॥ज्ञानेश्वरी॥अध्याय॥१८॥
************************************
॥ज्ञानेश्वरी॥
************************************
॥अध्याय॥१८॥
************************************
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अष्टादशोऽध्यायः - अध्याय अठरावा । । । मोक्षसंज्ञासयोगः ।
जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥ १ ॥ जयजय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ । निगमागमद्रुमफळ । फलप्रद ॥ २ ॥ जयजय देव सकल । विगतविषयवत्सल । कलितकाळकौतूहल । कलातीत ॥ ३ ॥ जयजय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ॥ ४ ॥ जयजय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत ॥ ५ ॥ जयजय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ । भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस ॥ ६ ॥ जयजय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद । शमदम\-मदनमदभेद । दयार्णव ॥ ७ ॥ जयजय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प । भक्तभावभुवनदीप । तापापह ॥ ८ ॥ जयजय देव अद्वितीय । परीणतोपरमैकप्रिय । निजजनजित भजनीय । मायागम्य ॥ ९ ॥ जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविद्रुमबीजप्ररो । हणावनी ॥ १० ॥ हे काय एकैक ऐसैसें । नानापरीभाषावशें । स्तोत्र करूं तुजोद्देशें । निर्विशेषा ॥ ११ ॥ जिहींं विशेषणीं विशेषिजे । तें दृश्य नव्हे रूप तुझें । हें जाणें मी म्हणौनि लाजें । वानणा इहीं ॥ १२ ॥ परी मर्यादेचा सागरु । हा तंवचि तया डगरु । जंव न देखे सुधाकरु । उदया आला ॥ १३ ॥ सोमकांतु निजनिर्झरींं । चंद्रा अर्घ्यादिक न करी । तें तोचि अवधारीं । करवी कीं जी ॥ १४ ॥ नेणों कैसी वसंतसंगें । अवचितिया वृक्षाचीं अंगें । फुटती तैं हे तयांहि जोगें । धरणें नोहे ? ॥ १५ ॥ पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजें कवण ? । कां जळें शिवतलें लवण । आंग भुले ॥ १६ ॥ तैसा तूतें जेथ मी स्मरें । तेथ मीपण मी विसरें । मग जाकळिला ढेंकरें । तृप्तु जैसा ॥ १७ ॥ मज तुवां जी केलें तैसें । माझें मीपण दवडूनि देशें । स्तुतिमिषेंच पां पिसें । बांधलें वाचे ॥ १८ ॥ ना येऱ्हवींं तरी आठवीं । राहोनि स्तुति जैं करावी । तैं गुणागुणिया धरावी । सरोभरी कींंं ॥ १९ ॥ तरी तूं जी एकरसाचें लिंग । केवीं करूं गुणागुणीं विभाग । मोतीं फोडोनि सांधितां चांग । कीं तैसेंचि भलें ॥ २० ॥ आणि बाप तूं माय । इहीं बोलीं ना स्तुति होय । डिंभोपाधिक आहे । विटाळु तेथें ॥ २१ ॥ जी जालेनि पाइकें आलें । तें गोसावीपण केवीं बोलें ? । ऐसें उपाधी उशिटलें । काय वर्णूं ॥ २२ ॥ जरी आत्मा तूं एकसरा । हेंही म्हणतां दातारा । तरी आंतुल तूं बाहेरा । घापतासी ॥ २३ ॥ म्हणौनि सत्यचि तुजलागींं । स्तुति न देखों जी जगीं । मौनावांचूनि लेणें आंगीं । सुसीना मा ॥ २४ ॥ स्तुति कांहीं न बोलणें । पूजा कांहींं न करणें । सन्निधी कांहींंं न होणें । तुझ्या ठायीं॥ २५ ॥ तरी जिंतलें जैसें भुली । पिसें आलापु घाली । तैसें वानूं तें माऊली । उपसाहावें तुवां ॥ २६ ॥ आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावीं माझिये वाग्वृद्धी । जे माने हे सभासदीं । सज्जनांच्या ॥ २७ ॥ तेथ म्हणितलें श्रीनिवृत्ती । नको हें पुढतपुढती । परीसीं लोहा घृष्टी किती । वेळवेळां कीजे गा । ॥ २८ ॥ तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो । तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां ॥ २९ ॥ जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा । सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊं जो ॥ ३० ॥ लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे । आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥ ३१ ॥ तैसेंचि एथही आहे । जे एकेचि येणें अध्यायें । आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥ ३२ ॥ मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें । उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ॥ ३३ ॥ नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं । तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ॥ ३४ ॥ व्यासु सहजें सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं । उपनिषदार्थाची माळी\- । माजीं खांडिली ॥ ३५ ॥ तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु । तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ॥ ३६ ॥ माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट । घडिलें पार्थवैकुंठ\- । संवाद कुसरी ॥ ३७ ॥ निवृत्तिसूत्र सोडवणिया । सर्व शास्त्रार्थ पुरवणिया । आवो साधिला मांडणिया । मोक्षरेखेचा ॥ ३८ ॥ ऐसेनि करितां उभारा । पंधरा अध्यायांत पंधरा । भूमि निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला ॥ ३९ ॥ उपरी सोळावा अध्यायो । तो ग्रीवघंटेचा आवो । सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ॥ ४० ॥ तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु । उपरि गीतादिकीं व्यासु । ध्वजें लागला ॥ ४१ ॥ म्हणौनि मागील जे अध्याये । ते चढते भूमीचे आये । तयांचें पुरें दाविताहे । आपुल्या आंगीं ॥ ४२ ॥ जालया कामा नाहीं चोरी । ते कळसें होय उजरी । तेवींं अष्टादशु विवरी । साद्यंत गीता ॥ ४३ ॥ ऐसा व्यासें विंदाणियें । गीताप्रासादु सोडवणिये । आणूनि राखिले प्राणिये । नानापरी ॥ ४४ ॥ एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया । एक ते श्रवणमिषें छाया । सेविती ययाची ॥ ४५ ॥ एक ते अवधानाचा पुरा । विडापाऊड भीतरां । घेऊनि रिघती गाभारां । अर्थज्ञानाच्या ॥ ४६ ॥ ते निजबोधें उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी । परी मोक्षप्रासादीं सरी । सर्वांही आथी ॥ ४७ ॥ समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरील्या एकचि पक्वान्नें । तेवीं श्रवणें अर्थें पठणें । मोक्षुचि लाभे ॥ ४८ ॥ ऐसा गीता वैष्णवप्रासादु । अठरावा अध्याय कळसु विशदु । म्यां म्हणितला हा भेदु । जाणोनियां ॥ ४९ ॥ आतां सप्तदशापाठीं । अध्याय कैसेनि उठी । तो संबंधु सांगो दिठी । दिसे तैसा ॥ ५० ॥ का गंगायमुना उदक । वोघबगें वेगळिक । दावी होऊनि एक । पाणीपणें ॥ ५१ ॥ न मोडितां दोन्ही आकार । घडिलें एक शरीर । हें अर्धनारी नटेश्वर\- । रूपीं दिसें ॥ ५२ ॥ नाना वाढिली दिवसें । कळा बिंबीं पैसे । परी सिनानें लेवे जैसें । चंद्रीं नाहीं ॥ ५३ ॥ तैसींं सिनानीं चारीं पदें । श्लोक तो श्लोकावच्छेदें । अध्यावो अध्यायभेदें । गमे कीर ॥ ५४ ॥ परी प्रमेयाची उजरी । आनान रूप न धरी । नाना रत्नमणीं दोरी । एकचि जैसी ॥ ५५ ॥ मोतियें मिळोनि बहुवें । एकावळीचा पाडु आहे । परी शोभे रूप होये । एकचि तेथ ॥ ५६ ॥ फुलांफुलसरां लेख चढे । द्रुतीं दुजी अंगुळी न पडे । श्लोक अध्याय तेणें पाडें । जाणावे हे ॥ ५७ ॥ सात शतें श्लोक । अध्यायां अठरांचे लेख । परी देवो बोलिले एक । जें दुजें नाहीं ॥ ५८ ॥
आणि म्यांही न सांडूनि ते सोये । ग्रंथ व्यक्ति केली आहे । प्रस्तुत तेणें निर्वाहे । निरूपण आइका ॥ ५९ ॥ तरी सतरावा अध्यावो । पावतां पुरता ठावो । जें संपतां श्लोकीं देवो । बोलिले ऐसें ॥ ६० ॥ अर्जुना ब्रह्मनामाच्याविखीं। बुद्धि सांडूनि आस्तिकीं । कर्मे कीजती तितुकींंंं । असंतें होतीं ॥ ६१ ॥ हा ऐकोनि देवाचा बोलु । अर्जुना आला डोलु । म्हणे कर्मनिष्ठां मळु । ठेविला देखों ॥ ६२ ॥ तो अज्ञानांधु तंव बापुडा । ईश्वरुचि न देखे एवढा । तेथ नामचि एक पुढां । कां सुझे तया ॥ ६३ ॥ आणि रजतमें दोन्हीं । गेलियावीण श्रद्धा सानी । ते कां लागे अभिधानीं । ब्रह्माचिये ? । ॥ ६४ ॥ मग कोता खेंव देणें । वार्तेवरील धावणें । सांडी पडे खेळणें । नागिणीचें तें ॥ ६५ ॥ तैसीं कर्में दुवाडें । तयां जन्मांतराची कडे । दुर्मेळावे येवढे । कर्मामाजीं ॥ ६६ ॥ ना विपायें हें उजू होये । तरी ज्ञानाची योग्यता लाहे । येऱ्हवीं येणेंचि जाये । निरयालया ॥ ६७ ॥ कर्मीं हा ठायवरी । आहाती बहुवा अवसरी । आतां कर्मठां कैं वारी । मोक्षाची हे ॥ ६८ ॥ तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु । आदरिजो अव्यंगु । संन्यासु हा ॥ ६९ ॥ कर्मबाधेची कहीं । जेथ भयाची गोठी नाहीं । तें आत्मज्ञान जिहीं । स्वाधीन होय ॥ ७० ॥ ज्ञानाचें आवाहनमंत्र । जें ज्ञान पिकतें सुक्षेत्र । ज्ञान आकर्षितें सूत्र । तंतु जे का ॥ ७१ ॥ ते दोनी संन्यास त्याग । अनुष्ठूनि सुटे जग । तरी हेंचि आतां चांग । व्यक्त पुसों ॥ ७२ ॥ ऐसें म्हणौनि पार्थें । त्यागसंन्यासव्यवस्थे । रूप होआवया जेथें । प्रश्नु केला ॥ ७३ ॥ तेथ प्रत्युत्तरें बोली । श्रीकृष्णें जे चावळिली । तया व्यक्ति जाली । अष्टादशा ॥ ७४ ॥ एवं जन्यजनकभावें । अध्यावो अध्यायातें प्रसवे । आतां ऐका बरवें । पुसिलें जें ॥ ७५ ॥ तरी पंडुकुमरें तेणें । देवाचें सरतें बोलणें । जाणोनि अंतःकरणें । काणी घेतली ॥ ७६ ॥ येऱ्हवीं तत्वविषयीं भला । तो निश्चितु असे कीर जाहला । परी देवो राहे उगला । तें साहावेना ॥ ७७ ॥ वत्स धालयाही वरी । धेनू न वचावी दुरी । अनन्य प्रीतीची परी । ऐसी आहे ॥ ७८ ॥ तेणें काजेवीणही बोलावें । तें देखीलें तरी पाहावें । भोगितां चाड दुणावे । पढियंतयाठायीं ॥ ७९ ॥ ऐसी प्रेमाची हे जाती । आणि पार्थ तंव तेचि मूर्ती । म्हणौनि करूं लाहे खंती । उगेपणाची ॥ ८० ॥ आणि संवादाचेनि मिषें । जे अव्यवहारी वस्तु असे । ते भोगिजे कीं जैसें । आरिसां रूप ॥ ८१ ॥ मग संवादु तोही पारुखे । तरी भोगितां भोगणें थोके । हें कां साहवेल सुखें । लांचावलेया ? ॥ ८२ ॥ यालागीं त्याग संन्यास । पुसावयाचें घेऊनि मिस । मग उपलविलें दुस । गीतेंचें तें ॥ ८३ ॥ अठरावा अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे । जैं वांसरुचि गाय दुहे । तैं वेळु कायसा ॥ ८४ ॥ तैसी संपतां अवसरीं । गीता आदरविली माघारीं । स्वामी भृत्याचा न करी । संवादु काई ? ॥ ८५ ॥ परी हें असो ऐसें । अर्जुनें पुसिजत असे । म्हणे विनंती विश्वेशें । अवधारिजो ॥ ८६ ॥
अर्जुन उवाच । संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् । त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥ १॥
हां जी संन्यासु आणि त्यागु । इयां दोहीं एक अर्थीं लागु । जैसा सांघातु आणि संघु । संघातेंचि बोलिजे ॥ ८७ ॥ तैसेंचि त्यागें आणि संन्यासें । त्यागुचि बोलिजतु असे । आमचेनि तंव मानसें । जाणिजे हेंचि ॥ ८८ ॥ ना कांहीं आथी अर्थभेदु । तो देवो करोतु विशदु । तेथ म्हणती श्रीमुकुंदु । भिन्नचि पैं ॥ ८९ ॥ तरी अर्जुना तुझ्या मनीं । त्याग संन्यास दोनी । एकार्थ गमलें हें मानीं । मीही साच ॥ ९० ॥ इहीं दोहीं कीर शब्दीं । त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी । परी कारण एथ भेदीं । येतुलेंचि ॥ ९१ ॥ जें निपटूनि कर्म सांडिजे । तें सांडणें संन्यासु म्हणिजे । आणि फलमात्र का त्यजिजे । तो त्यागु गा ॥ ९२ ॥ तरी कोणा कर्माचें फळ । सांडिजे कोण कर्म केवळ । हेंही सांगों विवळ । चित्त दे पां ॥ ९३ ॥ तरी आपैसीं दांगें डोंगर । झाडें डाळती अपार । तैसें लांबे राजागर । नुठिती ते ॥ ९४ ॥ न पेरितां सैंघ तृणें । उठती तैसें साळीचें होणें । नाहीं गा राबाउणें । जियापरी ॥ ९५ ॥ कां अंग जाहलें सहजें । परी लेणें उद्यमें कीजे । नदी आपैसी आपादिजे । विहिरी जेवीं ॥ ९६ ॥ तैसें नित्य नैमित्तिक । कर्म होय स्वाभाविक । परी न कामितां कामिक । न निफजे जें ॥ ९७ ॥
श्रीभगवानुवाच । काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः । सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ २॥
