ति या वोजा । बोलिजे गा ॥ १११७ ॥ म्हणौनि आर्ताच्या ठायीं । हे आर्ति होऊनि पाहीं । अपेक्षणीय जें कांहीं । तें मीचि केला ॥ १११८ ॥ जिज्ञासुपुढां वीरेशा । हेचि होऊनि जिज्ञासा । मी कां जिज्ञास्यु ऐसा । दाखविला ॥ १११९ ॥ हेंचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थीं अर्जुना । करूनि अर्थाभिधाना । आणी मातें ॥ ११२० ॥ एवं घेऊनि अज्ञानातें । माझी भक्ति जे हे वर्ते । ते दावी मज द्रष्टयातें । दृश्य करूनि ॥ ११२१ ॥ येथें मुखचि दिसे मुखें । या बोला कांहीं न चुके । तरी दुजेपण हें लटिकें । आरिसा करी ॥ ११२२ ॥ दिठी चंद्रचि घे साचें । परी येतुलें हें तिमिराचें । जे एकचि असे तयाचे । दोनी दावी ॥ ११२३ ॥ तैसा सर्वत्र मीचि मियां । घेपतसें भक्ति इया । परी दृश्यत्व हें वायां । अज्ञानवशें ॥ ११२४ ॥ तें अज्ञान आतां फिटलें । माझें दृष्टृत्व मज भेटलें । निजबिंबीं एकवटलें । प्रतिबिंब जैसें ॥ ११२५ ॥ पैं जेव्हांही असे किडाळ । तेव्हांही सोनेंचि अढळ । परी तें कीड गेलिया केवळ । उरे जैसें ॥ ११२६ ॥ हां गा पूर्णिमे आधीं कायी । चंद्रु सावयवु नाहीं ? । परी तिये दिवशीं भेटे पाहीं । पूर्णता तया ॥ ११२७ ॥ तैसा मीचि ज्ञानद्वारें । दिसें परी हस्तांतरें । मग दृष्टृत्व तें सरे । मियांचि मी लाभें ॥ ११२८ ॥ म्हणौनि दृश्यपथा- । अतीतु माझा पार्था । भक्तियोगु चवथा । म्हणितला गा ॥ ११२९ ॥

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः । ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥ ५५॥

या ज्ञान भक्ति सहज । भक्तु एकवटला मज । मीचि केवळ हें तुज । श्रुतही आहे ॥ ११३० ॥ जे उभऊनियां भुजा । ज्ञानिया आत्मा माझा । हे बोलिलों कपिध्वजा । सप्तमाध्यायीं ॥ ११३१ ॥ ते कल्पादीं भक्ति मियां । श्रीभागवतमिषें ब्रह्मया । उत्तम म्हणौनि धनंजया । उपदेशिली ॥ ११३२ ॥ ज्ञानी इयेतें स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती । आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो ॥ ११३३ ॥ हे मज मिळतिये वेळे । तया क्रमयोगियां फळे । मग समस्तही निखिळें । मियांचि भरे ॥ ११३४ ॥ तेथ वैराग्य विवेकेंसी । आटे बंध मोक्षेंसीं । वृत्ती तिये आवृत्तीसीं । बुडोनि जाय ॥ ११३५ ॥ घेऊनि ऐलपणातें । परत्व हारपें जेथें । गिळूनि चाऱ्ही भूतें । आकाश जैसें ॥ ११३६ ॥ तया परी थडथाद । साध्यसाधनातीत शुद्ध । तें मी होऊनि एकवद । भोगितो मातें ॥ ११३७ ॥ घडोनि सिंधूचिया आंगा । सिंधूवरी तळपे गंगा । तैसा पाडु तया भोगा । अवधारी जो ॥ ११३८ ॥ कां आरिसयासि आरिसा । उटूनि दाविलिया जैसा । देखणा अतिशयो तैसा । भोगणा तिये ॥ ११३९ ॥ हे असो दर्पणु नेलिया । तो मुख बोधुही गेलिया । देखलेंपण एकलेया । आस्वादिजे जेवीं ॥ ११४० ॥ चेइलिया स्वप्न नाशे । आपलें ऐक्यचि दिसे । ते दुजेनवीण जैसें । भोगिजे का ॥ ११४१ ॥ तोचि जालिया भोगु तयाचा । न घडे हा भावो जयांचा । तिहीं बोलें केवीं बोलाचा । उच्चारु कीजे ॥ ११४२ ॥ तयांच्या नेणों गांवीं । रवी प्रकाशी हन दिवी । कीं व्योमालागीं मांडवी । उभिली तिहीं ॥ ११४३ ॥ हां गा राजन्यत्व नव्हतां आंगीं । रावो रायपण काय भोगी ? । कां आंधारु हन आलिंगी । दिनकरातें ? ॥ ११४४ ॥ आणि आकाश जें नव्हे । तया आकाश काय जाणवे ? । रत्नाच्या रूपीं मिरवे । गुंजांचें लेणें ? ॥ ११४५ ॥ म्हणौनि मी होणें नाहीं । तया मीचि आहें केहीं । मग भजेल हें कायी । बोलों कीर ॥ ११४६ ॥ यालागीं तो क्रमयोगी । मी जालाचि मातें भोगी । तारुण्य कां तरुणांगीं । जियापरी ॥ ११४७ ॥ तरंग सर्वांगीं तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबीं । नाना अवकाश नभीं । लुंठतु जैसा ॥ ११४८ ॥ तैसा रूप होऊनि माझें । मातें क्रियावीण तो भजे । अलंकारु का सहजें । सोनयातें जेवीं ॥ ११४९ ॥ का चंदनाची द्रुती जैसी । चंदनीं भजे अपैसी । का अकृत्रिम शशीं । चंद्रिका ते ॥ ११५० ॥ तैसी क्रिया कीर न साहे । तऱ्ही अद्वैतीं भक्ति आहे । हें अनुभवाचिजोगें नव्हे । बोला{ऐ}सें ॥ ११५१ ॥ तेव्हां पूर्वसंस्कार छंदें । जें कांहीं तो अनुवादे । तेणें आळविलेनि वो दें । बोलतां मीचि ॥ ११५२ ॥ बोलतया बोलताचि भेटे । तेथें बोलिलें हें न घटे । तें मौन तंव गोमटें । स्तवन माझें ॥ ११५३ ॥ म्हणौनि तया बोलतां । बोली बोलतां मी भेटतां । मौन होय तेणें तत्वतां । स्तवितो मातें ॥ ११५४ ॥ तैसेंचि बुद्धी का दिठी । जें तो देखों जाय किरीटी । तें देखणें दृश्य लोटी । देखतेंचि दावी ॥ ११५५ ॥ आरिसया आधीं जैसें । देखतेंचि मुख दिसेअ । तयाचें देखणें तैसें । मेळवी द्रष्टें ॥ ११५६ ॥ दृश्य जाउनियां द्रष्टें । द्रष्टयासीचि जैं भेटे । तैं एकलेपणें न घटे । द्रष्टेपणही ॥ ११५७ ॥ तेथ स्वप्नींचिया प्रिया । चेवोनि झोंबो गेलिया । ठायिजे दोन्ही न होनियां । आपणचि जैसें ॥ ११५८ ॥ का दोहीं काष्ठाचिये घृष्टी\- । माजीं वन्हि एक उठी । तो दोन्ही हे भाष आटी । आपणचि होय ॥ ११५९ ॥ नाना प्रतिबिंब हातीं । घेऊं गेलिया गभस्ती । बिंबताही असती । जाय जैसी ॥ ११६० ॥ तैसा मी होऊनि देखतें । तो घेऊं जाय दृश्यातें । तेथ दृश्य ने थितें । द्रष्टृत्वेंसीं ॥ ११६१ ॥ रवि आंधारु प्रकाशिता । नुरेचि जेवीं प्रकाश्यता । तेंवीं दृश्यीं नाही द्रष्टृता । मी जालिया ॥ ११६२ ॥ मग देखिजे ना न देखिजे । ऐसी जे दशा निपजे । ते तें दर्शन माझें । साचोकारें ॥ ११६३ ॥ तें भलतयाही किरीटी । पदार्थाचिया भेटी । द्रष्टृदृश्यातीता दृष्टी । भोगितो सदा ॥ ११६४ ॥ आणि आकाश हें आकाशें । दाटलें न ढळें जैसें । मियां आत्मेन आपणपें तैसें । जालें तया ॥ ११६५ ॥ कल्पांतीं उदक उदकें । रुंधिलिया वाहों ठाके । तैसा आत्मेनि मियां येकें । कोंदला तो ॥ ११६६ ॥ पावो आपणपयां वोळघे ? । केवीं वन्हि आपणपयां लागे ? । आपणपां पाणी रिघे । स्नाना कैसें ? ॥ ११६७ ॥ म्हणौनि सर्व मी जालेपणें । ठेलें तया येणें जाणें । तेंचि गा यात्रा करणें । अद्वया मज ॥ ११६८ ॥ पैं जळावरील तरंगु । जरी धाविन्नला सवेगु । तरी नाहीं भूमिभागु । क्रमिला तेणें ॥ ११६९ ॥ जें सांडावें कां मांडावें । जें चालणें जेणें चालावें । तें तोयचि एक आघवें । म्हणौनियां ॥ ११७० ॥ गेलियाही भलतेउता । उदकपणेंं पंडुसुता । तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवीं ॥ ११७१ ॥ तैसा मीपणें हा लोटला । तो आघवेंयाचि मजआंतु आला । या यात्रा होय भला । कापडी माझा ॥ ११७२ ॥ आणि शरीर स्वभाववशें । कांहीं येक करूं जरी बैसे । तरी मीचि तो तेणें मिषें । भेटे तया ॥ ११७३ ॥ तेथ कर्म आणि कर्ता । हें जाऊनि पंडुसुता । मियां आत्मेनि मज पाहतां । मीचि होय ॥ ११७४ ॥ पैं दर्पणातेंं दर्पणें । पाहिलिया होय न पाहणें । सोनें झांकिलिया सुवर्णें । ना झांकें जेवीं ॥ ११७५ ॥ दीपातें दीपें प्रकाशिजे । तें न प्रकाशणेंचि निपजे । तैसें कर्म मियां कीजे । तें करणें कैंचें ? ॥ ११७६ ॥ कर्मही करितचि आहे । जैं करावें हें भाष जाये । तैं न करणेंचि होये । तयाचें केलें ॥ ११७७ ॥ क्रियाजात मी जालेपणें । घडे कांहींचि न करणें । तयाचि नांव पूजणें । खुणेचें माझें ॥ ११७८ ॥ म्हणौनि करीतयाही वोजा । तें न करणें हेंचि कपिध्वजा । निफजे तिया महापूजा । पूजी तो मातें ॥ ११७९ ॥ एवं तो बोले तें स्तवन । तो देखे तें दर्शन । अद्वया मज गमन । तो चाले तेंचि ॥ ११८० ॥ तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा । तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥ ११८१ ॥ जैसें कनकेंसी कांकणें । असिजे अनन्यपणें । तो भक्तियोगें येणें । मजसीं तैसा ॥ ११८२ ॥ उदकीं कल्लोळु । कापुरीं परीमळु । रत्नीं उजाळु । अनन्यु जैसा ॥ ११८३ ॥ किंबहुना तंतूंसीं पटु । कां मृत्तिकेसीं घटु । तैसा तो एकवटु । मजसीं माझा ॥ ११८४ ॥ इया अनन्यसिद्धा भक्ती । या आघवाचि दृश्यजातीं । मज आपणपेंया सुमती । द्रष्टयातें जाण ॥ ११८५ ॥ तिन्ही अवस्थांचेनि द्वारें । उपाध्युपहिताकारें । भावाभावरूप स्फुरे । दृश्य जें हें ॥ ११८६ ॥ तें हें आघवेंचि मी द्रष्टा । ऐसिया बोधाचा माजिवटा । अनुभवाचा सुभटा । धेंडा तो नाचे ॥ ११८७ ॥ रज्जु जालिया गोचरु । आभासतां तो व्याळाकारु । रज्जुचि ऐसा निर्धारु । होय जेवीं ॥ ११८८ ॥ भांगारापरतें कांहीं । लेणें गुंजहीभरी नाहीं । हें आटुनियां ठायीं । कीजे जैसे ॥ ११८९ ॥ उदका येकापरतें । तरंग नाहींचि हें निरुतें । जाणोनि तया आकारातें । न घेपे जेवीं ॥ ११९० ॥ नातरी स्वप्नविकारां समस्तां । चेऊनियां उमाणें घेतां । तो आपणयापरौता । न दिसे जैसा ॥ ११९१ ॥ तैसें जें कांहीं आथी नाथी । येणें होय ज्ञेयस्फुर्ती । तें ज्ञाताचि मी हें प्रतीती । होऊनि भोगी ॥ ११९२ ॥ जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु । अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥ ११९३ ॥ अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु । आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥ ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु । अभय मी आधारु । आधेय मी ॥ ११९५ ॥ स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु । सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥ नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु । स्थुलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥ अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु । व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥ अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु । समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥ ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें । आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥ १२०० ॥ पैं चेइलेयानंतरें । आपुलें एकपण उरे । तेंही तोंवरी स्फुरे । तयाशींचि जैसें ॥ १२०१ ॥ कां प्रकाशतां अर्कु । तोचि होय प्रकाशकु । तयाही अभेदा द्योतकु । तोचि जैसा ॥ १२०२ ॥ तैसा वेद्यांच्या विलयीं । केवळ वीदकु उरे पाहीं । तेणें जाणवें तया तेंही । हेंही जो जाणे ॥ १२०३ ॥ तया अद्वयपणा आपुलिया । जाणती ज्ञप्ती जे धनंजया । ते ईश्वरचि मी हे तया । बोधासि ये ॥ १२०४ ॥ मग द्वैताद्वैतातीत । मीचि आत्मा एकु निभ्रांत । हें जाणोनि जाणणें जेथ । अनुभवीं रिघे ॥ १२०५ ॥ तेथ चेइलियां येकपण । दिसे जे आपुलया आपण । तेंही जातां नेणों कोण । होईजे जेवीं ॥ १२०६ ॥ कां डोळां देखतिये क्षणीं । सुवर्णपण सुवर्णीं । नाटितां होय आटणी । अळंकाराचीही ॥ १२०७ ॥ नाना लवण तोय होये । मग क्षारता तोयत्वें राहे । तेही जिरतां जेवीं जाये । जालेपण तें ॥ १२०८ ॥ तैसा मी तो हें जें असे । तें स्वानंदानुभवसमरसें । कालवूनिया प्रवेशे । मजचिमाजीं ॥ १२०९ ॥ आणि तो हे भाष जेथ जाये । तेथे मी हें कोण्हासी आहे । ऐसा मी ना तो तिये सामाये । माझ्याचि रूपीं ॥ १२१० ॥ जेव्हां कापुर जळों सरे । तयाचि नाम अग्नि पुरी । मग उभयतातीत उरे । आकाश जेवीं ॥ १२११ ॥ का धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु । तैसा आहे नाहींचा शेखु । मीचि मग आथी ॥ १२१२ ॥ तेथ ब्रह्मा आत्मा ईशु । यया बोला मोडे सौरसु । न बोलणें याही पैसु । नाहीं तेथ ॥ १२१३ ॥ न बोलणेंही न बोलोनी । तें बोलिजे तोंड भरुनी । जाणिव नेणिव नेणोनी । जाणिजे तें ॥ १२१४ ॥ तेथ बुझिजे बोधु बोधें । आनंंदु घेपे आनंदें । सुखावरी नुसधें । सुखचि भोगिजे ॥ १२१५ ॥ तेथ लाभु जोडला लाभा । प्रभा आलिंगिली प्रभा । विस्मयो बुडाला उभा । विस्मयामाजीं ॥ १२१६ ॥ शमु तेथ सामावला । विश्रामु विश्रांति आला । अनुभवु वेडावला । अनुभूतिपणें ॥ १२१७ ॥ किंबहुना ऐसें निखळ । मीपण जोडे तया फळ । सेवूनि वेली वेल्हाळ । क्रमयोगाची ते ॥ १२१८ ॥ पैं क्रमयोगिया किरीटी । चक्रवर्तीच्या मुकुटीं । मी चिद्रत्न तें साटोवाटीं । होय तो माझा ॥ १२१९ ॥ कीं क्रमयोगप्रासादाचा । कळसु जो हा मोक्षाचा । तयावरील अवकाशाचा । उवावो जाला तो ॥ १२२० ॥ नाना संसार आडवीं । क्रमयोग वाट बरवी । जोडिली ते मदैक्यगांवीं । पैठी जालीसे ॥ १२२१ ॥ हें असो क्रमयोगबोधें । तेणें भक्तिचिद्गांगें । मी स्वानंदोदधी वेगें । ठाकिला कीं गा ॥ १२२२ ॥ हा ठायवरी सुवर्मा । क्रमयोगीं आहे महिमा । म्हणौनि वेळोवेळां तुम्हां । सांगतों आम्ही ॥ १२२३ ॥ पैं देशें काळें पदार्थें । साधूनि घेइजे मातें । तैसा नव्हे मी आयतें । सर्वांचें सर्वही ॥ १२२४ ॥ म्हणौनि माझ्या ठायीं । जाचावें न लगे कांहीं । मी लाभें इयें उपायीं । साचचि गा ॥ १२२५ ॥ एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु । तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया ॥ १२२६ ॥ अगा वसुधेच्या पोटीं । निधान सिद्ध किरीटी । वन्हि सिद्ध काष्ठीं । वोहां दूध ॥ १२२७ ॥ परी लाभे तें असतें । तया कीजे उपायातें । येर सिद्धचि तैसा तेथें । उपायीं मी ॥ १२२८ ॥ हा फळहीवरी उपावो । कां पां प्रस्तावीतसे देवो । हे पुसतां परी अभिप्रावो । येथिंचा ऐसा ॥ १२२९ ॥ जे गीतार्थाचें चांगावें । मोक्षोपायपर आघवें । आन शास्त्रोपाय कीं नव्हे । प्रमाणसिद्ध ॥ १२३० ॥ वारा आभाळचि फेडी । वांचूनि सूर्यातें न घडी । कां हातु बाबुळी धाडी । तोय न करी ॥ १२३१ ॥ तैसा आत्मदर्शनीं आडळु । असे अविद्येचा जो मळु । तो शास्त्र नाशी येरु निर्मळु । मी प्रकाशें स्वयें ॥ १२३२ ॥ म्हणौनि आघवींचि शास्त्रें । अविद्याविनाशाचीं पात्रें । वांचोनि न होतीं स्वतंत्रें । आत्मबोधीं ॥ १२३३ ॥ तया अध्यात्मशास्त्रांसीं । जैं साचपणाची ये पुसी । तैं येइजे जया ठायासी । ते हे गीता ॥ १२३४ ॥ भानुभूषिता प्राचिया । सतेजा दिशा आघविया । तैसी शास्त्रेश्वरा गीता या । सनाथें शास्त्रें ॥ १२३५ ॥ हें असो येणें शास्त्रेश्वरें । मागां उपाय बहुवे विस्तारें । सांगितला जैसा करें । घेवों ये आत्मा ॥ १२३६ ॥ परी प्रथमश्रवणासवें । अर्जुना विपायें हें फावे । हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी ॥ १२३७ ॥ तेंचि प्रमेय एक वेळ । शिष्यीं होआवया अढळ । सांगतसे मुकुल । मुद्रा आतां ॥ १२३८ ॥ आणि प्रसंगें गीता । ठावोही हा संपता । म्हणौनि दावी आद्यंता । एकार्थत्व ॥ १२३९ ॥ जे ग्रंथाच्या मध्यभागीं । नाना अधिकारप्रसंगीं । निरूपण अनेगीं । सिद्धांतीं केलें ॥ १२४० ॥ तरी तेतुलेही सिद्धांत । इयें शास्त्रीं प्रस्तुत । हे पूर्वापर नेणत । कोण्ही जैं मानी ॥ १२४१ ॥ तैं महासिद्धांताचा आवांका । सिद्धांतकक्षा अनेका । भिडऊनि आरंभु देखा । संपवीतु असे ॥ १२४२ ॥ एथ अविद्यानाशु हें स्थळ । तेणें मोक्षोपादान फळ । या दोहीं केवळ । साधन ज्ञान ॥ १२४३ ॥ हें इतुलेंचि नानापरी । निरूपिलें ग्रंथविस्तारीं । तें आतां दोहीं अक्षरीं । अनुवादावें ॥ १२४४ ॥ म्हणौनि उपेयही हातीं । जालया उपायस्थिती । देव प्रवर्तले तें पुढती । येणेंचि भावें ॥ १२४५ ॥

सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः । मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥ ५६॥

मग म्हणे गा सुभटा । तो क्रमयोगिया निष्ठा । मी हौनी होय पैठा । माझ्या रूपीं ॥ १२४६ ॥ स्वकर्माच्या चोखौळीं । मज पूजा करूनि भलीं । तेणें प्रसादें आकळी । ज्ञाननिष्ठेतें ॥ १२४७ ॥ ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे । तेथ भक्ति माझी उल्लासे । तिया भजन समरसें । सुखिया होय ॥ १२४८ ॥ आणि विश्वप्रकाशितया । आत्मया मज आपुलिया । अनुसरे जो करूनियां । सर्वत्रता हे ॥ १२४९ ॥ सांडूनि आपुला आडळ । लवण आश्रयी जळ । कां हिंडोनि राहे निश्चळ । वायु व्योमीं ॥ १२५० ॥ तैसा बुद्धी वाचा कायें । जो मातें आश्रऊनि ठाये । तो निषिद्धेंही विपायें । कर्में करूं ॥ १२५१ ॥ परी गंगेच्या संबंधीं । बिदी आणि महानदी । येक तेवीं माझ्या बोधीं । शुभाशुभांसी ॥ १२५२ ॥ कां बावनें आणि धुरें । हा निवाडु तंवचि सरे । जंव न घेपती वैश्वानरें । कवळूनि दोन्ही ॥ १२५३ ॥ ना पांचिकें आणि सोळें । हें सोनया तंवचि आलें । जंव परिसु आंगमेळें । एकवटीना ॥ १२५४ ॥ तैसें शुभाशुभ ऐसें । हें तंवचिवरी आभासे । जंव येकु न प्रकाशे । सर्वत्र मी ॥ १२५५ ॥ अगा रात्री आणि दिवो । हा तंवचि द्वैतभावो । जंव न रिगिजे गांवो । गभस्तीचा ॥ १२५६ ॥ म्हणौनि माझिया भेटी । तयाचीं सर्व कर्में किरीटी । जाऊनि बैसे तो पाटीं । सायुज्याच्या ॥ १२५७ ॥ देशें काळें स्वभावें । वेंचु जया न संभवे । तें पद माझें पावे । अविनाश तो ॥ १२५८ ॥ किंबहुना पंडुसुता । मज आत्मयाची प्रसन्नता । लाहे तेणें न पविजतां । लाभु कवणु असे ॥ १२५९ ॥

चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः । बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥ ५७॥

याकारणें गा तुवां इया । सर्व कर्मा आपुलिया । माझ्या स्वरूपीं धनंजया । संन्यासु कीजे ॥ १२६० ॥ परी तोचि संन्यासु वीरा । करणीयेचा झणें करा । आत्मविवेकीं धरा । चित्तवृत्ति हे ॥ १२६१ ॥ मग तेणें विवेकबळें । आपणपें कर्मावेगळें । माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखिजेल ॥ १२६२ ॥ आणि कर्माचि जन्मभोये । प्रकृति जे का आहे । ते आपणयाहूनि बहुवे । देखसी दूरी ॥ १२६३ ॥ तेथ प्रकृति आपणयां । वेगळी नुरे धनंजया । रूपेंवीण का छाया । जियापरी ॥ १२६४ ॥ ऐसेनि प्रकृतिनाशु । जालया कर्मसंन्यासु । निफजेल अनायासु । सकारणु ॥ १२६५ ॥ मग कर्मजात गेलया । मी आत्मा उरें आपणपयां । तेथ बुद्धि घापे करूनियां । पतिव्रता ॥ १२६६ ॥ बुद्धि अनन्य येणें योगें । मजमाजीं जैं रिगे । तैं चित्त चैत्यत्यागें । मातेंचि भजे ॥ १२६७ ॥ ऐसें चैत्यजातें सांडिलें । चित्त माझ्या ठायीं जडलें । ठाके तैसें वहिलें । सर्वदा करी ॥ १२६८ ॥

मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि । अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनण्‌क्ष्यसि ॥ ५८॥

मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियांचि भरेल जेधवां । माझा प्रसादु जाण तेधवां । संपूर्ण जाहला ॥ १२६९ ॥ तेथ सकळ दुःखधामें । भुंजीजती जियें मृत्युजन्में । तियें दुर्गमेंचि सुगमें । होती तुज ॥ १२७० ॥ सूर्याचेनि सावायें । डोळा सावाइला होये । तैं अंधाराचा आहे । पाडु तया ? ॥ १२७१ ॥ तैसा माझेनि प्रसादें । जीवकणु जयाचा उपमर्दे । तो संसराचेनी बाधे । बागुलें केवीं ? ॥ १२७२ ॥ म्हणौनि धनंजया । तूं संसारदुर्गती यया । तरसील माझिया । प्रसादास्तव ॥ १२७३ ॥ अथवा हन अहंभावें । माझें बोलणें हें आघवें । कानामनाचिये शिंवे । नेदिसी टेंकों ॥ १२७४ ॥ तरी नित्य मुक्त अव्ययो । तूं आहासि तें होऊनि वावो । देहसंबंधाचा घावो । वाजेल आंगीं ॥ १२७५ ॥ जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदीं आत्मघातु । भुंजतां उसंतु । कहींचि नाहीं ॥ १२७६ ॥ येवढेनि दारुणें । निमणेनवीण निमणें । पडेल जरी बोलणें । नेघसी माझें ॥ १२७७ ॥

यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे । मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ ५९॥

पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु । कां दीपद्वेषिया अंधकारु । विवेकद्वेषें अहंकारु । पोषूनि तैसा ॥ १२७८ ॥ स्वदेहा नाम अर्जुनु । परदेहा नाम स्वजनु । संग्रामा नाम मलिनु । पापाचारु ॥ १२७९ ॥ इया मती आपुलिया । तिघां तीन नामें ययां । ठेऊनियां धनंजया । न झुंजें ऐसा ॥ १२८० ॥ जीवामाजीं निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु । तो वायां धाडील नैसर्गिकु । स्वभावोचि तुझा ॥ १२८१ ॥ आणि मी अर्जुन हे आत्मिक । ययां वधु करणें हें पातक । हे मायावांचूनि तात्त्विक । कांहीं आहे ? ॥ १२८२ ॥ आधीं जुंझार तुवां होआवें । मग झुंजावया शस्त्र घेयावें । कां न जुंझावया करावें । देवांगण ॥ १२८३ ॥ म्हणौनि न झुंजणें । म्हणसी तें वायाणें । ना मानूं लोकपणें । लोकदृष्टीही ॥ १२८४ ॥ तऱ्ही न झुंजें ऐसें । निष्टंकीसी जें मानसें । तें प्रकृति अनारिसें । करवीलचि ॥ १२८५ ॥

स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा । कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोपि तत् ॥ ६०॥

पैं पूर्वे वाहतां पाणी । पव्हिजे पश्चिमेचे वाहणीं । तरी आग्रहोचि उरे तें आणी । आपुलिया लेखा ॥ १२८६ ॥ कां साळीचा कणु म्हणे । मी नुगवें साळीपणें । तरी आहे आन करणें । स्वभावासी ? ॥ १२८७ ॥ तैसा क्षात्रंस्कारसिद्धा । प्रकृती घडिलासी प्रबुद्धा । आता नुठी म्हणसी हा धांदा । परी उठवीजसीचि तूं ॥ १२८८ ॥ पैं शौर्य तेज दक्षता । एवमादिक पंडुसुता । गुण दिधले जन्मतां । प्रकृती तुज ॥ १२८९ ॥ तरी तयाचिया समवाया\- । अनुरूप धनंजया । न करितां उगलियां । नयेल असों ॥ १२९० ॥ म्हणौनियां तिहीं गुणीं । बांधिलासि तूं कोदंडपाणी । त्रिशुद्धी निघसी वाहणीं । क्षात्राचिया ॥ १२९१ ॥ ना हें आपुलें जन्ममूळ । न विचारीतचि केवळ । न झुंजें ऐसें अढळ । व्रत जरी घेसी ॥ १२९२ ॥ तरी बांधोनि हात पाये । जो रथीं घातला होये । तो न चाले तरी जाये । दिगंता जेवीं ॥ १२९३ ॥ तैसा तूं आपुलियाकडुनी । मीं कांहींच न करीं म्हणौनि । ठासी परी भरंवसेनि । तूंचि करिसी ॥ १२९४ ॥ उत्तरु वैराटींचा राजा । पळतां तूं कां निघालासी झुंजा ? । हा क्षात्रस्वभावो तुझा । झुंजवील तुज ॥ १२९५ ॥ महावीर अकरा अक्षौहिणी । तुवां येकें नागविले रणांगणीं । तो स्वभावो कोदंडपाणी । झुंजवील तूंतें ॥ १२९६ ॥ हां गा रोगु कायी रोगिया । आवडे दरिद्र दरिद्रिया ? । परी भोगविजे बळिया । अदृष्टें जेणें ॥ १२९७ ॥ तें अदृष्ट अनारिसें । न करील ईश्वरवशें । तो ईश्वरुही असे । हृदयीं तुझ्या ॥ १२९८ ॥