कां कामनेचेनि दळवाडें । जें उभारावया घडे । अश्वमेधादिक फुडे । याग जेथ ॥ ९८ ॥ वापी कूप आराम । अग्रहारें हन महाग्राम । आणीकही नाना संभ्रम । व्रतांचे ते ॥ ९९ ॥ ऐसें इष्टापूर्त सकळ । जया कामना एक मूळ । जें केलें भोगवी फळ । बांधोनियां ॥ १०० ॥ देहाचिया गांवा अलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया । ना म्हणों नये धनंजया । जियापरी ॥ १०१ ॥ का ललाटींचें लिहिलें । न मोडे गा कांहीं केलें । काळेगोरेपण धुतलें । फिटों नेणे ॥ १०२ ॥ केलें काम्य कर्म तैसें । फळ भोगावया धरणें बैसे । न फेडितां ऋण जैसें । वोसंडीना ॥ १०३ ॥ कां कामनाही न करितां । अवसांत घडे पंडुसुता । तरी वायकांडें न झुंजतां । लागे जैसें ॥ १०४ ॥ गूळ नेणतां तोंडीं । घातला देचि गोडी । आगी मानूनि राखोंडी । चेपिला पोळी ॥ १०५ ॥ काम्यकर्मी हें एक । सामर्थ्य आथी स्वाभाविक । म्हणौनि नको कौतुक । मुमुक्षु एथ ॥ १०६ ॥ किंबहुना पार्था ऐसें । जें काम्य कर्म गा असे । तें त्यजिजे विष जैसें । वोकूनियां ॥ १०७ ॥ मग तया त्यागातें जगीं । संन्यासु ऐसया भंगीं । बोलिजे अंतरंगीं । सर्वद्रष्टा ॥ १०८ ॥ हें काम्य कर्म सांडणें । तें कामनेतेंचि उपडणें । द्रव्यत्यागें दवडणें । भय जैसें ॥ १०९ ॥ आणि सोमसूर्यग्रहणें । येऊनि करविती पार्वणें । का मातापितरमरणें । अंकित जे दिवस ॥ ११० ॥ अथवा अतिथी हन पावे । हें ऐसैसें पडे जैं करावें । तैं तें कर्म जाणावें । नौमित्तिक गा ॥ १११ ॥ वार्षिया क्षोमे गगन । वसंतें दुणावे वन । देहा श्रृंगारी यौवन\- । दशा जैसी ॥ ११२ ॥ का सोमकांतु सोमें पघळें । सूर्यें फांकती कमळें । एथ असे तेंचि पाल्हाळे । आन नये ॥ ११३ ॥ तैसें नित्य जें का कर्म । तेंचि निमित्ताचे लाहे नियम । एथ उंचावे तेणें नाम । नैमित्तिक होय ॥ ११४ ॥ आणि सायंप्रातर्मध्यान्हीं । जें कां करणीय प्रतिदिनीं । परी दृष्टि जैसी लोचनीं । अधिक नोहे ॥ ११५ ॥ कां नापादितां गती । चरणीं जैसी आथी । नातरी ते दीप्ती । दीपबिंबीं ॥ ११६ ॥ वासु नेदितां जैसे । चंदनीं सौरभ्य असे । अधिकाराचे तैसें । रूपचि जें ॥ ११७ ॥ नित्य कर्म ऐसें जनीं । पार्था बोलिजे तें मानीं । एवं नित्य नैमित्तिक दोन्हीं । दाविलीं तुज ॥ ११८ ॥ हेंचि नित्य नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक । म्हणौनि म्हणोंं पाहती एक । वांझ ययातें ॥ ११९ ॥ परी भोजनीं जैसें होये । तृप्ति लाहे भूक जाये । तैसे नित्यनैमित्तिकीं आहे । सर्वांगीं फळ ॥ १२० ॥ कीड आगिठां पडे । तरी मळु तुटे वानी चढे । यया कर्मा तया सांगडें । फळ जाणावें ॥ १२१ ॥ जे प्रत्यवाय तंव गळे । स्वाधिकार बहुवें उजळे । तेथ हातोफळिया मिळे । सद्गतीसी ॥ १२२ ॥ येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकीं आहे फळ । परी तें त्यजिजे मूळ । नक्षत्रीं जैसें ॥ १२३ ॥ लता पिके आघवी । तंव च्यूत बांधे पालवीं । मग हात न लावित माधवीं । सोडूनि घाली ॥ १२४ ॥ तैसी नोलांडितां कर्मरेखा । चित्त दीजे नित्यनैमित्तिका । पाठीं फळा कीजे अशेखा । वांताचे वानी ॥ १२५ ॥ यया कर्म फळत्यागातें । त्यागु म्हणती पैं जाणते । एवं त्याग संन्यास तूतें । परीसविले ॥ १२६ ॥ हा संन्यासु जैं संभवे । तैं काम्य बाधूं न पावे । निषिद्ध तंव स्वभावें । निषेधें गेलें ॥ १२७ ॥ आणि नित्यादिक जें असे । तें येणें फलत्यागें नसे । शिर लोटलिया जैसें । येर आंग ॥ १२८ ॥ मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसीत । अपैसें ये ॥ १२९ ॥ ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानीं । पडले गा आत्मज्ञानीं । बांधती पाटु ॥ १३० ॥ नातरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुकें । तैं कांहीं न त्यजे अधिकें । गोंवींचि पडे ॥ १३१ ॥ जें औषध व्याधी अनोळख । तें घेतलिया परतें विख । कां अन्न न मानितां भूक । मारी ना काय ? ॥ १३२ ॥ म्हणौनि त्याज्य जें नोहे । तेथ त्यागातें न सुवावें । त्याज्यालागीं नोहावें । लोभापर ॥ १३३ ॥ चुकलिया त्यागाचें वेझें । केला सर्वत्यागुही होय वोझें । न देखती सर्वत्र दुजें । वीतराग ते ॥ १३४ ॥
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः । यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ ३॥
एकां फळाभिलाष न ठके । ते कर्मांते म्हणती बंधकें । जैसें आपण नग्न भांडकें । जगातें म्हणे ॥ १३५ ॥ कां जिव्हालंपट रोगिया । अन्नें दूषी धनंजया । आंगा न रुसे कोढिया । मासियां कोपे ॥ १३६ ॥ तैसे फळकाम दुर्बळ । म्हणती कर्मचि किडाळ । मग निर्णयो देती केवळ । त्यजावें ऐसा ॥ १३७ ॥ एक म्हणती यागादिक । करावेंचि आवश्यक । जे यावांचूनि शोधक । आन नसे ॥ १३८ ॥ मनशुद्धीच्या मार्गीं । जैं विजयी व्हावें वेगीं । तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ॥ १३९ ॥ भांगार आथी शोधावें । तरी आगी जेवी नुबगावें । कां दर्पणालागीं सांचावें । अधिक रज ॥ १४० ॥ नाना वस्त्रें चोख होआवीं । ऐसें आथी जरी जीवीं । तरी संवदणी न मनावी । मलिन जैसी ॥ १४१ ॥ तैसीं कर्में क्लेशकारें । म्हणौनि न न्यावीं अव्हेरें । कां अन्नलाभें अरुवारें । रांधितिये उणें ॥ १४२ ॥ इहीं इहीं गा शब्दीं । एक कर्मीं बांधिती बुद्धी । ऐसा त्यागु विसंवादीं । पडोनि ठेला ॥ १४३ ॥ तरी विसंवादु तो फिटे । त्यागाचा निश्चयो भेटे । तैसें बोलों गोमटें । अवधान देईं ॥ १४४ ॥
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम । त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥ ४॥
तरी त्यागु एथें पांडवा । त्रिविधु पैं जाणावा । तया त्रिविधाही बरवा । विभाग करूं ॥ १४५ ॥ त्यागाचे तीन्ही प्रकार । कीजती जरी गोचर । तरी तूं इत्यर्थाचें सार । इतुलें जाण ॥ १४६ ॥ मज सर्वज्ञाचिये बुद्धी । जें अलोट माने त्रिशुद्धी । निश्चयतत्व तें आधीं । अवधारीं पां ॥ १४७ ॥ तरी आपुलिये सोडवणें । जो मुमुक्षु जागों म्हणे । तया सर्वस्वें करणें । हेंचि एक ॥ १४८ ॥
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् । यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥ ५॥
जियें यज्ञदानतपादिकें । इयें कर्में आवश्यकें । तियें न सांडावीं पांथिकें । पाउलें जैसीं ॥ १४९ ॥ हारपलें न देखिजे । तंव तयाचा मागु न सांडिजे । कां तृप्त न होतां न लोटिजे । भाणें जेवीं ॥ १५० ॥ नाव थडी न पवतां । न खांडिजे केळी न फळतां । कां ठेविलें न दिसतां । दीपु जैसा ॥ १५१ ॥ तैसी आत्मज्ञानविखीं । जंव निश्चिती नाहीं निकी । तंव नोहावें यागादिकीं । उदासीन ॥ १५२ ॥ तरी स्वाधिकारानुरुपें । तियें यज्ञदानें तपें । अनुष्ठावींचि साक्षेपें । अधिकेंवर ॥ १५३ ॥ जें चालणें वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे । नैष्कर्म्यालागीं ॥ १५४ ॥ अधिकें जंव जंव औषधी । सेवनेची मांडी बांधी । तंव तंव मुकिजे व्याधी । तयाचिये ॥ १५५ ॥ तैसीं कर्में हातोपातीं । जैं कीजती यथानिगुती । तैं रजतमें झडती । झाडा देऊनी ॥ १५६ ॥ कां पाठोवाटीं पुटें । भांगारा खारु देणें घटे । तैं कीड झडकरी तुटे । निर्व्याजु होय ॥ १५७ ॥ तैसें निष्ठा केलें कर्म । तें झाडी करूनि रजतम । सत्वशुद्धीचें धाम । डोळां दावी ॥ १५८ ॥ म्हणौनियां धनंजया । सत्वशुद्धी गिंवसितया । तीर्थांचिया सावाया । आलीं कर्में ॥ १५९ ॥ तीर्थें बाह्यमळु क्षाळे । कर्में अभ्यंतर उजळे । एवं तीर्थें जाण निर्मळें । सत्कर्मे.चि ॥ १६० ॥ तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें वोळलीं जैसींं । कीं अंधालागीं डोळ्यांसी । सूर्यु आला ॥ १६१ ॥ बुडतया नदीच धाविन्नली । पडतया पृथ्वीच कळवळिली । निमतया मृत्यूनें दिधली । आयुष्यवृद्धी ॥ १६२ ॥ तैसें कर्में कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता । जैसा रसरीति मरतां । राखिला विषें ॥ १६३ ॥ तैसीं एके हातवटिया । कर्में कीजती धनंजया । बंधकेंचि सोडवावया । मुख्यें होती ॥ १६४ ॥ आतां तेचि हातवटी । तुज सांगों गोमटी । जया कर्मातें किरीटी । कर्मचि रुसे ॥ १६५ ॥
एतान्यपि तु कर्माणि सण्गं त्यक्त्वा फलानि च । कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥ ६॥
तरी महायागप्रमुखें । कर्मे निफजतांही अचुकें । कर्तेपणाचें न ठाके । फुंजणें आंगीं ॥ १६६ ॥ जो मोलें तीर्था जाये । तया मी यात्रा करितु आहे । ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे । तोषु जेवीं ॥ १६७ ॥ कां मुद्रा समर्थाचिया । जो एकवटु झोंबे राया । तो मी जिणता ऐसिया । न येचि गर्वा ॥ १६८ ॥ जो कासें लागोनि तरे । तया पोहती ऊर्मी नुरे । पुरोहितु नाविष्करे । दातेपणें ॥ १६९ ॥ तैसें कर्तृत्व अहंकारें । नेघोनि यथा अवसरें । कृत्यजातांचें मोहरें । सारीजती ॥ १७० ॥ केल्या कर्मा पांडवा । जो आथी फळाचा यावा । तया मोहरा हों नेदावा । मनोरथु ॥ १७१ ॥ आधींचि फळीं आस तुटिया । कर्मे आरंभावीं धनंजया । परावें बाळ धाया । पाहिजे जैसें ॥ १७२ ॥ पिंपरुवांचिया आशा । न शिंपिजे पिंपळु जैसा । तैसिया फळनिराशा । कीजती कर्में ॥ १७३ ॥ सांडूनि दुधाची टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ॥ १७४ ॥ ऐसी हे हातवटी । घेऊनि जे क्रिया उठी । आपणा आपुलिया गांठी । लाहेची तो ॥ १७५ ॥ म्हणौनि फळीं लागु । सांडोनि देहसंगु । कर्में करावीं हा चांगु । निरोपु माझा ॥ १७६ ॥ जो जीवबंधीं शिणला । सुटके जाचे आपला । तेणें पुढतपुढतीं या बोला । आन न कीजे ॥ १७७ ॥
नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते । मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥ ७॥
नातरी आंधाराचेनि रोखें । जैसीं डोळां रोंविजती नखें । तैसा कर्मद्वेषें अशेखें । कर्मेंचि सांडी ॥ १७८ ॥ तयाचें जें कर्म सांडणें । तें तामस पैं मी म्हणें । शिसाराचे रागें लोटणें । शिरचि जैसें ॥ १७९ ॥ हां गा मार्गु दुवाडु होये । तरी निस्तरितील पाये । कीं तेचि खांडणें आहे । मार्गापराधें ॥ १८० ॥ भुकेलियापुढें अन्न । हो कां भलतैसें उन्ह । तरी बुद्धी न घेतां लंघन । भाणें पापरां हल्या ॥ १८१ ॥ तैसा कर्माचा बाधु कर्में । निस्तरीजे करितेनि वर्में । हे तामसु नेणें भ्रमें । माजविला ॥ १८२ ॥ कीं स्वभावें आलें विभागा । तें कर्मचि वोसंडी पैं गा । तरी झणें आतळा त्यागा । तामसा तया ॥ १८३ ॥
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् । स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥ ८॥
अथवा स्वाधिकारु बुझे । आपले विहितही सुजे । परी करितया उमजे । निबरपणा ॥ १८४ ॥ जे कर्माची ऐलीकड । नावेक दिसे दुवाड । जे वाहतिये वेळे जड । शिदोरी जैसी ॥ १८५ ॥ जैसा निंब जिभे कडवटु । हिरडा पहिलें तुरटु । तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ॥ १८६ ॥ कां धेनु दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग । भोजनसुख महाग । पाकु करितां ॥ १८७ ॥ तैसें पुढतपुढती कर्म । आरंभींच अति विषम । म्हणौनि तो तें श्रम । करितां मानी ॥ १८८ ॥ येऱ्हवीं विहितत्वें मांडी । परी घालितां असुरवाडीं । तेथ पोळला ऐसा सांडी । आदरिलेंही ॥ १८९ ॥ म्हणे वस्तु देहासारिखी । आली बहुतीं भाग्यविशेखीं । मा जाचूं कां कर्मादिकीं । पापिया जैसा ? ॥ १९० ॥ केलें कर्मीं जे द्यावें । तें झणें मज होआवें । आजि भोगूं ना कां बरवे । हातींचे भोग ? ॥ १९१ ॥ ऐसा शरीराचिया क्लेशा । भेणें कर्में वीरेशा । सांडी तो परीयेसा । राजसु त्यागु ॥ १९२ ॥ येऱ्हवीं तेथही कर्म सांडे । परी तया त्यागफळ न जोडे । जैसें उतलें आगीं पडे । तें नलगेचि होमा ॥ १९३ ॥ कां बुडोनि प्राण गेले । ते अर्धोदकीं निमाले । हें म्हणों नये जाहलें । दुर्मरणचि ॥ १९४ ॥ तैसें देहाचेनि लोभें । जेणें कर्मा पाणी सुभे । तेणें साच न लभे । त्यागाचें फळ ॥ १९५ ॥ किंबहुना आपुलें । जैं ज्ञान होय उदया आलें । तैं नक्षत्रातें पाहलें । गिळी जैसें ॥ १९६ ॥ तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया । तो कर्मत्यागु ये जया । मोक्षफळासी ॥ १९७ ॥ तें मोक्षफळ अज्ञाना । त्यागिया नाहीं अर्जुना । म्हणौनि तो त्यागु न माना । राजसु जो ॥ १९८ ॥ तरी कोणे पां एथ त्यागें । तें मोक्षफळ घर रिघे । हेंही आइक प्रसंगे । बोलिजेल ॥ १९९ ॥
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन । सण्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ ९॥
तरी स्वाधिकाराचेनि नांवें । जें वांटिया आलें स्वभावें । तें आचरे विधिगौरवें । शृंगारोनि ॥ २०० ॥ परी हें मी करितु असें । ऐसा आठवु त्यजी मानसें । तैसेचि पाणी दे आशे । फळाचिये ॥ २०१ ॥ पैं अवज्ञा आणि कामना । मातेच्या ठायीं अर्जुना । केलिया दोनी पतना । कारण होती ॥ २०२ ॥ तरी दोनीं यें त्यजावीं । मग माताची ते भजावी । वांचूनि मुखालागीं वाळावी । गायचि सगळी ? ॥ २०३ ॥ आवडतियेही फळीं । असारें साली आंठोळीं । त्यासाठीं अवगळी । फळातें कोण्ही ? ॥ २०४ ॥ तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ॥ २०५ ॥ तरी या दोहींच्या विखीं । जैसा बापु नातळे लेंकीं । तैसा हों न शके दुःखी । विहिता क्रिया ॥ २०६ ॥ हा तो त्याग तरुवरु । जो गा मोक्षफळें ये थोरु । सात्विक ऐसा डगरु । यासींच जगीं ॥ २०७ ॥ आतां जाळूनि बीज जैसें । झाडा कीजे निर्वंशें । फळ त्यागूनि कर्म तैसें । त्यजिलें जेणें ॥ २०८ ॥ लोह लागतखेंवो परीसीं । धातूची गंधिकाळिमा जैसी । जाती रजतमें तैसीं । तुटलीं दोन्ही ॥ २०९ ॥ मग सत्वें चोखाळें । उघडती आत्मबोधाचे डोळे । तेथ मृगांबु सांजवेळे । होय जैसें ॥ २१० ॥ तैसा बुद्ध्यादिकांपुढां । असतु विश्वाभासु हा येवढा । तो न देखे कवणीकडां । आकाश जैसें ॥ २११ ॥
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते । त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १०॥
म्हणौनि प्राचिनाचेनि बळें । अलंकृतें कुशलाकुशलें । तियें व्योमाआंगीं आभाळें । जिरालीं जैसीं ॥ २१२ ॥ तैसीं तयाचिये दिठी । कर्में चोखाळलीं किरीटी । म्हणौनि सुखदुःखीं उठी । पडेना तो ॥ २१३ ॥ तेणें शुभकर्म जाणावें । मग तें हर्षें करावें । कां अशुभालागीं होआवें । द्वेषिया ना ॥ २१४ ॥ तरी इयाविषयींचा कांहीं । तया एकुही संदेहो नाहीं । जैसा स्वप्नाच्या ठायीं । जागिन्नलिया ॥ २१५ ॥ म्हणौनि कर्म आणि कर्ता । या द्वैतभावाची वार्ता । नेणें तो पंडुसुता । सात्विक त्यागु ॥ २१६ ॥ ऐसेनि कर्में पार्था । त्यजिलीं त्यजिती सर्वथा । अधिकें बांधिती अन्यथा । सांडिलीं तरी ॥ २१७ ॥
न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः । यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥ ११॥
आणि हां गा सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ २१८ ॥ मृत्तिकेचा वीटु । घेऊनि काय करील घटु ? । केउता ताथु पटु । सांडील तो ? ॥ २१९ ॥ तेवींचि वन्हित्व आंगीं । आणि उबे उबगणें आगी । कीं तो दीपु प्रभेलागीं । द्वेषु करील काई ? ॥ २२० ॥ हिंगु त्रासिला घाणी । तरी कैचें सुगंधत्व आणी ? । द्रवपण सांडूनि पाणी । कें राहे तें ? ॥ २२१ ॥ तैसा शरीराचेनि आभासें । नांदतु जंव असे । तंव कर्मत्यागाचें पिसें । काइसें तरी ? ॥ २२२ ॥ आपण लाविजे टिळा । म्हणौनि पुसों ये वेळोवेळा । मा घाली फेडी निडळा । कां करूं ये गा ? ॥ २२३ ॥ तैसें विहित स्वयें आदरिलें । म्हणौनि त्यजूं ये त्यजिलें । परी कर्मचि देह आतलें । तें कां सांडील गा ? ॥ २२४ ॥ जें श्वासोच्छ्वासवरी । होत निजेलियाहीवरी । कांहीं न करणेंयाचि परी । होती जयाची ॥ २२५ ॥ या शरीराचेनि मिसकें । कर्मची लागलें असिकें । जितां मेलया न ठाके । इया रीती ॥ २२६ ॥ यया कर्मातें सांडिती परी । एकीचि ते अवधारीं । जे करितां न जाइजे हारीं । फळशेचिये ॥ २२७ ॥ कर्मफळ ईश्वरीं अर्पे । तत्प्रसादें बोधु उद्दीपें । तेथ रज्जुज्ञानें लोपे । व्याळशंका ॥ २२८ ॥ तेणें आत्मबोधें तैसें । अविद्येसीं कर्म नाशे । पार्था त्यजिजे जैं ऐसें । तैं त्यजिलें होय ॥ २२९ ॥ म्हणौनि इयापरी जगीं । कर्में करितां मानूं त्यागी । येर मुर्छने नांव रोगी । विसांवा जैसा ॥ २३० ॥ तैसा कर्मीं शिणे एकीं । तो विसांवो पाहे आणिकीं । दांडेयाचे घाय बुकी । धाडणें जैसें ॥ २३१ ॥ परी हें असो पुढती । तोचि त्यागी त्रिजगतीं । जेणें फळत्यागें निष्कृती । नेलें कर्म ॥ २३२ ॥
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् । भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ॥ १२॥
येऱ्हवीं तरी धनंजया । त्रिविधा कर्मफळा गा यया । समर्थ ते कीं भोगावया । जे न सांडितीचि आशा ॥ २३३ ॥ आपणचि विऊनि दुहिता । कीं न मम म्हणे पिता । तो सुटे कीं प्रतिग्रहीता । जांवई शिरके ॥ २३४ ॥ विषाचे आगरही वाहती । तें विकितां सुखें लाभे जिती । येर निमालें जे घेती । वेंचोनि मोलें ॥ २३५ ॥ तैसें कर्ता कर्म करू । अकर्ता फळाशा न धरू । एथ न शके आवरूं । दोहींतें कर्म ॥ २३६ ॥ वाटे पिकलिया रुखाचें । फळ अपेक्षी तयाचें । तेवीं साधारण कर्माचें । फळ घे तया ॥ २३७ ॥ परी करूनि फळ नेघे । तो जगाच्या कामीं न रिघे । जे त्रिविध जग अवघें । कर्मफळ हें ॥ २३८ ॥ देव मनुष्य स्थावर । यया नांव जगडंबर । आणि हे तंव तिन्ही प्रकार । कर्मफळांचे ॥ २३९ ॥ तेंचि एक गा अनिष्ट । एक तें केवळ इष्ट । आणि एक इष्टानिष्ट । त्रिविध ऐसें ॥ २४० ॥ परी विषयमंतीं बुद्धी । आंगीं सूनि अविधी । प्रवर्तती जे निषिद्धीं । कुव्यापारीं ॥ २४१ ॥ तेथ कृमि कीट लोष्ट । हे देह लाहती निकृष्ट । तया नाम तें अनिष्ट । कर्मफळ ॥ २४२ ॥ कां स्वधर्मा मानु देतां । स्वाधिकारु पुढां सूतां । सुकृत कीजे पुसतां । आम्नायातें ॥ २४३ ॥ तैं इंद्रादिक देवांचीं । देहें लाहिजती सव्यसाची । तया कर्मफळा इष्टाची । प्रसिद्धि गा ॥ २४४ ॥ आणि गोड आंबट मिळे । तेथ रसांतर फरसाळें । उठी दोंही वेगळें । दोहीं जिणतें ॥ २४५ ॥ रेचकुचि योगवशें । होय स्तंभावयादोषें । तेवीं सत्यासत्य समरसें । सत्यासत्यचि जिणिजे ॥ २४६ ॥ म्हणौनि समभागें शुभाशुभें । मिळोनि अनुष्ठानाचें उभें । तेणें मनुष्यत्व लाभे । तें मिश्र फळ ॥ २४७ ॥ ऐसें त्रिविध यया भागीं । कर्मफळ मांडलेसें जगीं । हें न सांडी तयां भोगीं । जें सूदले आशा ॥ २४८ ॥ जेथें जिव्हेचा हातु फांटे । तंव जेवितां वाटे गोमटें । मग परीणामीं शेवटें । अवश्य मरण ॥ २४९ ॥ संवचोरमैत्री चांग । जंव न पविजे तें दांग । सामान्या भली आंग । न शिवे तंव ॥ २५० ॥ तैसीं कर्में करितां शरीरीं । लाहती महत्त्वाची फरारी । पाठीं निधनीं एकसरी । पावती फळें ॥ २५१ ॥ तैसा समर्थु आणि ऋणिया । मागों आला बाइणिया । न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु ॥ २५२ ॥ मग कणिसौनि कणु झडे । तो विरूढला कणिसा चढे । पुढती भूमी पडे । पुढती उठी ॥ २५३ ॥ तैसें भोगीं जें फळ होय । तें फळांतरें वीत जाय । चालतां पावो पाय । जिणिजे जैसा ॥ २५४ ॥ उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी । तेवीं न मुकीजती वोढी । भोग्याचिये ॥ २५५ ॥ पैं साध्यसाधनप्रकारें । फळभोगु तो पसरे । एवं गोंविले संसारें । अत्यागी ते ॥ २५६ ॥ येऱ्हवीं जाईचियां फुलां फांकणें । त्याचि नाम जैसें सुकणें । तैसें कर्ममिषें न करणें । केलें जिहीं ॥ २५७ ॥ बीजचि वरोसि वेंचे । तेथ वाढती कुळवाडी खांचे । तेवीं फळत्यागें कर्माचें । सारिलें काम ॥ २५८ ॥ ते सत्वशुद्धि साहाकारें । गुरुकृपामृततुषारें । सासिन्नलेनि बोधें वोसरे । द्वैतदैन्य ॥ २५९ ॥ तेव्हां जगदाभासमिषें । स्फुरे तें त्रिविध फळ नाशे । एथ भोक्ता भोग्य आपैसें । निमालें हें ॥ २६० ॥ घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जयां वीरेशा । तेचि फलभोग सोसा । मुकले गा ॥ २६१ ॥ आणि येणें कीर संन्यासें । जैं आत्मरूपीं दिठी पैसे । तैं कर्म एक ऐसें । देखणें आहे ? ॥ २६२ ॥ पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती । कां पाहालेया राती । आंधारें उरे ? ॥ २६३ ॥ जैं रूपचि नाहीं उभें । तैं साउली काह्याची शोभे ? । दर्पणेवीण बिंबें । वदन कें पां ? ॥ २६४ ॥ फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो ? । मग साच का वावो । कोण म्हणे ? ॥ २६५ ॥ तैसें गा संन्यासें येणें । मूळ अविद्येसीचि नाहीं जिणें । मा तियेचें कार्य कोणें । घेपे दीजे ? ॥ २६६ ॥ म्हणौनि संन्यासी ये पाहीं । कर्माची गोठी कीजेल खई । परी अविद्या आपुलाम् देहीं । आहे जै कां ॥ २६७ ॥ जैं कर्तेपणाचेनि थांवें । आत्मा शुभाशुभीं धांवें । दृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जैं ॥ २६८ ॥ तैं तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा । अपाडें जैसी पश्चिमा । पूर्वेसि कां ॥ २६९ ॥ नातरी आकाशा का आभाळा । सूर्या आणि मृगजळा । बिजावळी भूतळा । वायूसि जैसी ॥ २७० ॥ पांघरौनि नईचें उदक । असे नईचिमाजीं खडक । परी जाणिजे का वेगळिक । कोडीची ते ॥ २७१ ॥ हो कां उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी । काय संगास्तव काजळी । दीपु म्हणों ये ? ॥ २७२ ॥ जरी चंद्रीं जाला कलंकु । तरी चंद्रेसीं नव्हे एकु । आहे दृष्टी डोळ्यां विवेकु । अपाडु जेतुला ॥ २७३ ॥ नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघीं वाहातया । आरसा आरसां पाहातया । अपाडु जेतुला ॥ २७४ ॥ पार्था गा तेतुलेनि मानें । आत्मेंनिसीं कर्म सिनें । परी घेवविजे अज्ञानें । तें कीर ऐसें ॥ २७५ ॥ विकाशें रवीतें उपजवी । द्रुती अलीकरवी भोगवी । ते सरोवरीं कां बरवी । अब्जिनी जैसी ॥ २७६ ॥ पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया । करूं पांचांही तयां । कारणां रूप ॥ २७७ ॥
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे । साण्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ॥ १३॥
आणि पांचही कारणें तियें । तूंही जाणसील विपायें । जें शास्त्रें उभऊनी बाहे । बोलती तयांते ॥ २७८ ॥ वेदरायाचिया राजधानीं । सांख्यवेदांताच्या भुवनीं । निरूपणाच्या निशाणध्वनीं । गर्जती जियें ॥ २७९ ॥ जें सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं । तेथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु ॥ २८० ॥ ह्या बोलाचि डांगुरटी । तियें प्रसिद्धीचि आली किरीटी । म्हणौनि तुझ्या हन कर्णपुटीं । वसों हें काज ॥ २८१ ॥ आणि मुखांतरीं आइकिजे । तैसें कायसें हें ओझें । मी चिद्रत्न तुझें । असतां हातीं ॥ २८२ ॥ दर्पणु पुढां मांडलेया । कां लोकांचियां डोळयां । मानु द्यावा पहावया । आपुलें निकें ॥ २८३ ॥ भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये । तो मी तुझें जाहालों आहें । खेळणें आजी ॥ २८४ ॥ ऐसें हें प्रीतीचेनि वेगें । देवो बोलतां से नेघे । तंव आनंदामाजीं आंगें । विरतसे येरु ॥ २८५ ॥ चांदिणियाचा पडिभरु । होतां सोमकांताचा डोंगरु । विघरोनि सरोवरु । हों पाहे जैसा ॥ २८६ ॥ तैसें सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती । आतलें अर्जुनाकृति । सुखचि जेथ ॥ २८७ ॥ तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा । मग बुडतयाचा धांवा । जीवें केला ॥ २८८ ॥ अर्जुना येसणें धेंडें । प्रज्ञा पसरेंसीं बुडे । आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती ॥ २८९ ॥ देवो म्हणे हां गा पार्था । तूं आपणपें देख सर्वथा । तंव श्वासूनि येरें माथा । तुकियेला ॥ २९० ॥ म्हणे जाणसी दातारा । मी तुजशीं व्यक्तिशेजारा । उबगला आजी एकाहारा । येवों पाहें ॥ २९१ ॥ तयाही हा ऐसा । लोभें देतसां जरी लालसा । तरी कां जी घालीतसां । आड आड जीवा ? ॥ २९२ ॥ तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें । अद्यापि नाहीं मा ठाऊकें । वेडया चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणें आहे ?॥ २९३ ॥ आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊं आम्ही भिवों । जे रुसतां बांधे थांवो । तें प्रेम गा हें ॥ २९४ ॥ एथ एकमेकांचिये खुणें । विसंवादु तंवचि जिणें । म्हणौनि असो हें बोलणें । इयेविषयींचें ॥ २९५ ॥ मग कैशी कैशी ते आतां । बोलत होतों पंडुसुता । सर्व कर्मा भिन्नता । आत्मेनिसीं ॥ २९६ ॥ तंव अर्जुन म्हणे देवें । माझिये मनींचेंचि स्वभावें । प्रस्ताविलें बरवें । प्रमेय तें जी ॥ २९७ ॥ जें सकळ कर्माचें बीज । कारणपंचक तुज । सांगेन ऐसी पैज । घेतली कां ॥ २९८ ॥ आणि आत्मया एथ कांहीं । सर्वथा लागु नाहीं । हें पुढारलासि ते देईं । लाहाणें माझें ॥ २९९ ॥ यया बोला विश्वेशें । म्हणितलें तोषें बहुवसे । इयेविषयीं धरणें बैसे। ऐसें कें जोडे ? ॥ ३०० ॥ तरी अर्जुना निरूपिजेल । तें कीर भाषेआंतुल । परी मेचु ये होईजेल । ऋणिया तुज ॥ ३०१ ॥ तंव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो ? । इये गोंठीस कीं राखत आहों । मीतूंपण जी ? ॥ ३०२ ॥ एथ श्रीकृष्ण म्हणती हो कां । आतां अवधानाचा पसरु निका । करूनियां आइका । पुढारलों तें ॥ ३०३ ॥ तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा । होतसे बहिरबाहिरा । करणीं पांचें ॥ ३०४ ॥ आणि पांच कारण दळवाडें । जिहीं कर्माकारु मांडे । ते हेतुस्तव घडे । पांच आथी ॥ ३०५ ॥ येर आत्मतत्त्व उदासीन । तें ना हेतु ना उपादान । ना ते अंगें करी संवाहन । कर्मसिद्धीचें ॥ ३०६ ॥ तेथ शुभाशुभीं अंशीं । निफजती कर्में ऐसीं । राती दिवो आकाशीं । जियापरी ॥ ३०७ ॥ तोय तेज धूमु । ययां वायूसीं संगमु । जालिया होय अभ्रागमु । व्योम तें नेणें ॥ ३०८ ॥ नाना काष्ठीं नाव मिळे । ते नावाडेनि चळे । चालविजे अनिळें । उदक तें साक्षी ॥ ३०९ ॥ कां कवणे एकें पिंडे । वेंचितां अवतरे भांडें । मग भवंडीजे दंडें । भ्रमे चक्र ॥ ३१० ॥ आणि कर्तृत्व कुलालाचें । तेथ काय तें पृथ्वीयेचें । आधारावांचूनि वेंचे । विचारीं पां । ॥ ३११ ॥ हेंहि असो लोकांचिया । राहाटी होतां आघविया । कोण काम सवितया । आंगा आलें ? ॥ ३१२ ॥ तैसें पांचहेतुमिळणीं । पांचेंचि इहीं कारणीं । कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना ॥ ३१३ ॥ आतां तेंचि वेगळालीं । पांचही विवंचूं गा भलीं । तुकोनि घेतलीं । मोतियें जैसीं ॥ ३१४ ॥
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् । विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥ १४॥
तैसीं यथा लक्षणें । आइकें कर्म\-कारणें । तरी देह हें मी म्हणें । पहिलें एथ ॥ ३१५ ॥ ययातें अधिष्ठान ऐसें । म्हणिजे तें याचि उद्देशें । जे स्वभोग्येंसीं वसे । भोक्ता येथ ॥ ३१६ ॥ इंद्रियांच्या दाहें हातीं । जाचोनियां दिवोराती । सुखदुःखें प्रकृती । जोडीजती जियें ॥ ३१७ ॥ तियें भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाहीं देखा । म्हणौनि अधिष्ठानभाखा । बोलिजे देह ॥ ३१८ ॥ हें चोविसांही तत्वांचें । कुटुंबघर वस्तीचें । तुटे बंधमोक्षाचें । गुंथाडे एथ ॥ ३१९ ॥ किंबहुना अवस्थात्रया । हें अधिष्ठान धनंजया । म्हणौनि देहा यया । हेंचि नाम ॥ ३२० ॥ आणि कर्ता हें दुजें । कर्माचें कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ॥ ३२१ ॥ आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ॥ ३२२ ॥ कां निद्राभरें बहुवें । राया आपणपें ठाउवें नव्हे । मग स्वप्नींचिये सामावे । रंकपणीं ॥ ३२३ ॥ तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारें । आभासोनि आविष्करें । देहपणें जें ॥ ३२४ ॥ जया विसराच्या देशीं । प्रसिद्धि गा जीवु ऐसी । जेणें भाष केली देहेंसी । आघवाविषयीं ॥ ३२५ ॥ प्रकृति करी कर्में । तीं म्यां केलीं म्हणे भ्रमें । येथ कर्ता येणें नामें । बोलिजे जीवु ॥ ३२६ ॥ मग पातेयांच्या केशीं । एकीच उठी दिठी जैसी । मोकळी चवरी ऐसी । चिरीव गमे ॥ ३२७ ॥ कां घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु । गवाक्षभेदें अनेकु । आवडे जेवीं ॥ ३२८ ॥ कां एकुचि पुरुषु जैसा । अनुसरत नवां रसां । नवविधु ऐसा । आवडों लागे ॥ ३२९ ॥ तेवीं बुद्धीचें एक जाणणें । श्रोत्रादिभेदें येणें । बाहेरी इंद्रियपणें । फांके जें कां ॥ ३३० ॥ तें पृथग्विध करण । कर्माचें इया कारण । तिसरें गा जाण । नृपनंदना ॥ ३३१ ॥ आणि पूर्वपश्चिमवाहणीं । निघालिया वोघाचिया मिळणी । होय नदी नद पाणी । एकचि जेवीं ॥ ३३२ ॥ तैसी क्रियाशक्ति पवनीं । असे जे अनपायिनी । ते पडिली नानास्थानीं । नाना होय ॥ ३३३ ॥ जैं वाचे करी येणें । तैं तेंचि होय बोलणें । हाता आली तरी घेणें । देणें होय ॥ ३३४ ॥ अगा चरणाच्या ठायीं । तरी गति तेचि पाहीं । अधोद्वारीं दोहीं । क्षरणें तेचि ॥ ३३५ ॥ कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी । करितां तेचि शरीरीं । प्राणु म्हणिजे ॥ ३३६ ॥ मग उर्ध्वींचिया रिगानिगा । पुढती तेचि शक्ति पैं गा । उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली ॥ ३३७ ॥ अधोरंध्राचेनि वाहें । अपानु हें नाम लाहे । व्यापकपणें होये । व्यानु तेचि ॥ ३३८ ॥ आरोगिलेनि रसें । शरीर भरी सरिसें । आणि न सांडितां असे । सर्वसंधीं ॥ ३३९ ॥ ऐसिया इया राहटीं । मग तेचि क्रिया पाठीं । समान ऐसी किरीटी । बोलिजे गा ॥ ३४० ॥ आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादि होय ॥ ३४१ ॥ एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा । वर्तनास्तव पालटा । येतसे जे ॥ ३४२ ॥ तें भेदली वृत्तिपंथें । वायुशक्ति गा एथें । कर्मकारण चौथें । ऐसें जाण ॥ ३४३ ॥ आणि ऋतु बरवा शारदु । शारदीं पुढती चांदु । चंद्री जैसा संबंधु । पूर्णिमेचा ॥ ३४४ ॥ कां वसंतीं बरवा आरामु । आरामींही प्रियसंगमु । संगमीं आगमु । उपचारांचा ॥ ३४५ ॥ नाना कमळीं पांडवा । विकासु जैसा बरवा । विकासींही यावा । परागाचा ॥ ३४६ ॥ वाचे बरवें कवित्व । कवित्वीं बरवें रसिकत्व । रसिकत्वीं परतत्व । स्पर्शु जैसा ॥ ३४७ ॥ तैसी सर्ववृत्तिवैभवीं । बुद्धिचि एकली बरवी । बुद्धिही बरव नवी । इंद्रियप्रौढी ॥ ३४८ ॥ इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकुचि निर्मळा । जैं अधिष्ठात्रियां कां मेळा । देवतांचा जो ॥ ३४९ ॥ म्हणौनि चक्षुरादिकीं दाहें । इंद्रियां पाठीं स्वानुग्रहें । सूर्यादिकां कां आहे । सुरांचें वृंद ॥ ३५० ॥ तें देववृंद बरवें । कर्मकारण पांचवें । अर्जुना एथ जाणावें । देवो म्हणे ॥ ३५१ ॥ एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांची हे खाणी । पंचविध आकर्णीं । निरूपिली ॥ ३५२ ॥ आतां हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टि घडे । जिहीं ते हेतुही उघडे । दाऊं पांचै ॥ ३५३ ॥
शरीरवाण्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः । न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ॥ १५॥
तरी अवसांत आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवीं । पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळातें ॥ ३५४ ॥ कां वार्षिये आणिजे मेघु । मेघें वृष्टिप्रसंगु । वृष्टीस्तव भोगु । सस्यसुखाचा ॥ ३५५ ॥ नातरी प्राची अरुणातें विये । अरुणें सूर्योदयो होये । सूर्यें सगळा पाहे । दिवो जैसा ॥ ३५६ ॥ तैसें मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा । तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा ॥ ३५७ ॥ मग वाचेचा तो दिवटा । दावी कृत्यजातांचिया वाटा । तेव्हां कर्ता रिगे कामठां । कर्तृत्वाच्या ॥ ३५८ ॥ तेथ शरीरादिक दळवाडें । शरीरादिकां हेतुचि घडे । लोहकाम लोखंडें । निर्वाळिजे जैसें ॥ ३५९ ॥ कां तांथुवाचा ताणा । तांथु घालितां वैरणा । तो तंतुचि विचक्षणा । होय पटु ॥ ३६० ॥ तैसें मनवाचादेहाचें । कर्म मनादि हेतुचि रचे । रत्नीं घडे रत्नाचें । दळवाडें जेवीं ॥ ३६१ ॥ एथ शरीरादिकें कारणें । तेंचि हेतु केवीं हें कोणें । अपेक्षिजे तरी तेणें । अवधारिजो ॥ ३६२ ॥ आइका सूर्याचिया प्रकाशा । हेतु कारण सूर्युचि जैसा । कां ऊंसाचें कांडें ऊंसा । वाढी हेतु ॥ ३६३ ॥ नाना वाग्देवता वानावी । तैं वाचाचि लागे कामवावी । कां वेदां वेदेंचि बोलावी । प्रतिष्ठा जेवीं ॥ ३६४ ॥ तैसें कर्मा शरीरादिकें । कारण हें कीर ठाउकें । परी हेंचि हेतु न चुके । हेंही एथ ॥ ३६५ ॥ आणि देहादिकीं कारणीं । देहादि हेतु मिळणीं । होय जया उभारणी । कर्मजातां ॥ ३६६ ॥ तें शास्त्रार्थेंं मानिलेया । मार्गा अनुसरे धनंजया । तरी न्याय तो न्याया । हेतु होय ॥ ३६७ ॥ जैसा पर्जन्योदकाचा लोटु । विपायें धरी साळीचा पाटु । तो जिरे परी अचाटु । उपयोगु आथी ॥ ३६८ ॥ कां रोषें निघालें अवचटें । पडिलें द्वारकेचिया वाटे । तें शिणे परी सुनाटें । न वचिती पदें ॥ ३६९ ॥ तैसें हेतुकारण मेळें । उठी कर्म जें आंधळें । तें शास्त्राचें लाहे डोळे । तैं न्याय म्हणिपे ॥ ३७० ॥ ना दूध वाढिता ठावो पावे । तंव उतोनि जाय स्वभावें । तोही वेंचु परी नव्हे । वेंचिलें तें ॥ ३७१ ॥ तैसें शास्त्रसाह्येंवीण । केलें नोहे जरी अकारण । तरी लागो कां नागवण । दानलेखीं ॥ ३७२ ॥ अगा बावन्ना वर्णांपरता । कोण मंत्रु आहे पंडुसुता । कां बावन्नही नुच्चारितां । जीवु आथी ? ॥ ३७३ ॥ परी मंत्राची कडसणी । जंव नेणिजे कोदंडपाणी । तंव उच्चारफळ वाणी । न पवे जेवीं ॥ ३७४ ॥ तेवीं कारणहेतुयोगें । जें बिसाट कर्म निगे । तें शास्त्राचिये न लगे । कांसे जंव ॥ ३७५ ॥ कर्म होतचि असे तेव्हांही । परी तें होणें नव्हे पाहीं । तो अन्यायो गा अन्यायीं । हेतु होय ॥ ३७६ ॥
तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः । पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ॥ १६॥
एवं पंचकारणा कर्मा । पांचही हेतु हे सुमहिमा । आतां एथें पाहें पां आत्मा । सांपडला असे ? ॥ ३७७ ॥ भानु न होनि रूपें जैसीं । चक्षुरूपातें प्रकाशी । आत्मा न होनि कर्में तैसीं । प्रकटित असे गा ॥ ३७८ ॥ पैं प्रतिबिंब आरिसा । दोन्ही न होनि वीरेशा । दोहींतें प्रकाशी जैसा । न्याहाळिता तो ॥ ३७९ ॥ कां अहोरात्र सविता । न होनि करी पंडुसुता । तैसा आत्मा कर्मकर्ता । न होनि दावी ॥ ३८० ॥ परी देहाहंमान भुली । जयाची बुद्धि देहींचि आतली । तया आत्मविषयीं जाली । मध्यरात्री गा ॥ ३८१ ॥ जेणें चैतन्या ईश्वरा ब्रह्मा । देहचि केलें परमसीमा । तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ॥ ३८२ ॥ आत्माचि कर्मकर्ता । हाही निश्चयो नाहीं तत्वतां । देहोचि मी कर्मकर्ता । मानितो साचे ॥ ३८३ ॥ जे आत्मा मी कर्मातीतु । सर्वकर्मसाक्षिभूतु । हे आपुली कहीं मातु । नायकेचि कानीं ॥ ३८४ ॥ म्हणौनि उमपा आत्मयातें । देहचिवरी मविजे एथें । विचित्र काई रात्रि दिवसातें । डुडुळ न करी ? ॥ ३८५ ॥ पैं जेणें आकाशींचा कहीं । सत्य सूर्यु देखिला नाहीं । तो थिल्लरींचें बिंब काई । मानू न लाहे ? ॥ ३८६ ॥ थिल्लराचेनि जालेपणें । सूर्यासि आणी होणें । त्याच्या नाशीं नाशणें । कंपें कंपू ॥ ३८७ ॥ आणि निद्रिस्ता चेवो नये । तंव स्वप्न साच हों लाहे । रज्जु नेणतां सापा बिहे । विस्मो कवण ? ॥ ३८८ ॥ जंव कवळ आथि डोळां । तंव चंद्रु देखावा कींं पिंवळा । काय मृगींहीं मृगजळा । भाळावें नाहीं ? ॥ ३८९ ॥ तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे । जो वाराही टेंकों नेदी सिवें । केवळ मौढ्याचेनिचि जीवें । जियाला जो ॥ ३९० ॥ तेणें देहात्मदृष्टीमुळें । आत्मया घापे देहाचें जाळें । जैसा अभ्राचा वेगु कोल्हें । चंद्रीं मानीं ॥ ३९१ ॥ मग तया मानणयासाठीं । देहबंदीशाळे किरीटी । कर्माच्या वज्रगांठी । कळासे तो ॥ ३९२ ॥ पाहे पां बद्ध भावना दृढा । नळियेवरी तो बापुडा । काय मोकळेयाही पायाचा चवडा । न ठकेचि पुंसा । ॥ ३९३ ॥ म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपीं । तो प्रकृतीचें केलें आरोपी । तो कल्पकोडीच्या मापीं । मवीचि कर्में ॥ ३९४ ॥ आता कर्मामाजीं असे । परी तयातें कर्म न स्पर्शे । वडवानळातें जैसें । समुद्रोदक ॥ ३९५ ॥ तैसेंनि वेगळेपणें । जयाचें कर्मीं असणें । तो कीर वोळखावा कवणें । तरी सांगो ॥ ३९६ ॥ जे मुक्तातें निर्धारितां । लाभे आपलीच मुक्तता । जैसी दीपें दिसें पाहतां । आपली वस्तु ॥ ३९७ ॥ नातरी दर्पणु जंव उटिजे । तंव आपणपयां आपण भेटिजे । कां तोय पावतां तोय होईजे । लवणें जेंवीं ॥ ३९८ ॥ हें असो परतोनि मागुतें । प्रतिबिंब पाहे बिंबातें । तंव पाहणें जाउनी आयितें । बिंबचि होय ॥ ३९९ ॥ तैसें हारपलें आपणपें पावे । तैं संतांतें पाहतां गिंवसावें । म्हणौनि वानावे ऐकावे । तेचि सदा ॥ ४०० ॥ परी कर्मीं असोनि कर्में । जो नावरे समेंविषमें । चर्मचक्षूंचेनि चामें । दृष्टि जैसी ॥ ४०१ ॥ तैसा सोडवला जो आहे । तयाचें रूप आतां पाहें । उपपत्तीची बाहे । उभऊनि सांगों ॥ ४०२ ॥
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते । हत्वाऽपि स इमा.ण्ल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥ १७॥
तरी अविद्येचिया निदा । विश्वस्वप्नाचा हा धांदा । भोगीत होता प्रबुद्धा । अनादि जो ॥ ४०३ ॥ तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपेचेनि थांवें । माथां हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा ॥ ४०४ ॥ तैसा विश्वस्वप्नेंसीं माया । नीद सांडूनि धनंजया । सहसा चेइला अद्वया\- । नंदपणें जो ॥ ४०५ ॥ तेव्हां मृगजळाचे पूर । दिसते एक निरंतर । हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे ॥ ४०६ ॥ कां बाळत्व निघोनि जाय । तैं बागुला नाहीं त्राय । पैं जळालिया इंधन न होय । इंधन जेवीं ॥ ४०७ ॥ नाना चेवो आलिया पाठीं । तैं स्वप्न न दिसे दिठी । तैसी अहं ममता किरीटी । नुरेचि तया ॥ ४०८ ॥ मग सूर्यु आंधारालागीं । रिघो कां भलते सुरंगीं । परी तो तयाच्या भागीं । नाहींचि जैसा ॥ ४०९ ॥ तैसा आत्मत्वें वेष्टिला होये । तो जया जया दृश्यातें पाहें । तें दृष्य द्रष्टेपणेंसीं होत जाये । तयाचेंचि रूप ॥ ४१० ॥ जैसा वन्हि जया लागे । तें वन्हिचि जालिया आंगें । दाह्यदाहकविभागें । सांडिजे तें ॥ ४११ ॥ तैसा कर्माकारा दुजेया । तो कर्तेपणाचा आत्मया । आळु आला तो गेलिया । कांहीं बाहीं जें उरे ॥ ४१२ ॥ तिये आत्मस्थितीचा जो रावो । मग तो देहीं इये जाणेल ठावो ? । काय प्रलयांबूचा उन्नाहो । वोघु मानी ? ॥ ४१३ ॥ तैसी ते पूर्ण अहंता । काई देहपणें पंडुसुता । आवरे काई सविता । बिंबें धरिला ? ॥ ४१४ ॥ पैं मथूनि लोणी घेपे । तें मागुती ताकीं घापे । तरी तें अलिप्तपणें सिंपे । तेणेंसी काई ? ॥ ४१५ ॥ नाना काष्ठौनि वीरेशा । वेगळा केलिया हुताशा । राहे काष्ठाचिया मांदुसा । कोंडलेपणें ? ॥ ४१६ ॥ कां रात्रीचिया उदराआंतु । निघाला जो हा भास्वतु । तो रात्री ऐसी मातु । ऐके कायी ? ॥ ४१७ ॥ तैसें वेद्य वेदकपणेंसी । पडिलें कां जयाचे ग्रासीं । तया देह मी ऐसी । अहंता कैंची ? ॥ ४१८ ॥ आणि आकाशें जेथें जेथुनी । जाइजे तेथ असे भरोनी । म्हणौनि ठेलें कोंदोनी । आपेंआप ॥ ४१९ ॥ तैसें जें तेणें करावें । तो तेंचि आहे स्वभावें । मा कोणें कर्मीं वेष्टावें । कर्तेपणें ? ॥ ४२० ॥ नुरेचि गगनावीण ठावो । नोहेचि समुद्रा प्रवाहो । नुठीचि ध्रुवा जावों । तैसें जाहालें ॥ ४२१ ॥ ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधीं जाहला वावो । तऱ्ही देहा जंव निर्वाहो । तंव आथी कर्में ॥ ४२२ ॥ वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखीं उरे । कां सेंदें द्रुति राहे कापुरें । वेंचलेनी ॥ ४२३ ॥ कां सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । भूमी लोळोनि गेलिया अंबु । वोल थारे ॥ ४२४ ॥ अगा मावळलेनि अर्कें । संध्येचिये भूमिके । ज्योतिदीप्ति कौतुकें । दिसे जैसी ॥ ४२५ ॥ पैं लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धांवेचि तंववरी । जंव भरली आथी उरी । बळाची ते ॥ ४२६ ॥ नाना चक्रीं भांडें जालें । तें कुलालें परतें नेलें । परी भ्रमेंचि तें मागिले । भोवंडिलेपणें ॥ ४२७ ॥ तैसा देहाभिमानु गेलिया । देह जेणें स्वभावें धनंजया । जालें तें अपैसया । चेष्टवीच तें ॥ ४२८ ॥ संकल्पेंवीण स्वप्न । न लावितां दांगीचें बन । न रचितां गंधर्वभुवन । उठी जैसें ॥ ४२९ ॥ आत्मयाचेनि उद्यमेंवीण । तैसें देहादिपंचकारण । होय आपणयां आपण । क्रियाजात ॥ ४३० ॥ पैं प्राचीनसंस्कारवशें । पांचही कारणें सहेतुकें । कामवीजती गा अनेकें । कर्माकारें ॥ ४३१ ॥ तया कर्मामाजीं मग । संहरो आघवें जग । अथवा नवें चांग । अनुकरो ॥ ४३२ ॥ परी कुमुद कैसेनि सुके । कैसें तें कमळ फांके । हीं दोन्ही रवी न देखे । जयापरी ॥ ४३३ ॥ कां वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ । अथवा करूं शाड्वळ । प्रसन्नावृष्टी ॥ ४३४ ॥ तरी तया दोहींतें जैसें । नेणिजेचि कां आकाशें । तैसा देहींच जो असे । विदेहदृष्टी ॥ ४३५ ॥ तो देहादिकीं चेष्टीं । घडतां मोडतां हे सृष्टी । न देखे स्वप्न दृष्टी । चेइला जैसा ॥ ४३६ ॥ येऱ्हवीं चामाचे डोळेवरी । जे देखती देहचिवरी । ते कीर तो व्यापारी । ऐसेंचि मानिती ॥ ४३७ ॥ कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरें ठेविला । तो साचचि राखता कोल्हा । मानिजे ना ? ॥ ४३८ ॥ पिसेंं नेसलें कां नागवें । हें लोकीं येऊनि जाणावें । ठाणोरियांचें मवावें । आणिकीं घाय ॥ ४३९ ॥ कां महासतीचे भोग । देखे कीर सकळ जग । परी ते आगी ना आंग । ना लोकु देखे ॥ ४४० ॥ तैसा स्वस्वरूपें उठिला । जो दृश्येंसी द्रष्टा आटला । तो नेणें काय राहटला । इंद्रियग्रामु ॥ ४४१ ॥ अगा थोरीं कल्लोळीं कल्लोळ साने । लोपतां तिरींचेनि जनें । एकीं एक गिळिलें हें मनें । मानिजे जऱ्ही ॥ ४४२ ॥ तऱ्ही उदकाप्रति पाहीं । कोण ग्रसितसे काई । तैसें पूर्णा दुजें नाहीं । जें तो मारी ॥ ४४३ ॥ सुवर्णाचिया चंडिका । सुवर्णशूळेंचि देखा । सुवर्णाचिया महिखा । नाशु केला ॥ ४४४ ॥ तो देवलवसिया कडा । व्यवहारु गमला फुडा । वांचूनि शूळ महिष चामुंडा । सुवर्णचि तें ॥ ४४५ ॥ पैं चित्रींचें जळ हुतांशु । तो दृष्टीचाचि आभासु । पटीं आगी वोलांशु । दोन्ही नाहीं ॥ ४४६ ॥ मुक्ताचें देह तैसें । हालत संस्कारवशें । तें देखोनि लोक पिसे । कर्ता म्हणती ॥ ४४७ ॥ आणि तयां करणेया आंतु । घडो तिहीं लोकां घातु । परी तेणें केला हे मातु । बोलों नये ॥ ४४८ ॥ अगा अंधारुचि देखावा तेजें । मग तो फेडी हें बोलिजे । तैसें ज्ञानिया नाहीं दुजें । जें तो मारी । ॥ ४४९ ॥ म्हणौनि तयाचि बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी । गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा ॥ ४५० ॥ आगीसी आगी झगटलिया । काय पोळे धनंजया । कीं शस्त्र रुपे आपणया । आपणचि ॥ ४५१ ॥ तैसें आपणपयापरतें । जो नेणें क्रियाजातातें । तेथ काय लिंपवी बुद्धीतें । तयाचिये ॥ ४५२ ॥ म्हणौनि कार्य कर्ता क्रिया । हें स्वरूपचि जाहलें जया । नाहीं शरीरादिकीं तया । कर्मी बंधु ॥ ४५३ ॥ जे कर्ता जीव विंदाणीं । काढूनि पांचही खाणी । घडित आहे करणीं । आउतीं दाहें ॥ ४५४ ॥ तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभविता न लवी खेंवो । कर्मभुवनें ॥ ४५५ ॥ या थोराडा कीर कामा । विरजा नोहे आत्मा । परी म्हणसी हन उपक्रमा । हातु लावी ॥ ४५६ ॥ तो साक्षी चिद्रूपु । कर्मप्रवृत्तीचा संकल्पु । उठी तो कां निरोपु । आपणचि दे ? ॥ ४५७ ॥ तरी कर्मप्रवृत्तीहीलागीं । तया आयासु नाहीं आंगीं । जे प्रवृत्तीचेही उळिगीं । लोकुचि आथी ॥ ४५८ ॥ म्हणौनि आत्मयाचें केवळ । जो रूपचि जाहला निखिळ । तया नाहीं बंदिशाळ । कर्माचि हे ॥ ४५९ ॥ परी अज्ञानाच्या पटीं । अन्यथा ज्ञानाचें चित्र उठी । तेथ चितारणी हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे कां ॥ ४६० ॥
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना । करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ॥ १८॥
जें ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हें जगाचें बीज त्रय । ते कर्माची निःसंदेह । प्रवृत्ति जाण ॥ ४६१ ॥ आतां ययाचि गा त्रया । व्यक्ति वेगळालिया । आइकें धनंजया । करूं रूप ॥ ४६२ ॥ तरी जीवसूर्यबिंबाचे । रश्मी श्रोत्रादिकें पांचें । धांवोनि विषयपद्माचे । फोडिती मढ ॥ ४६३ ॥ कीं जीवनृपाचे वारु उपलाणें । घेऊनि इंद्रियांचीं केकाणें । विषयदेशींचें नागवणें । आणीत जे ॥ ४६४ ॥ हें असो इहीं इंद्रियीं राहाटे । जें सुखदुःखेंसीं जीवा भेटे । तें सुषुप्तिकालीं वोहटे । जेथ ज्ञान ॥ ४६५ ॥ तया जीवा नांव ज्ञाता । आणि जें हें सांगितलें आतां । तेंचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण ॥ ४६६ ॥ जें अविद्येचिये पोटीं । उपजतखेंवो किरीटी । आपणयातें वांटी । तिहीं ठायीं ॥ ४६७ ॥ आपुलिये धांवे पुढां । घालूनि ज्ञेयाचा गुंडा । उभारी मागिलीकडां । ज्ञातृत्वातें ॥ ४६८ ॥ मग ज्ञातया ज्ञेया दोघां । तो नांदणुकेचा बगा । माजीं जालेनि पैं गा । वाहे जेणें ॥ ४६९ ॥ ठाकूनि ज्ञेयाची शिंव । पुरे जयाची धांव । सकळ पदार्थां नांव । सूतसे जें ॥ ४७० ॥ तें गा सामान्य ज्ञान । या बोअला नाहीं आन । ज्ञेयाचेंही चिन्ह । आइक आतां ॥ ४७१ ॥ तरी शब्दु स्पर्शु । रूप गंध रसु । हा पंचविध आभासु । ज्ञेयाचा तो ॥ ४७२ ॥ जैसें एकेचि चूतफळें । इंद्रियां वेगवेगळे । रसें वर्णें परीमळें । भेटिजे स्पर्शें ॥ ४७३ ॥ तैसें ज्ञेय तरी एकसरें । परी ज्ञान इंद्रियद्वारें । घे म्हणौनि प्रकारें । पांचें जालें ॥ ४७४ ॥ आणि समुद्रीं वोघाचें जाणें । सरे लाणीपासीं धावणें । कां फळीं सरे वाढणें । सस्याचें जेवीं ॥ ४७५ ॥ तैसें इंद्रियांच्या वाहवटीं । धांवतया ज्ञाना जेथ ठी । होय तें गा किरीटी । विषय ज्ञेय ॥ ४७६ ॥ एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिहीं रूप केलें धनंजया । हे त्रिविध सर्व क्रिया\- । प्रवृत्ति जाण ॥ ४७७ ॥ जे शब्दादि विषय । हें पंचविध जें ज्ञेय । तेंचि प्रिय कां अप्रिय । एकेपरीचें ॥ ४७८ ॥ ज्ञान मोटकें ज्ञातया । दावी ना जंव धनंजया । तंव स्वीकारा कीं त्यजावया । प्रवर्तेचि तो ॥ ४७९ ॥ परी मीनातें देखोनि बकु । जैसा निधानातें रंकु । कां स्त्री देखोनि कामुकु । प्रवृत्ति धरी ॥ ४८० ॥ जैसें खालारां धांवे पाणी । भ्रमर पुष्पाचिये घाणीं । नाना सुटला सांजवणीं । वत्सुचि पां ॥ ४८१ ॥ अगा स्वर्गींची उर्वशी । ऐकोनि जेंवी माणुसीं । वराता लावीजती आकाशीं । यागांचिया ॥ ४८२ ॥ पैं पारिवा जैसा किरीटी । चढला नभाचिये पोटीं । पारवी देखोनि लोटी । आंगचि सगळें ॥ ४८३ ॥ हें ना घनगर्जनासरिसा । मयूर वोवांडे आकाशा । ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा । धांवचि घे ॥ ४८४ ॥ म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता । होयचि कर्मा समस्तां । प्रवृत्ति येथ ॥ ४८५ ॥ परी तेंचि ज्ञेय विपायें । जरी ज्ञातयातें प्रिय होये । तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु ॥ ४८६ ॥ नातरी अवचटें । तेंचि विरुद्ध होऊनि भेटे । तरी युगांत वाटे । सांडावया ॥ ४८७ ॥ व्याळा कां हारा । वरपडा जालेया नरा । हरिखु आणि दरारा । सरिसाचि उठी ॥ ४८८ ॥ तैसें ज्ञेय प्रियाप्रियें । देखिलेनि ज्ञातया होये । मग त्याग स्वीकारीं वाहे । व्यापारातें ॥ ४८९ ॥ तेथ रागी प्रतिमल्लाचा । गोसांवी सर्वदळाचा । रथु सांडूनि पायांचा । होय जैसा ॥ ४९० ॥ तैसें ज्ञातेपणें जें असे । तें ये कर्ता ऐसिये दशे । जेवितें बैसलें जैसें । रंधन करूं ॥ ४९१ ॥ कां भंवरेंचि केला मळा । वरकलुचि जाला अंकसाळा । नाना देवो रिगाला देऊळा\- । चिया कामा ॥ ४९२ ॥ तैसा ज्ञेयाचिया हांवा । ज्ञाता इंद्रियांचा मेळावा । राहाटवी तेथ पांडवा । कर्ता होय ॥ ४९३ ॥ आणि आपण हौनी कर्ता । ज्ञाना आणी करणता । तेथें ज्ञेयचि स्वभावतां । कार्य होय ॥ ४९४ ॥ ऐसा ज्ञानाचिये निजगति । पालटु पडे गा सुमति । डोळ्याची शोभा रातीं । पालटे जैसी ॥ ४९५ ॥ कां अदृष्ट जालिया उदासु । पालटे श्रीमंताचा विलासु । पुनिवेपाठीं शीतांशु । पालटे जैसा ॥ ४९६ ॥ तैसा चाळितां करणें । ज्ञाता वेष्टिजे कर्तेपणें । तेथींचीं तियें लक्षणें । ऐक आतां ॥ ४९७ ॥ तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन । हें चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचें ॥ ४९८ ॥ बाह्य त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । हें पंचविध जाण । इंद्रियें गा ॥ ४९९ ॥ तेथ आंतुले तंव करणें । कर्ता कर्तव्या घे उमाणें । मग तैं जरी जाणें । सुखा येतें ॥ ५०० ॥ तरी बाहेरीलें तियेंही । चक्षुरादिकें दाहाही । उठौनि लवलाहीं । व्यापारा सूये ॥ ५०१ ॥ मग तो इंद्रियकदंंबु । करविजे तंव राबु । जंव कर्तव्याचा लाभु । हातासि ये ॥ ५०२ ॥ ना तें कर्तव्य जरी दुःखें । फळेल ऐसें देखे । तो लावी त्यागमुखें । तियें दाहाही ॥ ५०३ ॥ मग फिटे दुःखाचा ठावो । तंव राहाटवी रात्रिदिवो । विकणवातें कां रावो । जयापरी ॥ ५०४ ॥ तैसेनि त्याग स्वीकारीं । वाहातां इंद्रियांची धुरी । ज्ञातयातें अवधारीं । कर्ता म्हणिपे ॥ ५०५ ॥ आणि कर्तयाच्या सर्व कर्मीं । आउतांचिया परी क्षमी । म्हणौनि इंद्रियांतें आम्ही । करणें म्हणों ॥ ५०६ ॥ आणि हेचि करणेंवरी । कर्ता क्रिया ज्या उभारी । तिया व्यापे तें अवधारीं । कर्म एथ ॥ ५०७ ॥ सोनाराचिया बुद्धि लेणें । व्यापे चंद्रकरीं चांदणें । कां व्यापे वेल्हाळपणें । वेली जैसी ॥ ५०८ ॥ नाना प्रभा व्यापे प्रकाशु । गोडिया इक्षुरसु । हें असो अवकाशु । आकाशीं जैसा ॥ ५०९ ॥ तैसें कर्तयाचिया क्रिया । व्यापलें जें धनंजया । तें कर्म गा बोलावया । आन नाहीं ॥ ५१० ॥ एवं कर्म कर्ता करण । या तिहींचेंही लक्षण । सांगितलें तुज विचक्षण\- । शिरोमणी ॥ ५११ ॥ एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हें कर्माचें प्रवृत्तित्रय । तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ॥ ५१२ ॥ वन्हीं ठेविला असे धूमु । आथी बीजीं जेवीं द्रुमु । कां मनीं जोडे कामु । सदा जैसा ॥ ५१३ ॥ तैसा कर्ता क्रिया करणीं । कर्माचें आहे जिंतवणीं । सोनें जैसें खाणी । सुवर्णाचिये ॥ ५१४ ॥ म्हणौनि हें कार्य मी कर्ता । ऐसें आथि जेथ पंडुसुता । तेथ आत्मा दूरी समस्ता । क्रियांपासीं ॥ ५१५ ॥ यालागीं पुढतपुढती । आत्मा वेगळाचि सुमती । आतां असो हे किती । जाणतासि तूं ॥ ५१६ ॥
ज्ञानं कर्म च कर्ताच त्रिधैव गुणभेदतः । प्रोच्यते गुणसण्ख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥ १९॥
परी सांगितलें जें ज्ञान । कर्म कर्ता हन । ते तिन्ही तिहीं ठायीं भिन्न । गुणीं आहाती ॥ ५१७ ॥ म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया । पातेजों नये धनंजया । जे दोनी बांधती सोडावया । एकचि प्रौढ ॥ ५१८ ॥ तें सात्विक ठाऊवें होये । तो गुणभेदु सांगों पाहे । जो सांख्यशास्त्रीं आहे । उवाइला ॥ ५१९ ॥ जें विचारक्षीरसमुद्र । स्वबोधकुमुदिनीचंद्र । ज्ञानडोळसां नरेंद्र । शास्त्रांचा जें ॥ ५२० ॥ कीं प्रकृतिपुरुष दोनी । मिसळलीं दिवोरजनीं । तियें निवडितां त्रिभुवनीं । मार्तंडु जें ॥ ५२१ ॥ जेथ अपारा मोहराशी । तत्वाच्या मापीं चोविसीं । उगाणा घेऊनि परेशीं । सुरवाडिजे ॥ ५२२ ॥ अर्जुना तें सांख्यशास्त्र । पढे जयाचें स्तोत्र । तें गुणभेदचरित्र । ऐसें आहे ॥ ५२३ ॥ जे आपुलेनि आंगिकें । त्रिविधपणाचेनि अंकें । दृश्यजात तितुकें । अंकित केलें ॥ ५२४ ॥ एवं सत्वरजतमा । तिहींची एवढी असे महिमा । जें त्रैविध्य आदी ब्रह्मा । अंतीं कृमी ॥ ५२५ ॥ परी विश्वींची आघवी मांदी । जेणें भेदलेनि गुणभेदीं । पडिली तें तंव आदी । ज्ञान सांगो ॥ ५२६ ॥ जे दिठी जरी चोख कीजे । तरी भलतेंही चोख सुजे । तैसें ज्ञानें शुद्धें लाहिजे । सर्वही शुद्ध ॥ ५२७ ॥ म्हणौनि तें सात्विक ज्ञान । आतां सांगों दे अवधान । कैवल्यगुणनिधान । श्रीकृष्ण म्हणे ॥ ५२८ ॥
सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते । अविभक्तं विभक्तेषु तज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥ २०॥
तरी अर्जुना गा तें फुडें । सात्विक ज्ञान चोखडें । जयाच्या उदयीं ज्ञेय बुडे । ज्ञातेनिसीं ॥ ५२९ ॥ जैसा सूर्य न देखे अंधारें । सरिता नेणिजती सागरें । कां कवळिलिया न धरे । आत्मछाया ॥ ५३० ॥ तयापरी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना । इया भूतव्यक्ति भिन्ना । नाडळती ॥ ५३१ ॥ जैसें हातें चित्र पाहातां । होय पाणियें मीठ धुतां । कां चेवोनि स्वप्ना येतां । जैसें होय ॥ ५३२ ॥ तैसें ज्ञानें जेणें । करितां ज्ञातव्यातें पाहाणें । जाणता ना जाणणें । जाणावें उरे ॥ ५३३ ॥ पैं सोनें आटूनि लेणीं । न काढिती आपुलिया आयणी । कां तरंग न घेपती पाणी । गाळूनि जैसें ॥ ५३४ ॥ तैसी जया ज्ञानाचिया हाता । न लगेचि दृश्यपथा । तें ज्ञान जाण सर्वथा । सात्विक गा ॥ ५३५ ॥ आरिसा पाहों जातां कोडें । जैसें पाहातेंचि कां रिगे पुढें । तैसें ज्ञेय लोटोनि पडे । ज्ञाताचि जें ॥ ५३६ ॥ पुढती तेंचि सात्विक ज्ञान । जें मोक्षलक्ष्मीचें भुवन । हें असो ऐक चिन्ह । राजसाचें ॥ ५३७ ॥
पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् । वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ञानं विद्धि राजसम् ॥ २१॥
तरी पार्था परीयेस । तें ज्ञान गा राजस । जें भेदाची कांस । धरूनि चाले ॥ ५३८ ॥ विचित्रता भूतांचिया । आपण आंतोनि ठिकरिया । बहु चकै ज्ञातया । आणिली जेणें ॥ ५३९ ॥ जैसें साचा रूपाआड । घालूनि विसराचें कवाड । मग स्वप्नाचें काबाड । ओपी निद्रा ॥ ५४० ॥ तैसें स्वज्ञानाचिये पौळी । बाहेरि मिथ्या महीं खळीं । तिहीं अवस्थांचिया वह्याळी । दावी जें जीवा ॥ ५४१ ॥ अलंकारपणें झांकलें । बाळा सोनें कां वायां गेलें । तैसें नामीं रूपीं दुरावलें । अद्वैत जया ॥ ५४२ ॥ अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां । वन्हि जाला कानडा । दीपत्वासाठीं ॥ ५४३ ॥ कां वस्त्रपणाचेनि आरोपें । मूर्खाप्रति तंतु हारपे । नाना मुग्धा पटु लोपे । दाऊनि चित्र ॥ ५४४ ॥ तैशी जया ज्ञाना । जाणोनि भूतव्यक्ती भिन्ना । ऐक्यबोधाची भावना । निमोनि गेली ॥ ५४५ ॥ मग इंधनीं भेदला अनळु । फुलांवरी परीमळु । कां जळभेदें शकलु । चंद्रु जैसा ॥ ५४६ ॥ तैसें पदार्थभेद बहुवस । जाणोनि लहानथोर वेष । आंतलें तें राजस । ज्ञान येथ ॥ ५४७ ॥ आतां तामसाचेंही लिंग । सांगेन तें वोळख चांग । डावलावया मातंग\- । सदन जैसें ॥ ५४८ ॥
यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम् । अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ॥ २२॥
तरी किरीटी जें ज्ञान । हिंडे विधीचेनि वस्त्रेंहीन । श्रुति पाठमोरी नग्न । म्हणौनि तया ॥ ५४९ ॥ येरींही शास्त्र बटिकरीं । जें निंदेचे विटाळवरी । बोळविलेंसे डोंगरीं । म्लेंच्छधर्माच्या ॥ ५५० ॥ जें गा ज्ञान ऐसें । गुणग्रहें तामसें । घेतलें भवें पिसें । होऊनियां ॥ ५५१ ॥ जें सोयरिकें बाधु नेणें । पदार्थीं निषेधु न म्हणे । निरोविलें जैसें सुणें । शून्यग्रामीं ॥ ५५२ ॥ तया तोंडीं जें नाडळे । कां खातां जेणें पोळे । तेंचि येक वाळे । येर घेणेचि ॥ ५५३ ॥ पैं सोनें चोरितां उंदिरु । न म्हणे थरुविथरु । नेणे मांसखाइरु । काळें गोरें ॥ ५५४ ॥ नाना वनामाजीं बोहरी । कडसणी जेवीं न करी । कां जीत मेलें न विचारी । बैसतां माशी ॥ ५५५ ॥ अगा वांता कां वाढिलेया । साजुक कां सडलिया । विवेकु कावळिया । नाहीं जैसा ॥ ५५६ ॥ तैसें निषिद्ध सांडूनि द्यावें । कां विहित आदरें घ्यावें । हें विषयांचेनि नांवें । नेणेंचि जें ॥ ५५७ ॥ जेतुलें आड पडे दिठी । तेतुलें घेचि विषयासाठीं । मग तें स्त्री\-द्रव्य वाटी । शिश्नोदरां ॥ ५५८ ॥ तीर्थातीर्थ हे भाख । उदकीं नाहीं सनोळख । तृषा वोळे तेंचि सुख । वांचूनियां ॥ ५५९ ॥ तयाचिपरी खाद्याखाद्य । न म्हणे निंद्यानिंद्य । तोंडा आवडे तें मेध्य । ऐसाचि बोधु ॥ ५६० ॥ आणि स्त्रीजात तितुकें । त्वचेंद्रियेंचि वोळखे । तियेविषयीं सोयरिकें । एकचि बोधु ॥ ५६१ ॥ पैं स्वार्थीं जें उपकरे । तयाचि नाम सोयिरें । देहसंबंधु न सरे । जिये ज्ञानीं ॥ ५६२ ॥ मृत्यूचें आघवेंचि अन्न । आघवेंचि आगी इंधन । तैसें जगचि आपलें धन । तामसज्ञाना ॥ ५६३ ॥ ऐसेनि विश्व सकळ । जेणें विषयोचि मानिलें केवळ । तया एक जाण फळ । देहभरण ॥ ५६४ ॥ आकाशपतिता नीरा । जैसा सिंधुचि येक थारा । तैसें कृत्यजात उदरा\- । लागिंचि बुझे ॥ ५६५ ॥ वांचूनि स्वर्गु नरकु आथी । तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती । इये आघवियेचि राती । जाणिवेची जें ॥ ५६६ ॥ जें देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाणप्रतिमा । ययापरौती प्रमा । ढळों नेणें ॥ ५६७ ॥ म्हणे पडिलेनि शरीरें । केलेनिसीं आत्मा सरे । मा भोगावया उरे । कोण वेषें । ॥ ५६८ ॥ ना ईश्वरु पाहातां आहे । तो भोगवी हें जरी होये । तरी देवचि खाये । विकूनियां ॥ ५६९ ॥ गांवींचें देवळेश्वर । नियामकचि होती साचार । तरी देशींचे डोंगर । उगे कां असती ? ॥ ५७० ॥ ऐसा विपायें देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे । आणि आत्मा तंव म्हणिजे । देहातेंचि ॥ ५७१ ॥ येरें पापपुण्यादिकें । तें आघवेंचि करोनि लटिकें । हित मानी अग्निमुखे । चरणें जें कां ॥ ५७२ ॥ जें चामाचे डोळे दाविती । जें इंद्रियें गोडी लाविती । तेंचि साच हे प्रतीती । फुडी जया ॥ ५७३ ॥ किंबहुना ऐसी प्रथा । वाढती देखसी पार्था । धूमाची वेली वृथा । आकाशीं जैसी ॥ ५७४ ॥ कोरडा ना वोला । उपेगा आथी गेला । तो वाढोनि मोडला । भेंडु जैसा ॥ ५७५ ॥ नाना उंसांचीं कणसें । कां नपुंसकें माणुसें । वन लागलें जैसें । साबरीचें ॥ ५७६ ॥ नातरी बाळकाचें मन । कां चोराघरींचें धन । अथवा गळास्तन । शेळियेचे ॥ ५७७ ॥ तैसें जें वायाणें । वोसाळ दिसे जाणणें । तयातें मी म्हणें । तामस ज्ञान ॥ ५७८ ॥ तेंही ज्ञान इया भाषा । बोलिजे तो भावो ऐसा । जात्यंधाचा कां जैसा । डोळा वाडु ॥ ५७९ ॥ कां बधिराचे नीट कान । अपेया नाम पान । तैसें आडनांव ज्ञान । तामसा तया ॥ ५८० ॥ हें असो किती बोलावें । तरी ऐसें जें देखावें । तें ज्ञान नोहे जाणावें । डोळस तम ॥ ५८१ ॥ एवं तिहीं गुणीं । भेदलें यथालक्षणीं । ज्ञान श्रोतेशिरोमणी । दाविलें तुज ॥ ५८२ ॥ आतां याचि त्रिप्रकारा । ज्ञानाचेनि धनुर्धरा । प्रकाशें होती गोचरा । कर्तयांच्या क्रिया ॥ ५८३ ॥ म्हणौनि कर्म पैं गा । अनुसरे तिहीं भागां । मोहरे जालिया वोघा । तोय जैसे ॥ ५८४ ॥ तेंचि ज्ञानत्रयवशें । त्रिविध कर्म जें असे । तेथ सात्विक तंव ऐसें । परीसे आधीं ॥ ५८५ ॥
नियतं सण्गरहितमरागद्वेषतः कृतम् । अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥ २३॥
तरी स्वाधिकाराचेनि मार्गेंं । आलें जें मानिलें आंगें । पतिव्रतेचेनि परीष्वंगें । प्रियातें जैसें ॥ ५८६ ॥ सांवळ्या आंगा चंदन । प्रमदालोचनीं अंजन । तैसें अधिकारासी मंडण । नित्यपणें जें ॥ ५८७ ॥ तें नित्य कर्म भलें । होय नैमित्तिकीं सावाइलें । सोनयासि जोडलें । सौरभ्य जैसें ॥ ५८८ ॥ आणि आंगा जीवाची संपत्ती । वेंचूनि बाळाची करी पाळती । परी जीवें उबगणें हें स्थिती । न पाहे माय ॥ ५८९ ॥ तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परी फळ न सूये दिठी । उखिती क्रिया पैठी । ब्रह्मींचि करी ॥ ५९० ॥ आणि प्रिय आलिया स्वभावें । शंबळ उरे वेंचे ठाउवें । नव्हे तैसें सत्प्रसंगें करावें । पारुषे जरी ॥ ५९१ ॥ तरी अकरणाचेनि खेदें । द्वेषातें जीवीं न बांधे । जालियाचेनि आनंदें । फुंजों नेणें ॥ ५९२ ॥ ऐस{ऐ}सिया हातवटिया । कर्म निफजे जें धनंजया । जाण सात्विक हें तया । गुणनाम गा ॥ ५९३ ॥ ययावरी राजसाचें । लक्षण सांगिजेल साचें । न करीं अवधानाचें । वाणेंपण ॥ ५९४ ॥
यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः । क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ॥ २४॥
तरी घरीं मातापितरां । धड बोली नाहीं संसारा । येर विश्व भरी आदरा । मूर्खु जैसा ॥ ५९५ ॥ का तुळशीचिया झाडा । दुरूनि न घापें सिंतोडा । द्राक्षीचिया तरी बुडा । दूधचि लाविजे ॥ ५९६ ॥ तैसी नित्यनैमित्तिकें । कर्में जियें आवश्यकें । तयांचेविषयीं न शके । बैसला उठूं ॥ ५९७ ॥ येरां काम्याचेनि तरी नांवें । देह सर्वस्व आघवें । वेचितांही न मनवे । बहु ऐसें ॥ ५९८ ॥ अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देतां न धाइजे । पेरितां पुरें न म्हणिजे । बीज जेवीं ॥ ५९९ ॥ कां परीसु आलिया हातीं । लोहालागीं सर्वसंपत्ती । वेचितां ये उन्नती । साधकु जैसा ॥ ६०० ॥ तैसीं फळें देखोनि पुढें । काम्यकर्में दुवाडें । करी परी तें थोकडें । केलेंही मानी ॥ ६०१ ॥ तेणें फळकामुकें । यथाविधी नेटकें । काम्य कीजे तितुकें । क्रियाजात ॥ ६०२ ॥ आणि तयाही केलियाचें । तोंडीं लावी दौंडीचें । कर्मी या नांवपाटाचें । वाणें सारी ॥ ६०३ ॥ तैसा भरे कर्माहंकारु । मग पिता अथवा गुरु । ते न मनी काळज्वरु । औषध जैसें ॥ ६०४ ॥ तैसेनि साहंकारें । फळाभिलाषियें नरें । कीजे गा आदरें । जें जें कांहीं ॥ ६०५ ॥ परी तेंही करणें बहुवसा । वळघोनि करी सायासा । जीवनोपावो कां जैसा । कोल्हाटियांचा ॥ ६०६ ॥ एका कणालागीं.ण् उंदिरु । आसका उपसे डोंगरु । कां शेवाळोद्देशें दर्दुरु । समुद्रु डहुळी ॥ ६०७ ॥ पैं भिकेपरतें न लाहे । तऱ्ही गारुडी सापु वाहे । काय कीजे शीणुचि होये । गोडु येकां ॥ ६०८ ॥ हे असो परमाणूचेनि लाभें । पाताळ लंघिती वोळंबे । तैसें स्वर्गसुखलोभें । विचंबणें जें ॥ ६०९ ॥ तें काम्य कर्म सक्लेश । जाणावें येथ राजस । आतां चिन्ह परिस । तामसाचें ॥ ६१० ॥
अनुबन्धं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम् । मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥ २५॥
तरी तें गा तामस कर्म । जें निंदेचें काळें धाम । निषेधाचें जन्म । सांच जेणें ॥ ६११ ॥ जें निपजविल्यापाठींं । कांहींच न दिसे दिठी । रेघ काढलिया पोटीं । तोयाचे जेवीं ॥ ६१२ ॥ कां कांजी घुसळलिया । कां राखोंडी फुंकलिया । कांहीं न दिसे गाळिलिया । वाळुघाणा ॥ ६१३ ॥ नाना उपणिलिया भूंस । कां विंधिलिया आकाश । नाना मांडिलिया पाश । वारयासी ॥ ६१४ ॥ हें आवघेंचि जैसें । वांझें होऊनि नासे । जें केलिया पाठीं तैसें । वायांचि जाय ॥ ६१५ ॥ येऱ्हवीं नरदेहाही येवढें । धन आटणीये पडे । जें कर्म निफजवितां मोडे । जगाचें सुख ॥ ६१६ ॥ जैसा कमळवनीं फांसु । काढिलिया कांटसु । आपण झिजे नाशु । कमळां करी ॥ ६१७ ॥ कां आपण आंगें जळे । आणि नागवी जगाचे डोळे । पतंगु जैसा सळें । दीपाचेनि ॥ ६१८ ॥ तैसें सर्वस्व वायां जावो । वरी देहाही होय घावो । परी पुढिलां अपावो । निफजविजे जेणें ॥ ६१९ ॥ माशी आपणयातें गिळवी । परी पुढीला वांती शिणवी । तें कश्मळ आठवी । आचरण जें ॥ ६२० ॥ तेंही करावयो दोषें । मज सामर्थ्य असे कीं नसे । हेंहीं पुढील तैसें । न पाहतां करी ॥ ६२१ ॥ केवढा माझा उपावो । करितां कोण प्रस्तावो । केलियाही आवो । काय येथ ॥ ६२२ ॥ इये जाणिवेची सोये । अविवेकाचेनि पायें । पुसोनियां होये । साटोप कर्मीं ॥ ६२३ ॥ आपला वसौटा जाळुनी । बिसाटे जैसा वन्ही । कां स्वमर्यादा गिळोनि । सिंधु उठी ॥ ६२४ ॥ मग नेणें बहु थोडें । न पाहे मागें पुढें । मार्गामार्ग येकवढें । करीत चाले ॥ ६२५ ॥ तैसें कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित । कर्म होय तें निश्चित । तामस जाण ॥ ६२६ ॥ ऐसी गुणत्रयभिन्ना । कर्माची गा अर्जुना । हे केली विवंचना । उपपत्तींसीं ॥ ६२७ ॥ आतां ययाचि कर्मा भजतां । कर्माभिमानिया कर्ता । तो जीवुही त्रिविधता । पातला असे ॥ ६२८ ॥ चतुराश्रमवशें । एकु पुरुषु चतुर्धा दिसे । कर्तया त्रैविध्य तैसें । कर्मभेदें ॥ ६२९ ॥ तरी तयां तिहीं आंतु । सात्विक तंव प्रस्तुतु । सांगेन दत्तचित्तु । आकर्णीं तूं ॥ ६३० ॥
मुक्तसण्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः । सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥ २६॥
तरी फळोद्देशें सांडिलिया । वाढती जेवीं सरळिया । शाखा कां चंदनाचिया । बावन्नया ॥ ६३१ ॥ कां न फळतांही सार्थका । जैसिया नागलतिका । तैसिया करी नित्यादिकां । क्रिया जो कां ॥ ६३२ ॥ परी फळशून्यता । नाहीं तया विफळता । पैं फळासीचि पंडुसुता । फळें कायिसी । ॥ ६३३ ॥ आणि आदरें करी बहुवसें । परी कर्ता मी हें नुमसे । वर्षाकाळींचें जैसें । मेघवृंद ॥ ६३४ ॥ तेवींचि परमात्मलिंगा । समर्पावयाजोगा । कर्मकलापु पैं गा । निपजावया ॥ ६३५ ॥ तया काळातें नुलंघणें । देशशुद्धिही साधणें । कां शास्त्रांच्या वातीं पाहणें । क्रियानिर्णयो ॥ ६३६ ॥ वृत्ति करणें येकवळा । चित्त जावों न देणें फळा । नियमांचिया सांखळा । वाहणें सदा ॥ ६३७ ॥ हा निरोधु साहावयालागीं । धैर्याचिया चांगचांगीं । चिंतवणी जिती आंगीं । वाहे जो कां ॥ ६३८ ॥ आणि आत्मयाचिये आवडी । कर्में करितां वरपडीं । देहसुखाचिये परवडीं । येवों न लाहे ॥ ६३९ ॥ आळसा निद्रा दुऱ्हावे । क्षुधा न बाणवे । सुरवाडु न पावे । आंगाचा ठावो ॥ ६४० ॥ तंव अधिकाधिक । उत्साहो धरी आगळीक । सोनें जैसें पुटीं तुक । तुटलिया कसीं ॥ ६४१ ॥ जरी आवडी आथी साच । तरी जीवितही सलंच । आगीं घालितां रोमांच । देखिजती सतिये । ॥ ६४२ ॥ मा आत्मया येवढीया प्रिया । वालभेला जो धनंजया । देहही सिदतां तया । काय खेदु होईल ? ॥ ६४३ ॥ म्हणौनि विषयसुरवाडु तुटे । जंव जंव देहबुद्धि आटे । तंव तंव आनंदु दुणवटे । कर्मीं जया ॥ ६४४ ॥ ऐसेनि जो कर्म करी । आणि कोणे एके अवसरीं । तें ठाके ऐसी परी । वाहे जरी ॥ ६४५ ॥ तरी कडाडीं लोटला गाडा । तो आपणपें न मनी अवघडा । तैसा ठाकलेनिही थोडा । नोहे जो कां ॥ ६४६ ॥ नातरी आदरिलें । अव्यंग सिद्धी गेलें । तरी तेंही जिंतिलें । मिरवूं नेणें ॥ ६४७ ॥ इया खुणा कर्म करितां । देखिजे जो पंडुसुता । तयातें म्हणिपे तत्त्वतां । सात्विकु कर्ता ॥ ६४८ ॥ आतां राजसा कर्तेया । वोळखणें हें धनंजया । जे अभिलाषा जगाचिया । वसौटा तो ॥ ६४९ ॥
रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः । हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥ २७॥
जैसा गावींचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा । कां स्मशानीं अमंगळा । आघवयांची ॥ ६५० ॥ तया परी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा । पायपाखाळणिया दोषां । घरटा जाला ॥ ६५१ ॥ म्हणौनि फळाचा लागु । देखे जिये असलगु । तिये कर्मीं चांगु । रोहो मांडी ॥ ६५२ ॥ आणि आपण जालिये जोडी । उपखों नेदी कवडी । क्षणक्षणा कुरोंडी । जीवाची करी ॥ ६५३ ॥ कृपणु चित्तीं ठेवा आपुला । तैसा दक्षु पराविया माला । बकु जैसा खुतला । मासेयासी ॥ ६५४ ॥ आणि गोंवी गेलिया जवळी । झगटलिया अंग फाळी । फळें तरी आंतु पोळी । बोरांटी जैसी ॥ ६५५ ॥ तैसें मनें वाचा कायें । भलतया दुःख देतु जाये । स्वार्थु साधितां न पाहे । पराचें हित ॥ ६५६ ॥ तेवींचि आंगें कर्मीं । आचरणें नोहे क्षमी । न निघे मनोधर्मीं । अरोचकु ॥ ६५७ ॥ कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा । तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वें जो ॥ ६५८ ॥ आणि कर्मजात केलिया । फळ लाहे जरी धनंजया । तरी हरिखें जगा यया । वांकुलिया वाये ॥ ६५९ ॥ अथवा जें आदरिलें । हीनफळ होय केलें । तरीं शोकें तेणें जिंतिलें । धिक्कारों लागे ॥ ६६० ॥ कर्मीं राहाटी ऐसी । जयातें होती देखसी । तोचि जाण त्रिशुद्धीसी । राजस कर्ता ॥ ६६१ ॥ आतां यया पाठीं येरु । जो कुकर्माचा आगरु । तोही करूं गोचरु । तामस कर्ता ॥ ६६२ ॥
अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः । विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥ २८॥
तरी मियां लागलिया कैसें । पुढील जळत असे । हें नेणिजे हुताशें । जियापरी ॥ ६६३ ॥ पैं शस्त्रें मियां तिखटें । नेणिजे कैसेनि निवटे । कां नेणिजे काळकूटें । आपुलें केलें ॥ ६६४ ॥ तैसा पुढीलया आपुलया । घातु करीत धनंजया । आदरी वोखटिया । क्रिया जो कां ॥ ६६५ ॥ तिया करितांही वेळीं । काय जालें हें न सांभाळी । चळला वायु वाहटुळी । चेष्टे तैसा ॥ ६६६ ॥ पैं करणिया आणि जया । मेळु नाहीं धनंजया । तो पाहुनी पिसेया । कैंचीं त्राय ? ॥ ६६७ ॥ आणि इंद्रियांचें वोगरिलें । चरोनि राखे जो जियालें । बैलातळीं लागलें । गोचिड जैसें ॥ ६६८ ॥ हांसया रुदना वेळु । नेणतां आदरी बाळु । राहाटे उच्छृंखळु । तयापरी ॥ ६६९ ॥ जो प्रकृती आंतलेपणें । कृत्याकृत्यस्वादु नेणे । फुगे केरें धालेपणें । उकरडा जैसा ॥ ६७० ॥ म्हणौनि मान्याचेनि नांवें । ईश्वराही परी न खालवे । स्तब्धपणें न मनवे । डोंगरासी ॥ ६७१ ॥ आणि मन जयाचें विषकल्लोळीं । राहाटी फुडी चोरिली । दिठी कीर ते वोली । पण्यांगनेची ॥ ६७२ ॥ किंबहुना कपटाचें । देहचि वळिलें तयाचें । तें जिणें कीं जुंवाराचें । टिटेघर ॥ ६७३ ॥ नोहे तयाचा प्रादुर्भावो । तो साभिलाष भिल्लांचा गांवो । म्हणौनि नये येवों जावों । तया वाटा ॥ ६७४ ॥ आणि आणिकांचें निकें केलें । विरु होय जया आलें । जैसें अपेय पया मिनलें । लवण करी ॥ ६७५ ॥ कां हींव ऐसा पदार्थु । घातलिया आगीआंतु । तेचि क्षणीं धडाडितु । अग्नि होय ॥ ६७६ ॥ नाना सुद्रव्यें गोमटीं । जालिया शरीरीं पैठीं । होऊनि ठाती किरीटी । मळुचि जेवीं ॥ ६७७ ॥ तैसें पुढिलाचें बरवें । जयाच्या भीतरीं पावे । आणि विरुद्धचि आघवें । होऊनि निगे ॥ ६७८ ॥ जो गुण घे दे दोख । अमृताचें करी विख । दूध पाजलिया देख । व्याळु जैसा ॥ ६७९ ॥ आणि ऐहिकीं जियावें । जेणें परत्रा साच यावें । तें उचित कृत्य पावे । अवसरीं जिये ॥ ६८० ॥ तेव्हां जया आपैसी । निद्रा ये ठेविली ऐसी । दुर्व्यवहारीं जैसी । विटाळें लोटे ॥ ६८१ ॥ पैं द्राक्षरसा आम्ररसा । वेळे तोंड सडे वायसा । कां डोळे फुटती दिवसा । डुडुळाचे ॥ ६८२ ॥ तैसा कल्याणकाळु पाहे । तैं तयातें आळसु खाये । ना प्रमादीं तरी होये । तो म्हणे तैसें ॥ ६८३ ॥ जेवींचि सागराच्या पोटीं । जळे अखंड आगिठी । तैसा विषादु वाहे गांठीं । जिवाचिये जो ॥ ६८४ ॥ लेंडोराआगीं धूमावधि । कां अपाना आंगीं दुर्गंधि । तैसा जो जीवितावधि । विषादें केला ॥ ६८५ ॥ आणि कल्पांताचिया पारा । वेगळेंही जो वीरा । सूत्र धरी व्यापारा । साभिलाषा ॥ ६८६ ॥ अगा जगाही परौती । शुचा वाहे पैं चित्तीं । करितां विषीं हातीं । तृणही न लगे ॥ ६८७ ॥ ऐसा जो लोकाआंतु । पापपुंजु मूर्तु । देखसी तो अव्याहतु । तामसु कर्ता ॥ ६८८ ॥ एवं कर्म कर्ता ज्ञान । या तिहींचें त्रिधा चिन्ह । दाविलें तुज सुजन । चक्रवर्ती ॥ ६८९ ॥
बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु । प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥ २९॥
आतां अविद्येचिया गांवीं । मोहाची वेढूनि मदवी । संदेहाचीं आघवीं । लेऊनि लेणीं ॥ ६९० ॥ आत्मनिश्चयाची बरव । जया आरिसां पाहे सावयव । तिये बुद्धीचीही धांव । त्रिधा असे ॥ ६९१ ॥ अगा सत्वादि गुणीं इहीं । कायी एक तिहीं ठायीं । न कीजेचि येथ पाहीं । जगामाजीं ॥ ६९२ ॥ आगी न वसतां पोटीं । कवण काष्ठ असे सृष्टीं । तैसें तें कैंचें दृश्यकोटीं । त्रिविध जें नोहे ॥ ६९३ ॥ म्हणौनि तिहीं गुणीं । बुद्धी केली त्रिगुणी । धृतीसिही वांटणी । तैसीचि असे ॥ ६९४ ॥ तेंचि येक वेगळालें । यथा चिन्हीं अळंकारलें । सांगिजैल उपाइलें । भेदलेपणें ॥ ६९५ ॥ परी बुद्धि धृति इयां । दोहीं भागामाजीं धनंंजया । आधीं रूप बुद्धीचिया । भेदासि करूं ॥ ६९६ ॥ तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा । संसारासि गा सुभटा । प्राणियां येतिया वाटा । तिनी आथी ॥ ६९७ ॥ जे अकरणीय काम्य निषिद्ध । ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध । संसारभयें सबाध । जीवां ययां ॥ ६९८ ॥
प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३०॥
म्हणौनि अधिकारें मानिलें । जें विधीचेनि वोघें आलें । तें एकचि येथ भलें । नित्य कर्म ॥ ६९९ ॥ तेंचि आत्मप्राप्ति फळ । दिठी सूनि केवळ । कीजे जैसें कां जळ । सेविजे ताहनें ॥ ७०० ॥ येतुलेनि तें कर्म । सांडी जन्मभय विषम । करूनि दे उगम । मोक्षसिद्धि ॥ ७०१ ॥ ऐसें करी तो भला । संसारभयें सांडिला । करणीयत्वें आला । मुमुक्षुभागा ॥ ७०२ ॥ तेथ जे बुद्धि ऐसा । बळिया बांधे भरंवसा । मोक्षु ठेविला ऐसा । जोडेल येथ ॥ ७०३ ॥ म्हणौनि निवृत्तीची मांडिली । सूनि प्रवृत्तितळीं । इये कर्मीं बुडकुळी । द्यावीं कीं ना ? ॥ ७०४ ॥ तृषार्ता उदकें जिणें । कां पुरीं पडलिया पोहणें । अंधकूपीं गति किरणें । सूर्याचेनि ॥ ७०५ ॥ नाना पथ्येंसीं औषध लाहे । तरी रोगें दाटलाही जिये । का मीना जिव्हाळा होये । जळाचा जरी ॥ ७०६ ॥ तरी तयाच्या जीविता । नाहीं जेवीं अन्यथा । तैसें कर्मीं इये वर्ततां । जोडेचि मोक्षु ॥ ७०७ ॥ हें करणीयाचिया कडे । जें ज्ञान आथी चोखडें । आणि अकरणीय हें फुडें । ऐसें जाण ॥ ७०८ ॥ जीं तिथें काम्यादिकें । संसारभयदायकें । अकृत्यपणाचें आंबुखें । पडिलें जयां ॥ ७०९ ॥ तिये कर्मीं अकार्यीं । जन्ममरणसमयीं । प्रवृत्ति पळवी पायीं । मागिलींचि ॥ ७१० ॥ पैं आगीमाजीं न रिघवे । अथावीं न घालवे । धगधगीत नागवे । शूळ जेवीं ॥ ७११ ॥ कां काळियानाग धुंधुवातु । देखोनि न घालवे हातु । न वचवे खोपेआंतु । वाघाचिये ॥ ७१२ ॥ तैसें कर्म अकरणीय । देखोनि महाभय । उपजे निःसंदेह । बुद्धी जिये ॥ ७१३ ॥ वाढिलें रांधूनि विखें । तेथें जाणिजे मृत्यु न चुके । तेवीं निषेधीं कां देखे । बंधातें जे ॥ ७१४ ॥ मग बंधभयभरितीं । तियें निषिद्धीं प्राप्ती । विनियोगु जाणे निवृत्ती । कर्माचिये ॥ ७१५ ॥ ऐसेनि कार्याकार्यविवेकी । जे प्रवृत्ति निवृत्ति मापकी । खरा कुडा पारखी । जियापरी ॥ ७१६ ॥ तैसी कृत्याकृत्यशुद्धी । बुझे जे निरवधी । सात्विक म्हणिपे बुद्धी । तेचि तूं जाण ॥ ७१७ ॥
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च । अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥ ३१॥
आणि बकाच्या गांवीं । घेपे क्षीरनीर सकलवी । कां अहोरात्रींची गोंवी । आंधळें नेणे ॥ ७१८ ॥ जया फुलाचा मकरंदु फावे । तो काष्ठें कोरूं धांवे । परी भ्रमरपणा नव्हे । अव्हांटा जेवीं ॥ ७१९ ॥ तैसीं इयें कार्याकार्यें । धर्माधर्मरूपें जियें । तियें न चोजवितां जाये । जाणती जे कां ॥ ७२० ॥ अगा डोळांवीण मोतियें । घेतां पाडु मिळे विपायें । न मिळणें तें आहे । ठेविलें तेथें ॥ ७२१ ॥ तैसें अकरणीय अवचटें । नोडवे तरीच लोटे । येऱ्हवीं जाणें एकवटें । दोन्ही जे कां ॥ ७२२ ॥ ते गा बुद्धि चोखविषीं । जाण येथ राजसी । अक्षत टाकिली जैसी । मांदियेवरी ॥ ७२३ ॥
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता । सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ ३२॥
आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडव होये । कां राक्षसां दिवो पाहे । राती होऊनि ॥ ७२४ ॥ नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा । पैं असतें आपणपें जीवा । नाहीं जालें ॥ ७२५ ॥ तैसें धर्मजात तितुकें । जिये बुद्धीसी पातकें । साच तें लटिकें । ऐसेंचि बुझे ॥ ७२६ ॥ ते आघवेचि अर्थ । करूनि घाली अनर्थ । गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी ॥ ७२७ ॥ किंबहुना श्रुतिजातें । अधिष्ठूनि केलें सरतें । तेतुलेंही उपरतें । जाणे जे बुद्धी ॥ ७२८ ॥ ते कोणातेंही न पुसतां । तामसी जाणावी पंडुसुता । रात्री काय धर्मार्था । साच करावी । ॥ ७२९ ॥ एवं बुद्धीचे भेद । तिन्ही तुज विशद । सांगितले स्वबोध\- । कुमुदचंद्रा ॥ ७३० ॥ आतां ययाचि बुद्धिवृत्ती । निष्टंकिला कर्मजातीं । खांदु मांडिजे धृती । त्रिविधा तया ॥ ७३१ ॥ तिये धृतीचेही विभाग । तिन्ही यथालिंग । सांगिजती चांग । अवधान देईं ॥ ७३२ ॥
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः । योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३॥
तरी उदेलिया दिनकरु । चोरीसिं थोके अंधारु । कां राजाज्ञा अव्यवहारु । कुंठवी जेवीं ॥ ७३३ ॥ नाना पवनाचा साटु । वाजीनलिया नीटु । आंगेंसीं बोभाटु । सांडिती मेघ ॥ ७३४ ॥ कां अगस्तीचेनि दर्शनें । सिंधु घेऊनि ठाती मौनें । चंद्रोदयीं कमळवनें । मिठी देती ॥ ७३५ ॥ हें असो पावो उचलिला । मदमुख न ठेविती खालां । गर्जोनि पुढां जाला । सिंहु जरी ॥ ७३६ ॥ तैसा जो धीरु । उठलिया अंतरु । मनादिकें व्यापारु । सांडिती उभीं ॥ ७३७ ॥ इंद्रियां विषयांचिया गांठी । अपैसया सुटती किरीटी । मन मायेच्या पोटीं । रिगती दाही ॥ ७३८ ॥ अधोर्ध्व गूढें काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं ॥ ७३९ ॥ संकल्पविकल्पांचें लुगडे । सांडूनि मन उघडें । बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥ ७४० ॥ ऐसी धैर्यराजें जेणें । मन प्राण करणें । स्वचेष्टांचीं संभाषणें । सांडविजती ॥ ७४१ ॥ मग आघवींचि सडीं । ध्यानाच्या आंतुल्या मढीं । कोंडिजती निरवडी । योगाचिये ॥ ७४२ ॥ परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीं । तंव लांचु न घेतां धृती । धरिजती जिया ॥ ७४३ ॥ ते गा धृती येथें । सात्विक हें निरुतें । आईक अर्जुनातें । श्रीकांतु म्हणे ॥ ७४४ ॥
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन । प्रसण्गेन फलाकाण्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४॥
आणि होऊनियां शरीरी । स्वर्गसंसाराच्या दोहीं घरीं । नांदे जो पोटभरी । त्रिवर्गोपायें ॥ ७४५ ॥ तो मनोरथांच्या सागरीं । धर्मार्थकामांच्या तारुवावरी । जेणें धैर्यबळें करी । क्रिया\-वणिज ॥ ७४६ ॥ जें कर्म भांडवला सूये । तयाची चौगुणी येती पाहे । येवढें सायास साहे । जया धृती ॥ ७४७ ॥ ते गा धृती राजस । पार्था येथ परीयेस । आतां आइक तामस । तिसरी जे कां ॥ ७४८ ॥
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च । न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५॥
तरी सर्वाधमें गुणें । जयाचें कां रूपा येणें । कोळसा काळेपणें । घडला जैसा ॥ ७४९ ॥ अहो प्राकृत आणि हीनु । तयाही कीं गुणत्वाचा मानु । तरी न म्हणिजे पुण्यजनु । राक्षसु काई ?॥ ७५० ॥ पैं ग्रहांमाजीं इंगळु । तयातें म्हणिजे मंगळु । तैसा तमीं धसाळु । गुणशब्दु हा ॥ ७५१ ॥ जे सर्वदोषांचा वसौटा । तमचि कामऊनि सुभटा । उभारिला आंगवठा । जया नराचा ॥ ७५२ ॥ तो आळसु सूनि असे कांखे । म्हणौनि निद्रे कहीं न मुके । पापें पोषितां दुःखें । न सांडिजे जेवीं ॥ ७५३ ॥ आणि देहधनाचिया आवडी । सदा भय तयातें न सांडी । विसंबूं न सके धोंडीं । काठिण्य जैसें ॥ ७५४ ॥ आणि पदार्थजातीं स्नेहो । बांधे म्हणौनि तो शोकें ठावो । केला न शके पाप जावों । कृतघ्नौनि जैसें ॥ ७५५ ॥ आणि असंतोष जीवेंसीं । धरूनि ठेला अहर्निशीं । म्हणौनि मैत्री तेणेंसीं । विषादें केली ॥ ७५६ ॥ लसणातें न सांडी गंधी । कां अपथ्यशीळातें व्याधी । तैसी केली मरणावधी । विषादें तया ॥ ७५७ ॥ आणि वयसा वित्तकामु । ययांचा वाढवी संभ्रमु । म्हणौनि मदें आश्रमु । तोचि केला ॥ ७५८ ॥ आगीतें न सांडी तापु । सळातें जातीचा सापु । कां जगाचा वैरी वासिपु । अखंडु जैसा ॥ ७५९ ॥ नातरी शरीरातें काळु । न विसंबे कवणे वेळु । तैसा आथी अढळु । तामसीं मदु ॥ ७६० ॥ एवं पांचही हे निद्रादिक । तामसाच्या ठाईं दोख । जिया धृती देख । धरिलें आहाती ॥ ७६१ ॥ तिये गा धृती नांवें । तामसी येथ हें जाणावें । म्हणितलें तेणें देवें । जगाचेनी ॥ ७६२ ॥ एवं त्रिविध जे बुद्धि । कीजे कर्मनिश्चयो आधि । तो धृती या सिद्धि । नेइजो येथ ॥ ७६३ ॥ सूर्यें मार्गु गोचरु होये । आणि तो चालती कीर पाये । परी चालणें तें आहे । धैर्यें जेवीं ॥ ७६४ ॥ तैसी बुद्धि कर्मातें दावी । ते करणसामग्री निफजवी । परी निफजावया होआवी । धीरता जे ॥ ७६५ ॥ ते हे गा तुजप्रती । सांगीतली त्रिविध धृती । यया कर्मत्रया निष्पत्ती । जालिया मग ॥ ७६६ ॥ येथ फळ जें एक निफजे । सुख जयातें म्हणिजे । तेंही त्रिविध जाणिजे । कर्मवशें ॥ ७६७ ॥ तरी फळरूप तें सुख । त्रिगुणीं भेदलें देख । विवंचूं आतां चोख । चोखीं बोलीं ॥ ७६८ ॥ परी चोखी ते कैसी सांगे । पैं घेवों जातां बोलबगें । कानींचियेही लागे । हातींचा मळु ॥ ७६९ ॥ म्हणौनि जयाचेनि अव्हेरें । अवधानही होय बाहिरें । तेणें आइक हो आंतरें । जीवाचेनि जीवें ॥ ७७० ॥ ऐसें म्हणौनि देवो । त्रिविधा सुखाचा प्रस्तावो । मांडला तो निर्वाहो । निरूपित असें ॥ ७७१ ॥
सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ । अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ ३६॥
म्हणे सुखत्रयसंज्ञा । सांगों म्हणौनि प्रतिज्ञा । बोलिलों तें प्राज्ञा । ऐक आतां ॥ ७७२ ॥ तरी सुख तें गा किरीटी । दाविजेल तुज दिठी । जें आत्मयाचिये भेटी । जीवासि होय ॥ ७७३ ॥ परी मात्रेचेनि मापें । दिव्यौषध जैसें घेपें । कां कथिलाचें कीजे रुपें । रसभावनीं ॥ ७७४ ॥ नाना लवणाचें जळु । होआवया दोनि चार वेळु । देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचें जेवीं ॥ ७७५ ॥ तेवीं जालेनि सुखलेशें । जीवु भाविलिया अभ्यासें । जीवपणाचें नासे । दुःख जेथें ॥ ७७६ ॥ तें येथ आत्मसुख । जालें असे त्रिगुणात्मक । तेंही सांगों एकैक । रूप आतां ॥ ७७७ ॥
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् । तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ ३७॥
आतां चंदनाचें बूड । सर्पी जैसें दुवाड । कां निधानाचें तोंड । विवसिया जेवीं ॥ ७७८ ॥ अगा स्वर्गींचें गोमटें । आडव यागसंकटें । कां बाळपण दासटें । त्रासकाळें ॥ ७७९ ॥ हें असो दीपाचिये सिद्धी । अवघड धू आधीं । नातरी तो औषधीं । जिभेचा ठावो ॥ ७८० ॥ तयापरी पांडवा । जया सुखाचा रिगावा । विषम तेथ मेळावा । यमदमांचा ॥ ७८१ ॥ देत सर्वस्नेहा मिठी । आगीं ऐसें वैराग्य उठी । स्वर्ग संसारा कांटी । काढितचि ॥ ७८२ ॥ विवेकश्रवणें खरपुसें । जेथ व्रताचरणें कर्कशें । करितां जाती भोकसे । बुद्ध्यादिकांचे ॥ ७८३ ॥ सुषुम्नेचेनि तोंडें । गिळिजे प्राणापानाचे लोंढे । बोहणियेसीचि येवढें । भारी जेथ ॥ ७८४ ॥ जें सारसांही विघडतां । होय वोहाहूनि वस्त काढितां । ना भणंगु दवडितां । भाणयावरुनी ॥ ७८५ ॥ पैं मायेपुढौनि बाळक । काळें नेतां एकुलतें एक । होय कां उदक । तुटतां मीना ॥ ७८६ ॥ तैसें विषयांचें घर । इंद्रियां सांडितां थोर । युगांतु होय तें वीर । विराग साहाती ॥ ७८७ ॥ ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु । मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा ॥ ७८८ ॥ पहिलया वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा । तरी ज्ञानामृतें सोहळा । पाहे जेथें ॥ ७८९ ॥ पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचें हिरवेपण असे । तें परीपाकीं कां जैसें । माधुर्य आते ॥ ७९० ॥ तें वैराग्यादिक तैसें । पिकलिया आत्मप्रकाशें । मग वैराग्येंसींही नाशे । अविद्याजात ॥ ७९१ ॥ तेव्हां सागरीं गंगा जैसी । आत्मीं मीनल्या बुद्धि तैसी । अद्वयानंदाची आपैसी । खाणी उघडे ॥ ७९२ ॥ ऐसें स्वानुभवविश्रामें । वैराग्यमूळ जें परिणमे । तें सात्विक येणें नामें । बोलिजे सुख ॥ ७९३ ॥
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम् । परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥ ३८॥
आणि विषयेंद्रियां । मेळु होतां धनंजया । जें सुख जाय थडिया । सांडूनि दोन्ही ॥ ७९४ ॥ अधिकारिया रिगतां गांवो । होय जैसा उत्साहो । कां रिणावरी विवाहो । विस्तारिला ॥ ७९५ ॥ नाना रोगिया जिभेपासीं । केळें गोड साखरेसीं । कां बचनागाची जैसी । मधुरता पहिली ॥ ७९६ ॥ पहिलें संवचोराचें मैत्र । हाटभेटीचें कलत्र । कां लाघवियाचे विचित्र । विनोद ते ॥ ७९७ ॥ तैसें विषयेंद्रियदोखीं । जें सुख जीवातें पोखी । मग उपडिला खडकीं । हंसु जैसा ॥ ७९८ ॥ तैसी जोडी आघवी आटे । जीविताचा ठाय फिटे । सुकृताचियाही सुटे । धनाची गांठी ॥ ७९९ ॥ आणिक भोगिलें जें कांहीं । तें स्वप्न तैसें होय नाहीं । मग हानीच्याचि घाईं । लोळावें उरे ॥ ८०० ॥ ऐसें आपत्ती जें सुख । ऐहिकीं परिणमे देख । परत्रीं कीर विख । होऊनि परते ॥ ८०१ ॥ जे इंद्रियजाता लळा । दिधलिया धर्माचा मळा । जाळूनि भोगिजे सोहळा । विषयांचा जेथ ॥ ८०२ ॥ तेथ पातकें बांधिती थावो । तियें नरकीं देती ठावो । जेणें सुखें हा अपावो । परत्रीं ऐसा ॥ ८०३ ॥ पैं नामें विष महुरें । परी मारूनि अंतीं खरें । तैसें आदि जें गोडिरें । अंतीं कडू ॥ ८०४ ॥ पार्था तें सुख साचें । वळिलें आहे रजाचें । म्हणौनि न शिवें तयाचें । आंग कहीं ॥ ८०५ ॥
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः । निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥ ३९॥
आणि अपेयाचेनि पानें । अखाद्याचेनि भोजनें । स्वैरस्त्रीसंनिधानें । होय जें सुख ॥ ८०६ ॥ का पुढिलांचेनि मारें । नातरी परस्वापहारें । जें सुख अवतरे । भाटाच्या बोलीं ॥ ८०७ ॥ जें आलस्यावरी पोखिजे । निद्रेमाजीं जें देखिजे । जयाच्या आद्यंतीं भुलिजे । आपुली वाट ॥ ८०८ ॥ तें गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा । हें बहु न सांगोंचि जें कथा । असंभाव्य हे ॥ ८०९ ॥ ऐसें कर्मभेदें मुदलें । फळसुखही त्रिधा जालें । तें हें यथागमें केलें । गोचर तुज ॥ ८१० ॥ ते कर्ता कर्म कर्मफळ । ये त्रिपुटी येकी केवळ । वांचूनि कांहींचि नसे स्थूल । सूक्ष्मीं इये ॥ ८११ ॥ आणि हे तंव त्रिपुटी । तिहीं गुणीं इहीं किरीटी । गुंफिली असे पटीं । तांतुवीं जैसी ॥ ८१२ ॥
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः । सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ ४०॥
म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकीं । न बंधिजे इहीं सत्वादिकीं । तैसी स्वर्गीं ना मृत्युलोकीं । आथी वस्तु ॥ ८१३ ॥ कैंचा लोंवेवीण कांबळा । मातियेवीण मोदळा । का जळेंवीण कल्लोळा । होणें आहे ? ॥ ८१४ ॥ तैसें न होनि गुणाचें । सृष्टीची रचना रचे । ऐसें नाहींचि गा साचें । प्राणिजात ॥ ८१५ ॥ यालागीं हें सकळ । तिहीं गुणांचेंचि केवळ । घडलें आहे निखिळ । ऐसें जाण ॥ ८१६ ॥ गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं त्रिपुटी पाडिली । चतुर्वर्णा घातली । सिनानीं उळिगें ॥ ८१७ ॥
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप । कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥ ४१॥
तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण । तरी जयां मुख्य ब्राह्मण । धुरेचे कां ॥ ८१८ ॥ येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी । जे ते वैदिकविधानीं । योग्य म्हणौनि ॥ ८१९ ॥ चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया । तऱ्हीं वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ॥ ८२० ॥ तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिकां । शूद्रही कीं देखा । चौथा जाला ॥ ८२१ ॥ जैसा फुलाचेनि सांगातें । तांतुं तुरंबिजे श्रीमंतें । तैसें द्विजसंगें शूद्रातें । स्वीकारी श्रुती ॥ ८२२ ॥ ऐसैसी गा पार्था । हे चतुर्वर्णव्यवस्था । करूं आतां कर्मपथा । यांचिया रूपा ॥ ८२३ ॥ जिहीं गुणीं ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरी । चुकोनियां ईश्वरीं । पैठे होती ॥ ८२४ ॥ जिये आत्मप्रकृतीचे इहीं । गुणीं सत्त्वादिकीं तिहीं । कर्में चौघां चहूं ठाईं । वांटिलीं वर्णा ॥ ८२५ ॥ जैसें बापें जोडिलें लेंका । वांटिलें सूर्यें मार्ग पांथिका । नाना व्यापार सेवकां । स्वामी जैसें ॥ ८२६ ॥ तैसी प्रकृतीच्या गुणीं । जया कर्माची वेल्हावणी । केली आहे वर्णीं । चहूं इहीं ॥ ८२७ ॥ तेथ सत्त्वें आपल्या आंगीं । समीन\-निमीन भागीं । दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय ॥ ८२८ ॥ आणि रज परी सात्त्विक । तेथ ठेविलें वैश्य लोक । रजचि तमभेसक । तेथ शूद्र ते गा ॥ ८२९ ॥ ऐसा येकाचि प्राणिवृंदा । भेदु चतुर्वर्णधा । गुणींचि प्रबुद्धा । केला जाण ॥ ८३० ॥ मग आपुलें ठेविलें जैसें । आइतेंचि दीपें दिसे । गुणभिन्न कर्म तैसें । शास्त्र दावी ॥ ८३१ ॥ तेंचि आतां कोण कोण । वर्णविहिताचें लक्षण । हें सांगों ऐक श्रवण\- । सौभाग्यनिधी ॥ ८३२ ॥
शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च । ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥ ४२॥
तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती । घेऊनि आपुल्या हातीं । बुद्धि आत्मया मिळे येकांतीं । प्रिया जैसी ॥ ८३३ ॥ ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु । तो गुण गा उपक्रमु । जया कर्माचा ॥ ८३४ ॥ आणि बाह्येंद्रियांचें धेंडें । पिटूनि विधीचेनि दंडें । नेदिजे अधर्माकडे । कहींचि जावों ॥ ८३५ ॥ तो पैं गा शमा विरजा । दमु गुण जेथ दुजा । आणि स्वधर्माचिया वोजा । जिणें जें कां ॥ ८३६ ॥ सटवीचिये रातीं । न विसंबिजे जेवीं वाती । तैसा ईश्वरनिर्णयो चित्तीं । वाहणें सदा ॥ ८३७ ॥ तया नाम तप । ते तिजया गुणाचें रूप । आणि शौचही निष्पाप । द्विविध जेथ ॥ ८३८ ॥ मन भावशुद्धी भरलें । आंग क्रिया अळंकारिलें । ऐसें सबाह्य जियालें । साजिरें जें कां ॥ ८३९ ॥ तया नाम शौच पार्था । तो कर्मीं गुण जये चौथा । आणि पृथ्वीचिया परी सर्वथा । सर्व जें साहाणें ॥ ८४० ॥ ते गा क्षमा पांडवा । गुण जेथ पांचवा । स्वरांमाजीं सुहावा । पंचमु जैसा ॥ ८४१ ॥ आणि वांकडेनी वोघेंसीं । गंगा वाहे उजूचि जैसी । कां पुटीं वळला ऊसीं । गोडी जैसी ॥ ८४२ ॥ तैसा विषमांही जीवां- । लागीं उजुकारु बरवा । तें आर्जव गा साहावा । जेथींचा गुण ॥ ८४३ ॥ आणि पाणियें प्रयत्नें माळी । अखंड जचे झाडामुळीं । परी तें आघवेंचि फळीं । जाणे जेवीं ॥ ८४४ ॥ तैसें शास्त्राचारें तेणें । ईश्वरुचि येकु पावणें । हें फुडें जें कां जाणणें । तें येथ ज्ञान ॥ ८४५ ॥ तें गा कर्मीं जिये । सातवा गुण होये । आणि विज्ञान हें पाहें । एवंरूप ॥ ८४६ ॥ तरी सत्वशुद्धीचिये वेळे । शास्त्रें कां ध्यानबळें । ईश्वरतत्त्वींचि मिळे । निष्टंकबुद्धी ॥ ८४७ ॥ हें विज्ञान बरवें । गुणरत्न जेथ आठवें । आणि आस्तिक्य जाणावें । नववा गुण ॥ ८४८ ॥ पैं राजमुद्रा आथिलिया । प्रजा भजे भलतया । तेवीं शास्त्रें स्वीकारिलिया । मार्गमात्रातें ॥ ८४९ ॥ आदरें जें कां मानणें । तें आस्तिक्य मी म्हणें । तो नववा गुण जेणें । कर्म तें साच ॥ ८५० ॥ एवं नवही शमादिक । गुण जेथ निर्दोख । तें कर्म जाण स्वाभाविक । ब्राह्मणाचें ॥ ८५१ ॥ तो नवगुणरत्नाकरु । यया नवरत्नांचा हारु । न फेडीत ले दिनकरु । प्रकाशु जैसा ॥ ८५२ ॥ नाना चांपा चांपौळी पूजिला । चंद्रु चंद्रिका धवळला । कां चंदनु निजें चर्चिला । सौरभ्यें जेवीं ॥ ८५३ ॥ तेवीं नवगुणटिकलग । लेणें ब्राह्मणाचें अव्यंग । कहींचि न संडी आंग । ब्राह्मणाचें ॥ ८५४ ॥ आतां उचित जें क्षत्रिया । तेंहीं कर्म धनंजया । सांगों ऐक प्