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१॥

सर्व भूतांच्या अंतरीं । हृदय महाअंबरीं । चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरीं । उदयला असे जो ॥ १२९९ ॥ अवस्थात्रय तिन्हीं लोक । प्रकाशूनि अशेख । अन्यथादृष्टि पांथिक । चेवविले ॥ १३०० ॥ वेद्योदकाच्या सरोवरीं । फांकतां विषयकल्हारीं । इंद्रियषट्पदा चारी । जीवभ्रमरातें ॥ १३०१ ॥ असो रूपक हें तो ईश्वरु । सकल भूतांचा अहंकारु । पांघरोनि निरंतरु । उल्हासत असे ॥ १३०२ ॥ स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र । बाहेरी नटी छायाचित्र । चौर्याशीं लक्ष ॥ १३०३ ॥ तया ब्रह्मादिकीटांता । अशेषांही भूतजातां । देहाकार योग्यता । पाहोनि दावी ॥ १३०४ ॥ तेथ जें देह जयापुढें । अनुरूपपणें मांडे । तें भूत तया आरूढे । हें मी म्हणौनि ॥ १३०५ ॥ सूत सूतें गुंतलें । तृण तृणचि बांधलें । कां आत्मबिंबा घेतलें । बाळकें जळीं ॥ १३०६ ॥ तयापरी देहाकारें । आपणपेंचि दुसरें । देखोनि जीव आविष्करें । आत्मबुद्धि ॥ १३०७ ॥ ऐसेनि शरीराकारीं । यंत्रीं भूतें अवधारीं । वाहूनि हालवी दोरी । प्राचीनाची ॥ १३०८ ॥ तेथ जया जें कर्मसूत्र । मांडूनि ठेविलें स्वतंत्र । तें तिये गती पात्र । होंचि लागे ॥ १३०९ ॥ किंबहुना धनुर्धरा । भूतांतें स्वर्गसंसारा । \-माजीं भोवंडी तृणें वारा । आकाशीं जैसा ॥ १३१० ॥ भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे । तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें ॥ १३११ ॥ जैसे चेष्टा आपुलिया । समुद्रादिक धनंजया । चेष्टती चंद्राचिया । सन्निधी येकीं ॥ १३१२ ॥ तया सिंधू भरितें दाटें । सोमकांता पाझरु फुटे । कुमुदांचकोरांचा फिटे । संकोचु तो ॥ १३१३ ॥ तैसीं बीजप्रकृतिवशें । अनेकें भूतें येकें ईशें । चेष्टवीजती तो असे । तुझ्या हृदयीं ॥ १३१४ ॥ अर्जुनपण न घेतां । मी ऐसें जें पंडुसुता । उठतसे तें तत्वता । तयाचें रूप ॥ १३१५ ॥ यालागीं तो प्रकृतीतें । प्रवर्तवील हें निरुतें । आणि तें झुंजवील तूंतें । न झुंजशी जऱ्ही ॥ १३१६ ॥ म्हणौनि ईश्वर गोसावी । तेणें प्रकृती हे नेमावी । तिया सुखें राबवावीं । इंद्रियें आपुलीं ॥ १३१७ ॥ तूं करणें न करणें दोन्हीं । लाऊनि प्रकृतीच्या मानीं । प्रकृतीही कां अधीनी । हृदयस्था जया ॥ १३१८ ॥

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत । तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥ ६२॥

तया अहं वाचा चित्त आंग । देऊनिया शरण रिग । महोदधी कां गांग । रिगालें जैसें ॥ १३१९ ॥ मग तयाचेनि प्रसादें । सर्वोपशांतिप्रमदे । कांतु होऊनिया स्वानंदें । स्वरूपींचि रमसी ॥ १३२० ॥ संभूति जेणें संभवे । विश्रांति जेथें विसंवे । अनुभूतिही अनुभवे । अनुभवा जया ॥ १३२१ ॥ तिये निजात्मपदींचा रावो । होऊनि ठाकसी अव्यवो । म्हणे लक्ष्मीनाहो । पार्था तूं गा ॥ १३२२ ॥

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया । विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ ६३॥

हें गीता नाम विख्यात । सर्ववाङ्गमयाचें मथित । आत्मा जेणें हस्तगत । रत्न होय ॥ १३२३ ॥ ज्ञान ऐसिया रूढी । वेदांतीं जयाची प्रौढी । वानितां कीर्ति चोखडी । पातली जगीं ॥ १३२४ ॥ बुद्ध्यादिकें डोळसें । हें जयाचें कां कडवसें । मी सर्वद्रष्टाही दिसें । पाहला जया ॥ १३२५ ॥ तें हें गा आत्मज्ञान । मज गोप्याचेंही गुप्त धन । परी तूं म्हणौनि आन । केवीं करूं ? ॥ १३२६ ॥ याकारणें गा पांडवा । आम्हीं आपुला हा गुह्य ठेवा । तुज दिधला कणवा । जाकळिलेपणें ॥ १३२७ ॥ जैसी भुलली वोरसें । माय बोले बाळा दोषें । प्रीति ही परी तैसें । न करूंचि हो ॥ १३२८ ॥ येथ आकाश आणि गाळिजे । अमृताही साली फेडिजे । कां दिव्याकरवीं करविजे । दिव्य जैसे ॥ १३२९ ॥ जयाचेनि अंगप्रकाशें । पाताळींचा परमाणु दिसे । तया सूर्याहि का जैसे । अंजन सूदलें ॥ १३३० ॥ तैसें सर्वज्ञेंही मियां । सर्वही निर्धारूनियां । निकें होय तें धनंजया । सांगितलें तुज ॥ १३३१ ॥ आतां तूं ययावरी । निकें हें निर्धारीं । निर्धारूनि करीं । आवडे तैसें ॥ १३३२ ॥ यया देवाचिया बोला । अर्जुनु उगाचि ठेला । तेथ देवो म्हणती भला । अवंचकु होसी ॥ १३३३ ॥ वाढतयापुढें भुकेला । उपरोधें म्हणे मी धाला । तैं तोचि पीडे आपुला । आणि दोषुही तया ॥ १३३४ ॥ तैसा सर्वज्ञु श्रीगुरु । भेटलिया आत्मनिर्धारु । न पुसिजे जैं आभारु । धरूनियां ॥ १३३५ ॥ तैं आपणपेंचि वंचे । आणि पापही वंचनाचें । आपणयाचि साचें । चुकविलें तेणें ॥ १३३६ ॥ पैं उगेपणा तुझिया । हा अभिप्रावो कीं धनंजया । जें एकवेळ आवांकुनियां । सांगावें ज्ञान ॥ १३३७ ॥ तेथ पार्थु म्हणे दातारा । भलें जाणसी माझिया अंतरा । हें म्हणों तरी दुसरा । जाणता असे काई ? ॥ १३३८ ॥ येर ज्ञेय हें जी आघवें । तूं ज्ञाता एकचि स्वभावें । मा सूर्यु म्हणौनि वानावें । सूर्यातें काई ? ॥ १३३९ ॥ या बोला श्रीकृष्णें । म्हणितलें काय येणें । हेंचि थोडें गा वानणें । जें बुझतासि तूं ॥ १३४० ॥

सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः । इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥ ६४॥

तरी अवधान पघळ । करूनियाम् आणिक येक वेळ । वाक्य माझें निर्मळ । अवधारीं पां ॥ १३४१ ॥ हें वाच्य म्हणौनि बोलिजे । कां श्राव्य मग आयिकिजे । तैसें नव्हें परी तुझें । भाग्य बरवें ॥ १३४२ ॥ कूर्मीचिया पिलियां । दिठी पान्हा ये धनंजया । कां आकाश वाहे बापिया । घरींचें पाणी ॥ १३४३ ॥ जो व्यवहारु जेथ न घडे । तयाचें फळचि तेथ जोडे । काय दैवें न सांपडे । सानुकूळें ? ॥ १३४४ ॥ येऱ्हवीं द्वैताची वारी । सारूनि ऐक्याच्या परीवरीं । भोगिजे तें अवधारीं । रहस्य हें ॥ १३४५ ॥ आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जें प्रियोत्तमा । तें दुजें नव्हे कीं आत्मा । ऐसेंचि जाणावें ॥ १३४६ ॥ आरिसाचिया देखिलया । गोमटें कीजे धनंजया । तें तया नोहे आपणयां । लागीं जैसें ॥ १३४७ ॥ तैसें पार्था तुझेनि मिषें । मी बोलें आपणयाचि उद्देशें । माझ्या तुझ्या ठाईं असे । मीतूंपण गा ॥ १३४८ ॥ म्हणौनि जिव्हारींचें गुज । सांगतसे जीवासी तुज । हें अनन्यगतीचें मज । आथी व्यसन ॥ १३४९ ॥ पैम् जळा आपणपें देतां । लवण भुललें पंडुसुता । कीं आघवें तयाचें होतां । न लजेचि तें ॥ १३५० ॥ तैसा तूं माझ्या ठाईं । राखों नेणसीचि कांहीं । तरी आतां तुज काई । गोप्य मी करूं ? ॥ १३५१ ॥ म्हणौनि आघवींचि गूढें । जें पाऊनि अति उघडें । तें गोप्य माझें चोखडें । वाक्य आइक ॥ १३५२ ॥

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ ६५॥

तरी बाह्य आणि अंतरा । आपुलिया सर्व व्यापारा । मज व्यापकातें वीरा । विषयो करीं ॥ १३५३ ॥ आघवा आंगीं जैसा । वायु मिळोनि आहे आकाशा । तूं सर्व कर्मीं तैसा । मजसींचि आस ॥ १३५४ ॥ किंबहुना आपुलें मन । करीं माझें एकायतन । माझेनि श्रवणें कान । भरूनि घालीं ॥ १३५५ ॥ आत्मज्ञानें चोखडीं । संत जे माझीं रूपडीं । तेथ दृष्टि पडो आवडी । कामिनी जैसी ॥ १३५६ ॥ मीं सर्व वस्तीचें वसौटें । माझीं नामें जियें चोखटें । तियें जियावया वाटे । वाचेचिये लावीं ॥ १३५७ ॥ हातांचें करणें । कां पायांचें चालणें । तें होय मजकारणें । तैसें करीं ॥ १३५८ ॥ आपुला अथवा परावा । ठायीं उपकरसी पांडवा । तेणें यज्ञें होईं बरवा । याज्ञिकु माझा ॥ १३५९ ॥ हें एकैक शिकऊं काई । पैं सेवकें आपुल्या ठाईं । उरूनि येर सर्वही । मी सेव्यचि करीं ॥ १३६० ॥ तेथ जाऊनिया भूतद्वेषु । सर्वत्र नमवैन मीचि एकु । ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु । लाहसी तूं माझा ॥ १३६१ ॥ मग भरलेया जगाआंतु । जाऊनि तिजयाची मातु । होऊनि ठायील एकांतु । आम्हां तुम्हां ॥ १३६२ ॥ तेव्हां भलतिये आवस्थे । मी तूतें तूं मातें । भोगिसी ऐसें आइतें । वाढेल सुख ॥ १३६३ ॥ आणि तिजें आडळ करितें । निमालें अर्जुना जेथें । तें मीचि म्हणौनि तूं मातें । पावसी शेखीं ॥ १३६४ ॥ जैसी जळींची प्रतिभा । जळनाशीं बिंबा । येतां गाभागोभा । कांहीं आहे ? ॥ १३६५ ॥ पैं पवनु अंबरा । कां कल्लोळु सागरा । मिळतां आडवारा । कोणाचा गा ? ॥ १३६६ ॥ म्हणौनि तूं आणि आम्हीं । हें दिसताहे देहधर्मीं । मग ययाच्या विरामीं । मीचि होसी ॥ १३६७ ॥ यया बोलामाझारीं । होय नव्हे झणें करीं । येथ आन आथी तरी । तुझीचि आण ॥ १३६८ ॥ पैं तुझी आण वाहणें । हें आत्मलिंगातें शिवणें । प्रीतीची जाति लाजणें । आठवों नेदी ॥ १३६९ ॥ येऱ्हवीं वेद्यु निष्प्रपंचु । जेणें विश्वाभासु हा साचु । आज्ञेचा नटनाचु । काळातें जिणें ॥ १३७० ॥ तो देवो मी सत्यसंकल्पु । आणि जगाच्या हितीं बापु । मा आणेचा आक्षेपु । कां करावा ? ॥ १३७१ ॥ परी अर्जुना तुझेनि वेधें । मियां देवपणाचीं बिरुदें । सांडिलीं गा मी हे आधें । सगळेनि तुवां ॥ १३७२ ॥ पैं काजा आपुलिया । रावो आपुली आपणया । आण वाहे धनंजया । तैसें हें कीं ॥ १३७३ ॥ तेथ अर्जुनु म्हणे देवें । अचाट हें न बोलावें । जे आमचें काज नांवें । तुझेनि एके ॥ १३७४ ॥ यावरी सांगों बैससी । कां सांगतां भाषही देसी । या तुझिया विनोदासी । पारु आहे जी ? ॥ १३७५ ॥ कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु । तेथ आघवाचि प्रकाशु । नित्य दे तो ॥ १३७६ ॥ पृथ्वी निवऊनि सागर । भरीजती येवढें थोर । वर्षे तेथ मिषांतर । चातकु कीं ॥ १३७७ ॥ म्हणौनि औदार्या तुझेया । मज निमित्त ना म्हणावया । प्राप्ति असे दानीराया । कृपानिधी ॥ १३७८ ॥ तंव देवो म्हणती राहें । या बोलाचा प्रस्तावो नोहे । पैं मातें पावसी उपायें । साचचि येणें ॥ १३७९ ॥ सैंधव सिंधू पडलिया । जो क्षणु धनंजया । तेणें विरेचि कीं उरावया । कारण कायी ? ॥ १३८० ॥ तैसें सर्वत्र मातें भजतां । सर्व मी होतां अहंता । निःशेष जाऊनि तत्वता । मीचि होसी ॥ १३८१ ॥ एवं माझिये प्राप्तीवरी । कर्मालागोनि अवधारीं । दाविली तुज उजरी । उपायांची ॥ १३८२ ॥ जे आधीं तंव पंडुसुता । सर्व कर्में मज अर्पितां । सर्वत्र प्रसन्नता । लाहिजे माझी ॥ १३८३ ॥ पाठीं माझ्या इये प्रसादीं । माझें ज्ञान जाय सिद्धी । तेणें मिसळिजे त्रिशुद्धी । स्वरूपीं माझ्या ॥ १३८४ ॥ मग पार्था तिये ठायीं । साध्य साधन होय नाहीं । किंबहुना तुज कांहीं । उरेचि ना ॥ १३८५ ॥ तरी सर्व कर्में आपलीं । तुवां सर्वदा मज अर्पिलीं । तेणें प्रसन्नता लाधली । आजि हे माझी ॥ १३८६ ॥ म्हणौनि येणें प्रसादबळें । नव्हे झुंजाचेनि आडळें । न ठाकेचि येकवेळे । भाळलों तुज ॥ १३८७ ॥ जेणें सप्रपंच अज्ञान जाये । एकु मी गोचरु होये । तें उपपत्तीचेनि उपायें । गीतारूप हें ॥ १३८८ ॥ मियां ज्ञान तुज आपुलें । नानापरी उपदेशिलें । येणें अज्ञानजात सांडी वियालें । धर्माधर्म जें ॥ १३८९ ॥

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ ६६॥

आशा जैसी दुःखातें । व्यालीं निंदा दुरितें । हे असो जैसें दैन्यातें । दुर्भगत्व ॥ १३९० ॥ तैसें स्वर्गनरकसूचक । अज्ञान व्यालें धर्मादिक । तें सांडूनि घालीं अशेख । ज्ञानें येणें ॥ १३९१ ॥ हातीं घेऊन तो दोरु । सांडिजे जैसा सर्पाकारु । कां निद्रात्यागें घराचारु । स्वप्नींचा जैसा ॥ १३९२ ॥ नाना सांडिलेनि कवळें । चंद्रींचें धुये पिंवळें । व्याधित्यागें कडुवाळें\- । पण मुखाचें ॥ १३९३ ॥ अगा दिवसा पाठीं देउनी । मृगजळ घापे त्यजुनी । कां काष्ठत्यागें वन्ही । त्यजिजे जैसा ॥ १३९४ ॥ तैसें धर्माधर्माचें टवाळ । दावी अज्ञान जें कां मूळ । तें त्यजूनि त्यजीं सकळ । धर्मजात ॥ १३९५ ॥ मग अज्ञान निमालिया । मीचि येकु असे अपैसया । सनिद्र स्वप्न गेलया । आपणपें जैसें ॥ १३९६ ॥ तैसा मी एकवांचूनि कांहीं । मग भिन्नाभिन्न आन नाहीं । सोऽहंबोधें तयाच्या ठायीं । अनन्यु होय ॥ १३९७ ॥ पैंं आपुलेनि भेदेंविण । माझें जाणिजे जें एकपण । तयाचि नांव शरण । मज यीणें गा ॥ १३९८ ॥ जैसें घटाचेनि नाशें । गगनीं गगन प्रवेशे । मज शरण येणें तैसें । ऐक्य करी ॥ १३९९ ॥ सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया । तैसा मज धनंजया । शरण ये तूं ॥ १४०० ॥ वांचूनि सागराच्या पोटीं । वडवानळु शरण आला किरीटी । जाळूनि ठाके तया गोठी । वाळूनि दे पां ॥ १४०१ ॥ मजही शरण रिघिजे । आणि जीवत्वेंचि असिजे । धिग् बोली यिया न लजे । प्रज्ञा केवीं ॥ १४०२ ॥ अगा प्राकृताही राया । आंगीं पडे जें धनंजया । तें दासिरूंहि कीं तया । समान होय ॥ १४०३ ॥ मा मी विश्वेश्वरु भेटे । आणि जीवग्रंथी न सुटे । हे बोल नको वोखटें । कानीं लाऊं ॥ १४०४ ॥ म्हणौनि मी होऊनि मातें । सेवणें आहे आयितें । तें करीं हातां येतें । ज्ञानें येणें ॥ १४०५ ॥ मग ताकौनियां काढिलें । लोणी मागौतें ताकीं घातलें । परी न घेपेचि कांहींं केलें । तेणें जेवीं ॥ १४०६ ॥ तैसें अद्वयत्वें मज । शरण रिघालिया तुज । धर्माधर्म हे सहज । लागतील ना ॥ १४०७ ॥ लोह उभें खाय माती । तें परीसाचिये संगतीं । सोनें जालया पुढती । न शिविजे मळें ॥ १४०८ ॥ हें असो काष्ठापासोनि । मथूनि घेतलिया वन्ही । मग काष्ठेंही कोंडोनी । न ठके जैसा ॥ १४०९ ॥ अर्जुना काय दिनकरु । देखत आहे अंधारु । कीं प्रबोधीं होय गोचरु । स्वप्नभ्रमु । ॥ १४१० ॥ तैसें मजसी येकवटलेया । मी सर्वरूप वांचूनियां । आन कांहीं उरावया । कारण असे ? ॥ १४११ ॥ म्हणौनि तयाचें कांहीं । चिंतीं न आपुल्या ठायीं । तुझें पापपुण्य पाहीं । मीचि होईन ॥ १४१२ ॥ तेथ सर्वबंधलक्षणें । पापें उरावें दुजेपणें । तें माझ्या बोधीं वायाणें । होऊनि जाईल ॥ १४१३ ॥ जळीं पडिलिया लवणा । सर्वही जळ होईल विचक्षणा । तुज मी अनन्यशरणा । होईन तैसा ॥ १४१४ ॥ येतुलेनि आपैसया । सुटलाचि आहसी धनंजया । घेईं मज प्रकाशोनियां । सोडवीन तूंतें ॥ १४१५ ॥ याकारणें पुढती । हे आधी न वाहे चित्तीं । मज एकासि ये सुमती । जाणोनि शरण ॥ १४१६ ॥ ऐसें सर्वरूपरूपसें । सर्वदृष्टिडोळसें । सर्वदेशनिवासें । बोलिलें श्रीकृष्णें ॥ १४१७ ॥ मग सांवळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु । आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो ॥ १४१८ ॥ न पवतां जयातें । काखे सूनि बुद्धीतें । बोंलणें मागौतें । वोसरलें ॥ १४१९ ॥ ऐसें जें कांहीं येक । बोला बुद्धीसिही अटक । तें द्यावया मिष । खेवाचें केलें ॥ १४२० ॥ हृदया हृदय येक जाले । ये हृदयींचें ते हृदयीं घातलें । द्वैत न मोडितां केलें । आपणा{ऐ}सें अर्जुना ॥ १४२१ ॥ दीपें दीप लाविला । तैसा परीष्वंगु तो जाला । द्वैत न मोडितां केला । आपणपें पार्थुं ॥ १४२२ ॥ तेव्हां सुखाचा मग तया । पूरु आला जो धनंजया । तेथ वाडु तऱ्हीं बुडोनियां ॥ ठेला देवो ॥ १४२३॥ सिंधु सिंधूतें पावों जाये । तें पावणें ठाके दुणा होये । वरी रिगे पुरवणिये । आकाशही ॥ १४२४ ॥ तैसें तयां दोघांचें मिळणें । दोघां नावरे जाणावें कवणें । किंबहुना श्रीनारायणें । विश्व कोंदलें ॥ १४२५ ॥ एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र । श्रीकृष्णें गीताशास्त्र । प्रकट केलें ॥ १४२६ ॥ येथ गीता मूळ वेदां । ऐसें केवीं पां आलें बोधा । हें म्हणाल तरी प्रसिद्धा । उपपत्ति सांगों ॥ १४२७ ॥ तरी जयाच्या निःश्वासीं । जन्म झाले वेदराशी । तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं । बोलला स्वमुखें ॥ १४२८ ॥ म्हणौनि वेदां मूळभूत । गीता म्हणों हें होय उचित । आणिकही येकी येथ । उपपत्ति असे ॥ १४२९ ॥ जें न नशतु स्वरूपें । जयाचा विस्तारु जेथ लपे । तें तयांचें म्हणिपे । बीज जगीं ॥ १४३० ॥ तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु । गीतेमाजीं असे रुखु । बीजीं जैसा ॥ १४३१ ॥ म्हणौनि वेदांचें बीज । श्रीगीता होय हें मज । गमे आणि सहज । दिसतही आहे ॥ १४३२ ॥ जे वेदांचे तिन्ही भाग । गीते उमटले असती चांग । भूषणरत्नीं सर्वांग । शोभलें जैसें ॥ १४३३ ॥ तियेचि कर्मादिकें तिन्ही । कांडें कोणकोणे स्थानीं । गीते आहाति तें नयनीं । दाखऊं आईक ॥ १४३४ ॥ तरी पहिला जो अध्यावो । तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्तावो । द्वितीयीं साङ्ख्यसद्भावो । प्रकाशिला ॥ १४३५ ॥ मोक्षदानीं स्वतंत्र । ज्ञानप्रधान हें शास्त्र । येतुलालें दुजीं सूत्र । उभारिलें ॥ १४३६ ॥ मग अज्ञानें बांधलेयां । मोक्षपदीं बैसावया । साधनारंभु तो तृतीया\- । ध्यायीं बोलिला ॥ १४३७ ॥ जे देहाभिमान बंधें । सांडूनि काम्यनिषिद्धें । विहित परी अप्रमादें । अनुष्ठावें ॥ १४३८ ॥ ऐसेनि सद्भावें कर्म करावें । हा तिजा अध्यावो जो देवें । निर्णय केला तें जाणावें । कर्मकांड येथ ॥ १४३९ ॥ आणि तेंचि नित्यादिक । अज्ञानाचें आवश्यक । आचरतां मोंचक । केवीं होय पां ॥ १४४० ॥ ऐसी अपेक्षा जालिया । बद्ध मुमुक्षुते आलिया । देवें ब्रह्मार्पणत्वें क्रिया । सांगितली ॥ १४४१ ॥ जे देहवाचामानसें । विहित निपजे जें जैसें । तें एक ईश्वरोद्देशें । कीजे म्हणितलें ॥ १४४२ ॥ हेंचि ईश्वरीं कर्मयोगें । भजनकथनाचें खागें । आदरिलें शेषभागें । चतुर्थाचेनी ॥ १४४३ ॥ तें विश्वरूप अकरावा । अध्यावो संपे जंव आघवा । तंव कर्में ईशु भजावा । हें जें बोलिलें ॥ १४४४ ॥ तें अष्टाध्यायीं उघड । जाण येथें देवताकांड । शास्त्र सांगतसे आड । मोडूनि बोलें ॥ १४४५ ॥ आणि तेणेंचि ईशप्रसादें । श्रीगुरुसंप्रदायलब्धें । साच ज्ञान उद्बोधे । कोंवळें जें ॥ १४४६ ॥ तें अद्वेष्टादिप्रभृतिकीं । अथवा अमानित्वादिकीं । वाढविजे म्हणौनि लेखी । बारावा गणूं ॥ १४४७ ॥ तो बारावा अध्याय आदी । आणि पंधरावा अवधी । ज्ञानफळपाकसिद्धी । निरूपणासीं ॥ १४४८ ॥ म्हणौनि चहूंही इहीं । ऊर्ध्वमूळांतीं अध्यायीं । ज्ञानकांड ये ठायीं । निरूपिजे ॥ १४४९ ॥ एवं कांडत्रयनिरूपणी । श्रुतीचि हे कोडिसवाणी । गीतापद्यरत्नांचीं लेणीं । लेयिली आहे ॥ १४५० ॥ हें असो कांडत्रयात्मक । श्रुति मोक्षरूप फळ येक । बोभावे जें आवश्यक । ठाकावें म्हणौनि ॥ १४५१ ॥ तयाचेनि साधन ज्ञानेंसीं । वैर करी जो प्रतिदिवशीं । तो अज्ञानवर्ग षोडशीं । प्रतिपादिजे ॥ १४५२ ॥ तोचि शास्त्राचा बोळावा । घेवोनि वैरी जिणावा । हा निरोपु तो सतरावा । अध्याय येथ ॥ १४५३ ॥ ऐसा प्रथमालागोनि । सतरावा लाणी करूनी । आत्मनिश्वास विवरूनी । दाविला देवें ॥ १४५४ ॥ तया अर्थजातां अशेषां । केला तात्पर्याचा आवांका । तो हा अठरावा देखा । कलशाध्यायो ॥ १४५५ ॥ एवं सकळसंख्यासिद्धु । श्रीभागवद्गीता प्रबंधु । हा औदार्यें आगळा वेदु । मूर्तु जाण ॥ १४५६ ॥ वेदु संपन्नु होय ठाईं । परी कृपणु ऐसा आनु नाहीं । जे कानीं लागला तिहीं । वर्णांच्याचि ॥ १४५७ ॥ येरां भवव्याथा ठेलियां । स्त्रीशूद्रादिकां प्राणियां । अनवसरू मांडूनियां । राहिला आहे ॥ १४५८ ॥ तरी मज पाहतां तें मागील उणें । फेडावया गीतापणें । वेदु वेठला भलतेणें । सेव्य होआवया ॥ १४५९ ॥ ना हे अर्थु रिगोनि मनीं । श्रवणें लागोनि कानीं । जपमिषें वदनीं । वसोनियां ॥ १४६० ॥ ये गीतेचा पाठु जो जाणे । तयाचेनि सांगातीपणें । गीता लिहोनि वाहाणें । पुस्तकमिषें ॥ १४६१ ॥ ऐसैसा मिसकटां । संसाराचा चोहटा । गवादी घालीत चोखटा । मोक्षसुखाची ॥ १४६२ ॥ परी आकाशीं वसावया । पृथ्वीवरी बैसावया । रविदीप्ति राहाटावया । आवारु नभ ॥ १४६३ ॥ तेवीं उत्तम अधम ऐसें । सेवितां कवणातेंही न पुसे । कैवल्यदानें सरिसें । निववीत जगा ॥ १४६४ ॥ यालागीं मागिली कुटी । भ्याला वेदु गीतेच्या पोटीं । रिगाला आतां गोमटी । कीर्ति पातला ॥ १४६५ ॥ म्हणौनि वेदाची सुसेव्यता । ते हे मूर्त जाण श्रीगीता । श्रीकृष्णें पंडुसुता । उपदेशिली ॥ १४६६ ॥ परी वत्साचेनि वोरसें । दुभतें होय घरोद्देशें । जालें पांडवाचेनि मिषें । जगदुद्धरण ॥ १४६७ ॥ चातकाचियें कणवें । मेघु पाणियेसिं धांवे । तेथ चराचर आघवें । निवालें जेवीं ॥ १४६८ ॥ कां अनन्यगतिकमळा\- । लागीं सूर्य ये वेळोवेळां । कीं सुखिया होईजे डोळां । त्रिभुवनींचा ॥ १४६९ ॥ तैसें अर्जुनाचेनि व्याजें । गीता प्रकाशूनि श्रीराजें । संसारायेवढें थोर ओझें । फेडिलें जगाचें ॥ १४७० ॥ सर्वशास्त्ररत्नदीप्ती । उजळिता हा त्रिजगतीं । सूर्यु नव्हें लक्ष्मीपती । वक्त्राकाशींचा ॥ १४७१ ॥ बाप कुळ तें पवित्र । जेथिंचा पार्थु या ज्ञाना पात्र । जेणें गीता केलें शास्त्र । आवारु जगा ॥ १४७२ ॥ हें असो मग तेणें । सद्गुरु श्रीकृष्णें । पार्थाचें मिसळणें । आणिलें द्वैता ॥ १४७३ ॥ पाठीं म्हणतसे पांडवा । शास्त्र हें मानलें कीं जीवा । तेथ येरु म्हणे देवा । आपुलिया कृपा ॥ १४७४ ॥ तरी निधान जोडावया । भाग्य घडे गा धनंजया । परी जोडिलें भोगावया । विपायें होय ॥ १४७५ ॥ पैं क्षीरसागरायेवढें । अविरजी दुधाचें भांडें । सुरां असुरां केवढें । मथितां जालें ॥ १४७६ ॥ तें सायासही फळा आलें । जें अमृतही डोळां देखिलें । परी वरिचिली चुकलें । जतनेतें ॥ १४७७ ॥ तेथ अमरत्वा वोगरिलें । तें मरणाचिलागीं जालें । भोगों नेणतां जोडलें । ऐसें आहे ॥ १४७८ ॥ नहुषु स्वर्गाधिपति जाहला । परी राहाटीं भांबावला । तो भुजंगत्व पावला । नेणसी कायी ? ॥ १४७९ ॥ म्हणौनि बहुत पुण्य तुवां । केलें तेणें धनंजया । आजि शास्त्रराजा इया । जालासि विषयो ॥ १४८० ॥ तरी ययाचि शास्त्राचेनि । संप्रदायें पांघुरौनि । शास्त्रार्थ हा निकेनि । अनुष्ठीं हो ॥ १४८१ ॥ येऱ्हवीं अमृतमंथना\- । सारिखें होईल अर्जुना । जरी रिघसी अनुष्ठाना । संप्रदायेंवीण ॥ १४८२ ॥ गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी । जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची ॥ १४८३ ॥ तैसा श्रीगुरु प्रसन्न होये । शिष्य विद्याही कीर लाहे । परी ते फळे संप्रदायें । उपासिलिया ॥ १४८४ ॥ म्हणौनि शास्त्रीं जो इये । उचितु संप्रदायो आहे । तो ऐक आतां बहुवें । आदरेंसीं ॥ १४८५ ॥

इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन । न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ ६७॥

तरी तुवां हें जें पार्था । गीताशास्त्र लाधलें आस्था । तें तपोहीना सर्वथा । सांगावें ना हो ॥ १४८६ ॥ अथवा तापसुही जाला । परी गुरूभक्तीं जो ढिला । तो वेदीं अंत्यजु वाळिळा । तैसा वाळीं ॥ १४८७ ॥ नातरी पुरोडाशु जैसा । न घापे वृद्ध तरी वायसा । गीता नेदी तैसी तापसा । गुरुभक्तिहीना ॥ १४८८ ॥ कां तपही जोडे देहीं । भजे गुरुदेवांच्या ठायीं । परी आकर्णनीं नाहीं । चाड जरी ॥ १४८९ ॥ तरी मागील दोन्हीं आंगीं । उत्तम होय कीर जगीं । परी या श्रवणालागीं । योग्यु नोहे ॥ १४९० ॥ मुक्ताफळ भलतैसें । हो परी मुख नसे । तंव गुण प्रवेशे । तेथ कायी ? ॥ १४९१ ॥ सागरु गंभीरु होये । हें कोण ना म्हणत आहे । परी वृष्टि वायां जाये । जाली तेथ ॥ १४९२ ॥ धालिया दिव्यान्न सुवावें । मग जें वायां धाडावें । तें आर्तीं कां न करावें । उदारपण ॥ १४९३ ॥ म्हणौनि योग्य भलतैसें । होतु परी चाड नसे । तरी झणें वानिवसें । देसी हें तयां ॥ १४९४ ॥ रूपाचा सुजाणु डोळा । वोढवूं ये कायि परिमळा ? । जेथ जें माने ते फळा । तेथचि ते गा ॥ १४९५ ॥ म्हणौनि तपी भक्ति । पाहावे ते सुभद्रापती । परी शास्त्रश्रवणीं अनासक्ती । वाळावेचि ते ॥ १४९६ ॥ नातरी तपभक्ति । होऊनि श्रवणीं आर्ति । आथी ऐसीही आयती । देखसी जरी ॥ १४९७ ॥ तरी गीताशास्त्रनिर्मिता । जो मी सकळलोकशास्ता । तया मातें सामान्यता । बोलेल जो ॥ १४९८ ॥ माझ्या सज्जनेंसिं मातें । पैशुन्याचेनि हातें । येक आहाती तयांतें । योग्य न म्हण ॥ १४९९ ॥ तयांची येर आघवी । सामग्री ऐसी जाणावी । दीपेंवीण ठाणदिवी । रात्रीची जैसी ॥ १५०० ॥ अंग गोरें आणि तरुणें । वरी लेईलें आहे लेणें । परी येकलेनि प्राणें । सांडिलें जेवीं ॥ १५०१ ॥ सोनयाचें सुंदर । निर्वाळिलें होय घर । परी सर्पांगना द्वार । रुंधलें आहे ॥ १५०२ ॥ निपजे दिव्यान्न चोखट । परी माजीं काळकूट । असो मैत्री कपट\- । गर्भिणी जैसी ॥ १५०३ ॥ तैसी तपभक्तिमेधा । तयाची जाण प्रबुद्धा । जो माझयांची कां निंदा । माझीचि करी ॥ १५०४ ॥ याकारणें धनंजया । तो भक्तु मेधावीं तपिया । तरी नको बापा इया । शास्त्रा आतळों देवों ॥ १५०५ ॥ काय बहु बोलों निंदका । योग्य स्रष्टयाहीसारिखा । गीता हे कवतिका\- । लागींही नेदीं ॥ १५०६ ॥ म्हणौनि तपाचा धनुर्धरा । तळीं दाटोनि गाडोरा । वरी गुरुभक्तीचा पुरा । प्रासादु जो जाला ॥ १५०७ ॥ आणि श्रवणेच्छेचा पुढां । दारवंटा सदा उघडा । वरी कलशु चोखडा । अनिंदारत्नांचा ॥ १५०८ ॥

य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति । भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ ६८॥

ऐशा भक्तालयीं चोखटीं । गीतारत्नेश्वरु हा प्रतिष्ठीं । मग माझिया संवसाटी । तुकसी जगीं ॥ १५०९ ॥ कां जे एकाक्षरपणेंसीं । त्रिमात्रकेचिये कुशीं । प्रणवु होतां गर्भवासीं । सांकडला ॥ १५१० ॥ तो गीतेचिया बाहाळींं । वेदबीज गेलें पाहाळी.ण् । कीं गायत्री फुलींफळीं । श्लोकांच्या आली ॥ १५११ ॥ ते हे मंत्ररहय गीता । मेळवी जो माझिया भक्ता । अनन्यजीवना माता । बाळका जैसी ॥ १५१२ ॥ तैसी भक्तां गीतेसीं । भेटी करी जो आदरेंसीं । तो देहापाठीं मजसीं । येकचि होय ॥ १५१३ ॥

न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः । भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ ६९॥

आणि देहाचेंही लेणें । लेऊनि वेगळेपणें । असे तंव जीवेंप्राणें । तोचि पढिये ॥ १५१४ ॥ ज्ञानियां कर्मठां तापसां । यया खुणेचिया माणुसां\- । माजीं तो येकु गा जैसा । पढिये मज ॥ १५१५ ॥ तैसा भूतळीं आघवा । आन न देखे पांडवा । जो गीता सांगें मेळावा । भक्तजनांचा ॥ १५१६ ॥ मज ईश्वराचेनि लोभें । हे गीता पढतां अक्षोभें । जो मंडन होय सभे । संतांचिये ॥ १५१७ ॥ नेत्रपल्लवीं रोमांचितु । मंदानिळें कांपवितु । आमोदजळें वोलवितु । फुलांचे डोळें ॥ १५१८ ॥ कोकिळा कलरवाचेनि मिषें । सद्गद बोलवीत जैसें । वसंत का प्रवेशे । मद्भक्त आरामीं ॥ १५१९ ॥ कां जन्माचें फळ चकोरां । होत जैं चंद्र ये अंबरा । नाना नवघन मयूरां । वो देत पावे ॥ १५२० ॥ तैसा सज्जनांच्या मेळापीं । गीतापद्यरत्नीं उमपीं । वर्षे जो माझ्या रूपीं । हेतु ठेऊनि ॥ १५२१ ॥ मग तयाचेनि पाडें । पढियंतें मज फुडें । नाहींचि गा मागेंपुढें । न्याहाळितां ॥ १५२२ ॥ अर्जुना हा ठायवरी । मी तयातें सूयें जिव्हारीं । जो गीतार्थाचें करी । परगुणें संतां ॥ १५२३ ॥

अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः । ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ ७०॥

पैं माझिया तुझिया मिळणीं । वाढिनली जे हे कहाणी । मोक्षधर्म का जिणीं । आलासे जेथें ॥ १५२४ ॥ तो हा सकळार्थप्रबोधु । आम्हां दोघांचा संवादु । न करितां पदभेदु । पाठेंचि जो पढे ॥ १५२५ ॥ तेणें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । मूळ अविद्येचिया आहुती । तोषविला होय सुमती । परमात्मा मी ॥ १५२६ ॥ घेऊनि गीतार्थ उगाणा । ज्ञानिये जें विचक्षणा । ठाकती तें गाणावाणा । गीतेचा तो लाहे ॥ १५२७ ॥ गीता पाठकासि असे । फळ अर्थज्ञाचि सरिसें । गीता माउलियेसि नसे । जाणें तान्हें ॥ १५२८ ॥

श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः । सोऽपि मुक्तः शुभा.ण्ल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ॥ ७१॥

आणि सर्वमार्गीं निंदा । सांडूनि आस्था पैं शुद्धा । गीताश्रवणीं श्रद्धा । उभारी जो ॥ १५२९ ॥ तयाच्या श्रवणपुटीं । गीतेचीं अक्षरें जंव पैठीं । होतीना तंव उठाउठीं । पळेचि पाप ॥ १५३० ॥ अटवियेमाजीं जैसा । वन्हि रिघतां सहसा । लंघिती का दिशा । वनौकें तियें ॥ १५३१ ॥ कां उदयाचळकुळीं । झळकतां अंशुमाळी । तिमिरें अंतराळीं । हारपती ॥ १५३२ ॥ तैसा कानाच्या महाद्वारीं । गीता गजर जेथ करी । तेथ सृष्टीचिये आदिवरी । जायचि पाप ॥ १५३३ ॥ ऐसी जन्मवेली धुवट । होय पुण्यरूप चोखट । याहीवरी अचाट । लाहे फळ ॥ १५३४ ॥ जें इये गीतेचीं अक्षरें । जेतुलीं कां कर्णद्वारें । रिघती तेतुले होती पुरे । अश्वमेध कीं ॥ १५३५ ॥ म्हणौनि श्रवणें पापें जाती । आणि धर्म धरी उन्नती । तेणें स्वर्गराज संपत्ती । लाहेचि शेखीं ॥ १५३६ ॥ तो पैं मज यावयालागीं । पहिलें पेणें करी स्वर्गीं । मग आवडे तंव भोगी । पाठीं मजचि मिळे ॥ १५३७ ॥ ऐसी गीता धनंजया । ऐकतया आणि पढतया । फळे महानंदें मियां । बहु काय बोलों ॥ १५३८ ॥ याकारणें हें असो । परी जयालागीं शास्त्रातिसो । केला तें तंव तुज पुसों । काज तुझें ॥ १५३९ ॥

कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा । कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥ ७२॥

तरी सांग पां पांडवा । हा शास्त्रसिद्धांतु आघवा । तुज एकचित्तें फावा । गेला आहे ? ॥ १५४० ॥ आम्हीं जैसें जया रीतीं । उगाणिलें कानांच्या हातीं । येरीं तैसेंचि तुझ्या चित्तीं । पेठें केलें कीं ? ॥ १५४१ ॥ अथवा माझारीं । गेलें सांडीविखुरी । किंवा उपेक्षेवरी । वाळूनि सांडिलें । ॥ १५४२ ॥ जैसें आम्हीं सांगितलें । तैसेंचि हृदयीं फावलें । तरी सांग पां वहिलें । पुसेन तें मी ॥ १५४३ ॥ तरी स्वाज्ञानजनितें । मागिलें मोहें तूतें । भुलविलें तो येथें । असे कीं नाहीं ? ॥ १५४४ ॥ हें बहु पुसों काई । सांगें तूं आपल्या ठायीं । कर्माकर्म कांहीं । देखतासी ? ॥ १५४५ ॥ पार्थु स्वानंदैकरसें । विरेल ऐसा भेददशे । आणिला येणें मिषें । प्रश्नाचेनि ॥ १५४६ ॥ पूर्णब्रह्म जाला पार्थु । तरी पुढील साधावया कार्यार्थु । मर्यादा श्रीकृष्णनाथु । उल्लंघों नेदी ॥ १५४७ ॥ येऱ्हवीं आपुलें करणें । सर्वज्ञ काय तो नेणें ? । परी केलें पुसणें । याचि लागीं ॥ १५४८ ॥ एवं करोनियां प्रश्न । नसतेंचि अर्जुनपण । आणूनियां जालें पूर्णपण । तें बोलवी स्वयें ॥ १५४९ ॥ मग क्षीराब्धीतें सांडितु । गगनीं पुंजु मंडितु । निवडे जैसा न निवडितु । पूर्णचंद्रु ॥ १५५० ॥ तैसा ब्रह्म मी हें विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे । हेंही सांडी तरी विरे । ब्रह्मपणही ॥ १५५१ ॥ ऐसा मोडतु मांडतु ब्रह्में । तो दुःखें देहाचिये सीमे । मी अर्जुन येणें नामें । उभा ठेला ॥ १५५२ ॥ मग कांपतां करतळीं । दडपूनि रोमावळी । पुलिका स्वेदजळीं । जिरऊनियां ॥ १५५३ ॥ प्राणक्षोभें डोलतया । आंगा आंगचि टेंकया । सूनि स्तंभु चाळया । भुलौनियां ॥ १५५४ ॥ नेत्रयुगुळाचेनि वोतें । आनंदामृताचें भरितें । वोसंडत तें मागुतें । काढूनियां ॥ १५५५ ॥ विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कंठीं । ते करूनियां पैठी । हृदयामाजीं ॥ १५५६ ॥ वाचेचें वितुळणें । सांवरूनि प्राणें । अक्रमाचें श्वसणें । ठेऊनि ठायीं ॥ १५५७ ॥

अर्जुन उवाच । नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ ७३॥

मग अर्जुन म्हणे काय देवो । पुसताति आवडे मोहो । तरी तो सकुटुंब गेला जी ठावो । घेऊनि आपला ॥ १५५८ ॥ पासीं येऊनि दिनकरें । डोळ्यातें अंधारें । पुसिजे हें कायि सरे । कोणे गांवीं ? ॥ १५५९ ॥ तैसा तूं श्रीकृष्णराया । आमुचिया डोळयां । गोचर हेंचि कायिसया । न पुरे तंव ॥ १५६० ॥ वरी लोभें मायेपासूनी । तें सांगसी तोंड भरूनी । जें कायिसेनिही करूनी । जाणूं नये ॥ १५६१ ॥ आतां मोह असे कीं नाहीं । हें ऐसें जी पुससी काई । कृतकृत्य जाहलों पाहीं । तुझेपणें ॥ १५६२ ॥ गुंतलों होतों अर्जुनगुणें । तो मुक्त जालों तुझेपणें । आतां पुसणें सांगणें । दोन्ही नाहीं ॥ १५६३ ॥ मी तुझेनि प्रसादें । लाधलेनि आत्मबोधें । मोहाचे तया कांदे । नेदीच उरों ॥ १५६४ ॥ आतां करणें कां न करणें । हें जेणें उठी दुजेपणें । तें तूं वांचूनि नेणें । सर्वत्र गा ॥ १५६५ ॥ ये विषयीं माझ्या ठायीं । संदेहाचे नुरेचि कांहीं । त्रिशुद्धि कर्म जेथ नाहीं । तें मी जालों ॥ १५६६ ॥ तुझेनि मज मी पावोनी । कर्तव्य गेलें निपटूनी । परी आज्ञा तुझी वांचोनि । आन नाहीं प्रभो ॥ १५६७ ॥ कां जें दृश्य दृश्यातें नाशी । जें दुजें द्वैतातें ग्रासी । जें एक परी सर्वदेशीं । वसवी सदा ॥ १५६८ ॥ जयाचेनि संबंधें बंधु फिटे । जयाचिया आशा आस तुटे । जें भेटलया सर्व भेटे । आपणपांचि ॥ १५६९ ॥ तें तूं गुरुलिंग जी माझें । जें येकलेपणींचें विरजें । जयालागीं वोलांडिजे । अद्वैतबोधु ॥ १५७० ॥ आपणचि होऊनि ब्रह्म । सारिजे कृत्याकृत्यांचें काम । मग कीजे का निःसीम । सेवा जयाची ॥ १५७१ ॥ गंगा सिंधू सेवूं गेली । पावतांचि समुद्र जाली । तेवीं भक्तां सेल दिधली । निजपदाची ॥ १५७२ ॥ तो तूं माझा जी निरुपचारु । श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु । मा ब्रह्मतेचा उपकारु । हाचि मानीं ॥ १५७३ ॥ जें मज तुम्हां आड । होतें भेदाचें कवाड । तें फेडोनि केलें गोड । सेवासुख ॥ १५७४ ॥ तरी आतां तुझी आज्ञा । सकळ देवाधिदेवराज्ञा । करीन देईं अनुज्ञा । भलतियेविषयीं ॥ १५७५ ॥ यया अर्जुनाचिया बोला । देवो नाचे सुखें भुलला । म्हणे विश्वफळा जाला । फळ हा मज ॥ १५७६ ॥ उणेनि उमचला सुधाकरु । देखुनी आपला कुमरु । मर्यादा क्षीरसागरु । विसरेचिना ? ॥ १५७७ ॥ ऐसे संवादाचिया बहुलां । लग्न दोघांचियां आंतुला । लागलें देखोनि जाला । निर्भरु संजयो ॥ १५७८ ॥ तेणें म्हणतसे संजयो । बाप कृपानिधी रावो । तो आपुला मनोभावो । अर्जुनेंसी केला ॥ १५७९ ॥ तेणें उचंबळलेपणें । संजय धृतराष्ट्रातें म्हणे । जी कैसे बादरायणें । रक्षिलों दोघे ? ॥ १५८० ॥ आजि तुमतें अवधारा । नाहीं चर्मचक्षूही संसारा । कीं ज्ञानदृष्टिव्यवहारा आणिलेती ॥ १५८१ ॥ आणि रथींचिये राहाटी । घेई जो घोडेयासाठीं । तया आम्हां या गोष्टी । गोचरा होती ॥ १५८२ ॥ वरी जुंझाचें निर्वाण । मांडलें असे दारुण । दोहीं हारीं आपण । हारपिजे जैसें ॥ १५८३ ॥ येवढा जिये सांकडां । कैसा अनुग्रहो पैं गाढा । जे ब्रह्मानंदु उघडा । भोगवीतसे ॥ १५८४ ॥ ऐसें संजय बोलिला । परी न द्रवे येरु उगला । चंद्रकिरणीं शिवतला । पाषाणु जैसा ॥ १५८५ ॥ हे देखोनि तयाची दशा । मग करीचिना सरिसा । परी सुखें जाला पिसा । बोलतसे ॥ १५८६ ॥ भुलविला हर्षवेगें । म्हणौनि धृतराष्ट्रा सांगे । येऱ्हवीं नव्हे तयाजोगें । हें कीर जाणें ॥ १५८७ ॥

सञ्जय उवाच । इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः । संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ ७४॥

मग म्हणे पैं कुरुराजा । ऐसा बंधुपुत्र तो तुझा । बोलिला तें अधोक्षजा । गोड जालें ॥ १५८८ ॥ अगा पूर्वापर सागर । ययां नामसीचि सिनार । येर आघवें तें नीर । एक जैसें ॥ १५८९ ॥ तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसें । हें आंगाचिपासीं दिसे । मग संवादीं जी नसे । कांहींचि भेदु ॥ १५९० ॥ पैं दर्पणाहूनि चोखें । दोन्ही होती सन्मुखें । तेथ येरी येर देखे । आपणपें जैसें ॥ १५९१ ॥ तैसा देवेसीं पंडुसुतु । आपणपें देवीं देखतु । पांडवेंसीं देखे अनंतु । आपणपें पार्थीं ॥ १५९२ ॥ देव देवो भक्तालागीं । जिये विवरूनि देखे आंगीं । येरु तियेचेही भागीं । दोन्ही देखे ॥ १५९३ ॥ आणिक कांहींच नाहीं । म्हणौनि करिती काई । दोघे येकपणें पाहीं । नांदताती ॥ १५९४ ॥ आतां भेदु जरी मोडे । तरी प्रश्नोत्तर कां घडे ? । ना भेदुचि तरी जोडे । संवादसुख कां ? ॥ १५९५ ॥ ऐसें बोलतां दुजेपणें । संवादीं द्वैत गिळणें । तें ऐकिलें बोलणें । दोघांचें मियां ॥ १५९६ ॥ उटूनि दोन्ही आरिसे । वोडविलीया सरिसे । कोण कोणा पाहातसे । कल्पावें पां ? ॥ १५९७ ॥ कां दीपासन्मुखु । ठेविलया दीपकु । कोण कोणा अर्थिकु । कोण जाणें ॥ १५९८ ॥ नाना अर्कापुढें अर्कु । उदयलिया आणिकु । कोण म्हणे प्रकाशकु । प्रकाश्य कवण ? ॥ १५९९ ॥ हें निर्धारूं जातां फुडें । निर्धारासि ठक पडे । ते दोघे जाले एवढे । संवादें सरिसे ॥ १६०० ॥ जी मिळतां दोन्ही उदकें । माजी लवण वारूं ठाके । कीं तयासींही निमिखें । तेंचि होय ॥ १६०१ ॥ तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही । संवादले तें मनीं । धरितां मजही वानी । तेंचि होतसे ॥ १६०२ ॥ ऐसें म्हणे ना मोटकें । तंव हिरोनि सात्विकें । आठव नेला नेणों कें । संजयपणाचा ॥ १६०३ ॥ रोमांच जंव फरके । तंव तंव आंग सुरके । स्तंभ स्वेदांतें जिंके । एकला कंपु ॥ १६०४ ॥ अद्वयानंदस्पर्शें । दिठी रसमय जाली असे । ते अश्रु नव्हती जैसें । द्रवत्वचि ॥ १६०५ ॥ नेणों काय न माय पोटीं । नेणों काय गुंफे कंठीं । वागर्था पडत मिठी । उससांचिया ॥ १६०६ ॥ किंबहुना सात्विकां आठां । चाचरु मांडतां उमेठा । संजयो जालासे चोहटां । संवादसुखाचा ॥ १६०७ ॥ तया सुखाची ऐसी जाती । जे आपणचि धरी शांती । मग पुढती देहस्मृती । लाधली तेणें ॥ १६०८ ॥

व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम् । योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम् ॥ ७५॥

तेव्हां बैसतेनि आनंदें । म्हणे जी जें उपनिषदें । नेणती तें व्यासप्रसादें । ऐकिलें मियां ॥ १६०९ ॥ ऐकतांचि ते गोठी । ब्रह्मत्वाची पडिली मिठी । मीतूंपणेंसीं दृष्टी । विरोनि गेली ॥ १६१० ॥ हे आघवेचि का योग । जया ठाया येती मार्ग । तयाचें वाक्य सवंग । केलें मज व्यासें ॥ १६११ ॥ अहो अर्जुनाचेनि मिषें । आपणपेंचि दुजें ऐसें । नटोनि आपणया उद्देशें । बोलिलें जें देव ॥ १६१२ ॥ तेथ कीं माझें श्रोत्र । पाटाचें जालें जी पात्र । काय वानूं स्वतंत्र । सामर्थ्य श्रीगुरुचें ॥ १६१३ ॥

राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् । केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ ७६॥

राया हें बोलतां विस्मित होये । तेणेंचि मोडावला ठाये । रत्नीं कीं रत्नकिळा ये । झांकोळित जैसी ॥ १६१४ ॥ हिमवंतींचीं सरोवरें । चंद्रोदयीं होती काश्मीरें । मग सूर्यागमीं माघारें । द्रवत्व ये ॥ १६१५ ॥ तैसा शरीराचिया स्मृती । तो संवादु संजय चित्तीं । धरी आणि पुढती । तेंचि होय ॥ १६१६ ॥

तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः । विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ॥ ७७॥

मग उठोनि म्हणे नृपा । श्रीहरीचिया विश्वरूपा । देखिलया उगा कां पां । असों लाहसी ? ॥ १६१७ ॥ न देखणेनि जें दिसे । नाहींपणेंचि जें असे । विसरें आठवे तें कैसें । चुकऊं आतां । ॥ १६१८ ॥ देखोनि चमत्कारु । कीजे तो नाहीं पैसारु । मजहीसकट महापूरु । नेत आहे ॥ १६१९ ॥ ऐसा श्रीकृष्णार्जुन- । संवाद संगमीं स्नान । करूनि देतसे तिळदान । अहंतेचें ॥ १६२० ॥ तेथ असंवरें आनंदें । अलौकिकही कांहीं स्फुंदे । श्रीकृष्ण म्हणे सद्गदें । वेळोवेळां ॥ १६२१ ॥ या अवस्थांची कांहीं । कौरवांतें परी नाहीं । म्हणौनि रायें तें कांहीं । कल्पावें जंव ॥ १६२२ ॥ तंव जाला सुखलाभु । आपणया करूनि स्वयंभु । बुझाविला अवष्टंभु । संजयें तेणें ॥ १६२३ ॥ तेथ कोणी येकी अवसरी । होआवी ते करूनि दुरी । रावो म्हणे संजया परी । कैसी तुझी गा ? ॥ १६२४ ॥ तेणें तूंतें येथें व्यासें । बैसविलें कासया उद्देशें । अप्रसंगामाजीं ऐसें । बोलसी काई ? ॥ १६२५ ॥ रानींचें राउळा नेलिया । दाही दिशा मानी सुनिया । कां रात्री होय पाहलया । निशाचरां ॥ १६२६ ॥ जो जेथिंचें गौरव नेणें । तयासि तें भिंगुळवाणें । म्हणौनि अप्रसंगु तेणें । म्हणावा कीं तो ॥ १६२७ ॥ मग म्हणे सांगें प्रस्तुत । उदयलेंसे जें उत्कळित । तें कोणासि बा रे जैत । देईल शेखीं ? ॥ १६२८ ॥ येऱ्हवीं विशेषें बहुतेक । आमुचें ऐसें मानसिक । जे दुर्योधनाचे अधिक । प्रताप सदा ॥ १६२९ ॥ आणि येरांचेनि पाडें । दळही याचें देव्हडें । म्हणौनि जैत फुडें । आणील ना तें ? ॥ १६३० ॥ आम्हां तंव गमे ऐसें । मा तुझें ज्योतिष कैसें । तें नेणों संजया असे । तैसें सांग पां ॥ १६३१ ॥

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ ७८॥ ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥

यया बोला संजयो म्हणे । जी येरयेरांचें मी नेणें । परी आयुष्य तेथें जिणें । हें फुडें कीं गा ॥ १६३२ ॥ चंद्रु तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका । संत तेथें विवेका । असणें कीं जी ॥ १६३३ ॥ रावो तेथें कटक । सौजन्य तेथें सोयरीक । वन्हि तेथें दाहक । सामर्थ्य कीं ॥ १६३४ ॥ दया तेथें धर्मु । धर्मु तेथें सुखागमु । सुखीं पुरुषोत्तमु । असे जैसा ॥ १६३५ ॥ वसंत तेथें वनें । वन तेथें सुमनें । सुमनीं पालिंगनें । सारंगांचीं ॥ १६३६ ॥ गुरु तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन । दर्शनीं समाधान । आथी जैसें ॥ १६३७ ॥ भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु । हें असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथें ॥ १६३८ ॥ तैसे सकल पुरुषार्थ । जेणें स्वामी कां सनाथ । तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥ १६३९ ॥ आणि आपुलेनि कांतेंसीं । ते जगदंबा जयापासीं । अणिमादिकीं काय दासी । नव्हती तयातें ? ॥ १६४० ॥ कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणें भागें । तैं जयो लागवेगें । तेथेंचि आहे ॥ १६४१ ॥ विजयो नामें अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु । श्रियेसीं विजय निश्चितु । तेथेंचि असे ॥ १६४२ ॥ तयाचिये देशींच्या झाडीं । कल्पतरूतें होडी । न जिणावें कां येवढीं । मायबापें असतां ? ॥ १६४३ ॥ ते पाषाणही आघवें । चिंतारत्‌नें कां नोहावे ? । तिये भूमिके कां न यावें । सुवर्णत्व ? ॥ १६४४ ॥ तयाचिया गांवींचिया । नदी अमृतें वाहाविया । नवल कायि राया । विचारीं पां ॥ १६४५ ॥ तयाचे बिसाट शब्द । सुखें म्हणों येती वेद । सदेह सच्चिदानंद । कां न व्हावे ते ? ॥ १६४६ ॥ पैं स्वर्गापवर्ग दोन्ही । इयें पदें जया अधीनीं । तो श्रीकृष्ण बाप जननी । कमळा जया ॥ १६४७ ॥ म्हणौनि जिया बाहीं उभा । तो लक्ष्मीयेचा वल्लभा । तेथें सर्वसिद्धी स्वयंभा । येर मी नेणें ॥ १६४८ ॥ आणि समुद्राचा मेघु । उपयोगें तयाहूनि चांगु । तैसा पार्थीं आजि लागु । आहे तये ॥ १६४९ ॥ कनकत्वदीक्षागुरू । लोहा परिसु होय कीरू । परी जगा पोसिता व्यवहारु । तेंचि जाणें ॥ १६५० ॥ येथ गुरुत्वा येतसे उणें । ऐसें झणें कोण्ही म्हणे । वन्हि प्रकाश दीपपणें । प्रकाशी आपुला ॥ १६५१ ॥ तैसा देवाचिया शक्ती । पार्थु देवासीचि बहुती । परी माने इये स्तुती । गौरव असे ॥ १६५२ ॥ आणि पुत्रें मी सर्व गुणीं । जिणावा हे बापा शिराणी । तरी ते शारङ्गपाणी । फळा आली ॥ १६५३ ॥ किंबहुना ऐसा नृपा । पार्थु जालासे कृष्णकृपा । तो जयाकडे साक्षेपा । रीति आहे ॥ १६५४ ॥ तोचि गा विजयासि ठावो । येथ तुज कोण संदेहो ? । तेथ न ये तरी वावो । विजयोचि होय ॥ १६५५ ॥ म्हणौनि जेथ श्री तेथें श्रीमंतु । जेथ तो पंडूचा सुतु । तेथ विजय समस्तु । अभ्युदयो तेथ ॥ १६५६ ॥ जरी व्यासाचेनि साचें । धिरे मन तुमचें । तरी या बोलाचें । ध्रुवचि माना ॥ १६५७ ॥ जेथ तो श्रीवल्लभु । जेथ भक्तकदंबु । तेथ सुख आणि लाभु । मंगळाचा ॥ १६५८ ॥ या बोला आन होये । तरी व्यासाचा अंकु न वाहे । ऐसें गाजोनि बाहें । उभिली तेणें ॥ १६५९ ॥ एवं भारताचा आवांका । आणूनि श्लोका येका । संजयें कुरुनायका । दिधला हातीं ॥ १६६० ॥ जैसा नेणों केवढा वन्ही । परी गुणाग्रीं ठेऊनी । आणिजे सूर्याची हानी । निस्तरावया ॥ १६६१ ॥ तैसें शब्दब्रह्म अनंत । जालें सवालक्ष भारत । भारताचें शतें सात । सर्वस्व गीता ॥ १६६२ ॥ तयांही सातां शतांचा । इत्यर्थु हा श्लोक शेषींचा । व्यासशिष्य संजयाचा । पूर्णोद्गारु जो ॥ १६६३ ॥ येणें येकेंचि श्लोकें । राहे तेणें असकें । अविद्याजाताचें निकें । जिंतलें होय ॥ १६६४ ॥ ऐसें श्लोक शतें सात । गीतेचीं पदें आंगें वाहत । पदें म्हणों कीं परमामृत । गीताकाशींचें ॥ १६६५ ॥ कीं आत्मराजाचिये सभे । गीते वोडवले हे खांबे । मज श्लोक प्रतिभे । ऐसे येत ॥ १६६६ ॥ कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती । मोहमहिषा मुक्ति । आनंदली असे ॥ १६६७ ॥ म्हणौनि मनें कायें वाचा । जो सेवकु होईल इयेचा । तो स्वानंदासाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥ १६६८ ॥ कीं अविद्यातिमिररोंखें । श्लोक सूर्यातें पैजा जिंकें । ऐसे प्रकाशिले गीतामिषें । रायें श्रीकृष्णें ॥ १६६९ ॥ कीं श्लोकाक्षरद्राक्षलता । मांडव जाली आहे गीता । संसारपथश्रांता । विसंवावया ॥ १६७० ॥ कीं सभाग्यसंतीं भ्रमरीं । केले ते श्लोककल्हारीं । श्रीकृष्णाख्यसरोवरीं । सासिन्नली हे ॥ १६७१ ॥ कीं श्लोक नव्हती आन । गमे गीतेचें महिमान । वाखाणिते बंदीजन । उदंड जैसे ॥ १६७२ ॥ कीं श्लोकांचिया आवारा । सात शतें करूनि सुंदरा । सर्वागम गीतापुरा । वसों आले ॥ १६७३ ॥ कीं निजकांता आत्मया । आवडी गीता मिळावया । श्लोक नव्हती बाह्या । पसरु का जो ॥ १६७४ ॥ कीं गीताकमळींचे भृंग । कीं हे गीतासागरतरंग । कीं हरीचे हे तुरंग । गीतारथींचे ॥ १६७५ ॥ कीं श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतेगंगे आंतु । जे अर्जुन नर सिंहस्थु । जाला म्हणौनि ॥ १६७६ ॥ कीं नोहे हे श्लोकश्रेणी । अचिंत्यचित्तचिंतामणी । कीं निर्विकल्पां लावणी । कल्पतरूंची ॥ १६७७ ॥ ऐसिया शतें सात श्लोकां । परी आगळा येकयेका । आतां कोण वेगळिका । वानावां पां । ॥ १६७८ ॥ तान्ही आणि पारठी । इया कामधेनूतें दिठी । सूनि जैसिया गोठी । कीजती ना ॥ १६७९ ॥ दीपा आगिलु मागिलु । सूर्यु धाकुटा वडीलु । अमृतसिंधु खोलु । उथळु कायसा । ॥ १६८० ॥ तैसे पहिले सरते । श्लोक न म्हणावे गीते । जुनीं नवीं पारिजातें । आहाती काई ? ॥ १६८१ ॥ आणि श्लोका पाडु नाहीं । हें कीर समर्थु काई । येथ वाच्य वाचकही । भागु न धरी ॥ १६८२ ॥ जे इये शास्त्रीं येकु । श्रीकृष्णचि वाच्य वाचकु । हें प्रसिद्ध जाणे लोकु । भलताही ॥ १६८३ ॥ येथें अर्थें तेंचि पाठें । जोडे येवढेनि धटें । वाच्यवाचक येकवटें । साधितें शास्त्र ॥ १६८४ ॥ म्हणौनि मज कांहीं । समर्थनीं आतां विषय नाहीं । गीता जाणा हे वाङ्ग्मयी । श्रीमूर्ति प्रभूचि ॥ १६८५ ॥ शास्त्र वाच्यें अर्थें फळे । मग आपण मावळे । तैसें नव्हें हें सगळें । परब्रह्मचि ॥ १६८६ ॥ कैसा विश्वाचिया कृपा । करूनि महानंद सोपा । अर्जुनव्याजें रूपा । आणिला देवें ॥ १६८७ ॥ चकोराचेनि निमित्तें । तिन्ही भुवनें संतप्तें । निवविलीं कळांवतें । चंद्रें जेवीं ॥ १६८८ ॥ कां गौतमाचेनि मिषें । कळिकाळज्वरीतोद्देशें । पाणिढाळु गिरीशें । गंगेंचा केला ॥ १६८९ ॥ तैसें गीतेचें हें दुभतें । वत्स करूनि पार्थातें । दुभिन्नली जगापुरतें । श्रीकृष्ण गाय ॥ १६९० ॥ येथे जीवें जरी नाहाल । तरी हेंचि कीर होआल । नातरी पाठमिषें तिंबाल । जीभचि जरी ॥ १६९१ ॥ तरी लोह एकें अंशें । झगटलिया परीसें । येरीकडे अपैसें । सुवर्ण होय ॥ १६९२ ॥ तैसी पाठाची ते वाटी । श्लोकपाद लावा ना जंव वोठीं । तंव ब्रह्मतेची पुष्टी । येईल आंगा ॥ १६९३ ॥ ना येणेसीं मुख वांकडें । करूनि ठाकाल कानवडें । तरी कानींही घेतां पडे । तेचि लेख ॥ १६९४ ॥ जे हे श्रवणें पाठें अर्थें । गीता नेदी मोक्षाआरौतें । जैसा समर्थु दाता कोण्हातें । नास्ति न म्हणे ॥ १६९५ ॥ म्हणौनि जाणतया सवा । गीताचि येकी सेवा । काय कराल आघवां । शास्त्रीं येरीं ॥ १६९६ ॥ आणि कृष्णार्जुनीं मोकळी । गोठी चावळिली जे निराळी । ते श्रीव्यासें केली करतळीं । घेवों ये ऐसी ॥ १६९७ ॥ बाळकातें वोरसें । माय जैं जेवऊं बैसे । तैं तया ठाकती तैसे । घांस करी ॥ १६९८ ॥ कां अफाटा समीरणा । आपैतेंपण शाहाणा । केलें जैसें विंजणा । निर्मूनियां ॥ १६९९ ॥ तैसें शब्दें जें न लभे । तें घडूनिया अनुष्टुभें । स्त्रीशूद्रादि प्रतिभे । सामाविलें ॥ १७०० ॥ स्वातीचेनि पाणियें । न होती जरी मोतियें । तरी अंगीं सुंदरांचिये । कां शोभिती तियें ? ॥ १७०१ ॥ नादु वाद्या न येतां । तरी कां गोचरु होता । फुलें न होतां घेपता । आमोदु केवीं ? ॥ १७०२ ॥ गोडीं न होती पक्वान्नें । तरी कां फावती रसनें ? । दर्पणावीण नयनें । नयनु कां दिसे ? ॥ १७०३ ॥ द्रष्टा श्रीगुरुमूर्ती । न रिगता दृश्यपंथीं । तरी कां ह्या उपास्ती । आकळता तो ? ॥ १७०४ ॥ तैसें वस्तु जें असंख्यात । तया संख्या शतें सात । न होती तरी कोणा येथ । फावों शकतें ? ॥ १७०५ ॥ मेघ सिंधूचें पाणी वाहे । तरी जग तयातेंचि पाहे । कां जे उमप ते नोहें । ठाकतें कोण्हा ॥ १७०६ ॥ आणि वाचा जें न पवे । तें हे श्लोक न होते बरवे । तरी कानें मुखें फावे । ऐसें कां होतें ? ॥ १७०७ ॥ म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु । विश्वा जाला उपकारु । जे श्रीकृष्ण उक्ती आकारु । ग्रंथाचा केला ॥ १७०८ ॥ आणि तोचि हा मी आतां । श्रीव्यासाचीं पदें पाहतां पाहतां । आणिला श्रवणपथा । मऱ्हाठिया ॥ १७०९ ॥ व्यासादिकांचे उन्मेख । राहाटती जेथ साशंक । तेथ मीही रंक येक । चावळी करीं ॥ १७१० ॥ परी गीता ईश्वरु भोळा । ले व्यासोक्तिकुसुममाळा । तरी माझिया दुर्वादळा । ना न म्हणे कीं ॥ १७११ ॥ आणि क्षीरसिंधूचिया तटा । पाणिया येती गजघटा । तेथ काय मुरकुटा । वारिजत असे ? ॥ १७१२ ॥ पांख फुटे पांखिरूं । नुडे तरी नभींच स्थिरू । गगन आक्रमी सत्वरू । तो गरुडही तेथ ॥ १७१३ ॥ राजहंसाचें चालणें । भूतळीं जालिया शाहाणें । आणिकें काय कोणें । चालावेचिना ? ॥ १७१४ ॥ जी आपुलेनि अवकाशें । अगाध जळ घेपे कलशें । चुळीं चूळपण ऐसें । भरूनि न निघे ? ॥ १७१५ ॥ दिवटीच्या आंगीं थोरी । तरी ते बहु तेज धरी । वाती आपुलिया परी । आणीच कीं ना ? ॥ १७१६ ॥ जी समुद्राचेनि पैसें । समुद्रीं आकाश आभासे । थिल्लरीं थिल्लरा{ऐ}सें । बिंबेचि पैं ॥ १७१७ ॥ तेवीं व्यासादिक महामती । वावरों येती इये ग्रंथीं । मा आम्ही ठाकों हे युक्ति । न मिळे कीर ? ॥ १७१८ ॥ जिये सागरीं जळचरें । संचरती मंदराकारें । तेथ देखोनि शफरें येरें । पोहों न लाहती ? ॥ १७१९ ॥ अरुण आंगाजवळिके । म्हणौनि सूर्यातें देखें । मा भूतळींची न देखे । मुंगी काई ? ॥ १७२० ॥ यालागीं आम्हां प्राकृतां । देशिकारें बंधें गीता । म्हणणें हें अनुचिता । कारण नोहे ॥ १७२१ ॥ आणि बापु पुढां जाये । ते घेत पाउलाची सोये । बाळ ये तरी न लाहे । पावों कायी ? ॥ १७२२ ॥ तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकारातें वाट पुसतु । अयोग्यही मी न पवतु । कें जाईन ? ॥ १७२३ ॥ आणि पृथ्वी जयाचिया क्षमा । नुबगे स्थावर जंगमा । जयाचेनि अमृतें चंद्रमा । निववी जग ॥ १७२४ ॥ जयाचें आंगिक असिकें । तेज लाहोनि अर्कें । आंधाराचें सावाइकें । लोटिजत आहे ॥ १७२५ ॥ समुद्रा जयाचें तोय । तोया जयाचें माधुर्य । माधुर्या सौंदर्य । जयाचेनि ॥ १७२६ ॥ पवना जयाचें बळ । आकाश जेणें पघळ । ज्ञान जेणें उज्वळ । चक्रवर्ती ॥ १७२७ ॥ वेद जेणें सुभाष । सुख जेणें सोल्लास । हें असो रूपस । विश्व जेणें ॥ १७२८ ॥ तो सर्वोपकारी समर्थु । सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथु । राहाटत असे मजही आंतु । रिघोनियां ॥ १७२९ ॥ आतां आयती गीता जगीं । मी सांगें मऱ्हाठिया भंगीं । येथ कें विस्मयालागीं । ठावो आहे ॥ १७३० ॥ श्रीगुरुचेनि नांवें माती । डोंगरीं जयापासीं होती । तेणें कोळियें त्रिजगतीं । येकवद केली ॥ १७३१ ॥ चंदनें वेधलीं झाडें । जालीं चंदनाचेनि पाडें । वसिष्ठें मांनिली कीं भांडे । भानूसीं शाटी ॥ १७३२ ॥ मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला । जो दिठीवेनि आपुला । बैसवी पदीं ॥ १७३३ ॥ आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी । तैं न दिसे ऐसी गोठी । केंही आहे ? ॥ १७३४ ॥ म्हणौनि माझें नित्य नवे । श्वासोश्वासही प्रबंध होआवे । श्रीगुरुकृपा काय नोहे । ज्ञानदेवो म्हणे ॥ १७३५ ॥ याकारणें मियां । श्रीगीतार्थु मऱ्हाठिया । केला लोकां यया । दिठीचा विषो ॥ १७३६ ॥ परी मऱ्हाठे बोलरंगें । कवळितां पैं गीतांगें । तैं गातयाचेनि पांगें । येकाढतां नोहे ॥ १७३७ ॥ म्हणौनि गीता गावों म्हणे । तें गाणिवें होती लेणें । ना मोकळे तरी उणें । गीताही आणित ॥ १७३८ ॥ सुंदर आंगीं लेणें न सूये । तैं तो मोकळा शृंगारु होये । ना लेइलें तरी आहे । तैसें कें उचित ? ॥ १७३९ ॥ कां मोतियांची जैसी जाती । सोनयाही मान देती । नातरी मानविती । अंगेंचि सडीं ॥ १७४० ॥ नाना गुंफिलीं कां मोकळीं । उणीं न होती परीमळीं । वसंतागमींचीं वाटोळीं । मोगरीं जैसीं ॥ १७४१ ॥ तैसा गाणिवेतें मिरवी । गीतेवीणही रंगु दावीं । तो लाभाचा प्रबंधु ओंवी । केला मियां ॥ १७४२ ॥ तेणें आबालसुबोधें । ओवीयेचेनि प्रबंधें । ब्रह्मरससुस्वादें । अक्षरें गुंथिलीं ॥ १७४३ ॥ आतां चंदनाच्या तरुवरीं । परीमळालागीं फुलवरीं । पारुखणें जियापरी । लागेना कीं ॥ १७४४ ॥ तैसा प्रबंधु हा श्रवणीं । लागतखेंवो समाधि आणी । ऐकिलियाही वाखाणी । काय व्यसन न लवी ? ॥ १७४५ ॥ पाठ करितां व्याजें । पांडित्यें येती वेषजे । तैं अमृतातें नेणिजे । फावलिया ॥ १७४६ ॥ तैसेंनि आइतेपणें । कवित्व जालें हें उपेणें । मनन निदिध्यास श्रवणें । जिंतिलें आतां ॥ १७४७ ॥ हे स्वानंदभोगाची सेल । भलतयसीचि देईल । सर्वेंद्रियां पोषवील । श्रवणाकरवीं ॥ १७४८ ॥ चंद्रातें आंगवणें । भोगूनि चकोर शाहाणे । परी फावे जैसें चांदिणें । भलतयाही ॥ १७४९ ॥ तैसें अध्यात्मशास्त्रीं यिये । अंतरंगचि अधिकारिये । परी लोकु वाक्चातुर्यें । होईल सुखिया ॥ १७५० ॥ ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें । गौरव आहे जी साचें । ग्रंथु नोहे हें कृपेचें । वैभव तिये ॥ १७५१ ॥ क्षीरसिंधु परिसरीं । शक्तीच्या कर्णकुहरीं । नेणों कैं श्रीत्रिपुरारीं । सांगितलें जें ॥ १७५२ ॥ तें क्षीरकल्लोळाआंतु । मकरोदरीं गुप्तु । होता तयाचा हातु । पैठें जालें ॥ १७५३ ॥ तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं । भग्नावयवा चौरंगी । भेटला कीं तो सर्वांगीं । संपूर्ण जाला ॥ १७५४ ॥ मग समाधि अव्युत्थया । भोगावी वासना यया । ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनीं ॥ १७५५ ॥ तेणें योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु । तिये पदीं कां सर्वेश्वरु । अभिषेकिला ॥ १७५६ ॥ मग तिहीं तें शांभव । अद्वयानंदवैभव । संपादिलें सप्रभव । श्रीगहिनीनाथा ॥ १७५७ ॥ तेणें कळिकळितु भूतां । आला देखोनि निरुता । ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा । दिधली ऐसी ॥ १७५८ ॥ ना आदिगुरु शंकरा\- । लागोनि शिष्यपरंपरा । बोधाचा हा संसरा । जाला जो आमुतें ॥ १७५९ ॥ तो हा तूं घेऊनि आघवा । कळीं गिळितयां जीवां । सर्व प्रकारीं धांवा । करीं पां वेगीं ॥ १७६० ॥ आधींच तंव तो कृपाळु । वरी गुरुआज्ञेचा बोलू । जाला जैसा वर्षाकाळू । खवळणें मेघां ॥ १७६१ ॥ मग आर्ताचेनि वोरसें । गीतार्थग्रंथनमिसें । वर्षला शांतरसें । तो हा ग्रंथु ॥ १७६२ ॥ तेथ पुढां मी बापिया । मांडला आर्ती आपुलिया । कीं यासाठीं येवढिया । आणिलों यशा ॥ १७६३ ॥ एवं गुरुक्रमें लाधलें । समाधिधन जें आपुलें । तें ग्रंथें बोधौनि दिधलें । गोसावी मज ॥ १७६४ ॥ वांचूनि पढे ना वाची । ना सेवाही जाणें स्वामीची । ऐशिया मज ग्रंथाची । योग्यता कें असे ? ॥ १७६५ ॥ परी साचचि गुरुनाथें । निमित्त करूनि मातें । प्रबंधव्याजें जगातें । रक्षिलें जाणा ॥ १७६६ ॥ तऱ्ही पुरोहितगुणें । मी बोलिलों पुरें उणें । तें तुम्हीं माउलीपणें । उपसाहिजो जी ॥ १७६७ ॥ शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजें । अळंकारु म्हणिजे । काय तें नेणें ॥ १७६८ ॥ सायिखडेयाचें बाहुलें । चालवित्या सूत्राचेनि चाले । तैसा मातें दावीत बोले । स्वामी तो माझा ॥ १७६९ ॥ यालागीं मी गुणदोष\- । विषीं क्षमाविना विशेष । जे मी संजात ग्रंथलों देख । आचार्यें कीं ॥ १७७० ॥ आणि तुम्हां संतांचिये सभे । जें उणीवेंसी ठाके उभें । तें पूर्ण नोहे तरी तैं लोभें । तुम्हांसीचि कोपें ॥ १७७१ ॥ सिवतलियाही परीसें । लोहत्वाचिये अवदसे । न मुकिजे आयसें । तैं कवणा बोलु । ॥ १७७२ ॥ वोहळें हेंचि करावें । जे गंगेचें आंग ठाकावें । मगही गंगा जरी नोहावें । तैं तो काय करी ? ॥ १७७३ ॥ म्हणौनि भाग्ययोगें बहुवें । तुम्हां संतांचें मी पाये । पातलों आतां कें लाहे । उणें जगीं । ॥ १७७४ ॥ अहो जी माझेनि स्वामी । मज संत जोडुनि तुम्हीं । दिधलेति तेणें सर्वकामीं । परीपूर्ण जालों ॥ १७७५ ॥ पाहा पां मातें तुम्हां सांगडें । माहेर तेणें सुरवाडें । ग्रंथाचें आळियाडें । सिद्धी गेलें ॥ १७७६ ॥ जी कनकाचें निखळ । वोतूं येईल भूमंडळ । चिंतारत्‌नीं कुळाचळ । निर्मूं येती ॥ १७७७ ॥ सातांही हो सागरांतें । सोपें भरितां अमृतें । दुवाड नोहे तारांतें । चंद्र करितां ॥ १७७८ ॥ कल्पतरूचे आराम । लावितां नाहीं विषम । परी गीतार्थाचें वर्म । निवडूं न ये ॥ १७७९ ॥ तो मी येकु सर्व मुका । बोलोनि मऱ्हाठिया भाखा । करी डोळेवरी लोकां । घेवों ये ऐसें जें ॥ १७८० ॥ हा ग्रंथसागरु येव्हढा । उतरोनि पैलीकडा । कीर्तिविजयाचा धेंडा । नाचे जो कां ॥ १७८१ ॥ गीतार्थाचा आवारु । कलशेंसीं महामेरु । रचूनि माजीं श्रीगुरु\- । लिंग जें पूजीं ॥ १७८२ ॥ गीता निष्कपट माय । चुकोनि तान्हें हिंडे जें वाय । तें मायपूता भेटी होय । हा धर्म तुमचा ॥ १७८३ ॥ तुम्हां सज्जनांचें केलें । आकळुनी जी मी बोलें । ज्ञानदेव म्हणे थेंकुलें । तैसें नोहें ॥ १७८४ ॥ काय बहु बोलों सकळां । मेळविलों जन्मफळा । ग्रंथसिद्धीचा सोहळा । दाविला जो हा ॥ १७८५ ॥ मियां जैसजैसिया आशा । केला तुमचा भरंवसा । ते पुरवूनि जी बहुवसा । आणिलों सुखा ॥ १७८६ ॥ मजलागीं ग्रंथाची स्वामी । दुजीं सृष्टी जे हे केली तुम्ही । तें पाहोनि हांसों आम्हीं । विश्वामित्रातेंही ॥ १७८७ ॥ जे असोनि त्रिशंकुदोषें । धातयाही आणावें वोसें । तें नासतें कीजे कीं ऐसें । निर्मावें नाहीं ॥ १७८८ ॥ शंभू उपमन्युचेनि मोहें । क्षीरसागरूही केला आहे । येथ तोही उपमे सरी नोहे । जे विषगर्भ कीं ॥ १७८९ ॥ अंधकारु निशाचरां । गिळितां सूर्यें चराचरां । धांवा केला तरी खरा । ताउनी कीं तो ॥ १७९० ॥ तातलियाही जगाकारणें । चंद्रें वेंचिलें चांदणें । तया सदोषा केवीं म्हणे । सारिखें हें ॥ १७९१ ॥ म्हणौनि तुम्हीं मज संतीं । ग्रंथरूप जो हा त्रिजगतीं । उपयोग केला तो पुढती । निरुपम जी ॥ १७९२ ॥ किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें । येथ माझें जी उरलें । पाईकपण ॥ १७९३ ॥ आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १७९४ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ १७९५ ॥ दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ १७९६ ॥ वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ॥ १७९७ ॥ चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ १७९८ ॥ चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ १७९९ ॥ किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १८०० ॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकींयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ १८०१ ॥ तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ १८०२ ॥ ऐसें युगीं परी कळीं । आणि महाराष्ट्रमंडळीं । श्रीगोदावरीच्या कूलीं । दक्षिणलिंगीं ॥ १८०३ ॥ त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र । जेथ जगाचें जीवनसूत्र । श्रीमहालया असे ॥ १८०४ ॥ तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु । न्यायातें पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु ॥ १८०५ ॥ तेथ महेशान्वयसंभूतें । श्रीनिवृत्तिनाथसुतें । केलें ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें ॥ १८०६ ॥ एवं भारताच्या गांवीं । भीष्मनाम प्रसिद्ध पर्वीं । श्रीकृष्णार्जुनीं बरवी । गोठी जे केली ॥ १८०७ ॥ जें उपनिषदांचें सार । सर्व शास्त्रांचें माहेर । परमहंसीं सरोवर । सेविजे जें ॥ १८०८ ॥ तियें गीतेचा कलशु । संपूर्ण हा अष्टादशु । म्हणे निवृत्तिदासु । ज्ञानदेवो ॥ १८०९ ॥ पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती । सर्वसुखीं सर्वभूतीं । संपूर्ण होईजे ॥ १८१० ॥ शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥ १८११ ॥ इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां अष्टादशोध्यायः ॥
श्रीशके पंधराशें साहोत्तरीं । तारणनामसंवत्सरीं । एकाजनार्दनें अत्यादरीं । गीता\-ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ॥ १ ॥ ग्रंथ पूर्वींच अतिशुद्ध । परी पाठांतरीं शुद्ध अबद्ध । तो शोधूनियां एवंविध । प्रतिशुद्ध सिद्धज्ञानेश्वरी ॥ २ ॥ नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका । जयाची गीतेची वाचितां टीका । ज्ञान होय लोकां । अतिभाविकां ग्रंथार्थियां ॥ ३ ॥ बहुकाळपर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी । प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाठी संपूर्ण जाली ॥ ४ ॥ ज्ञानेश्वरीपाठीं । जो ओंवी करील मऱ्हाटी । तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली ॥ ५ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री परमात्मने नमः ॥ ॥ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥

॥अध्याय॥१८॥समाप्त॥
***************************

Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP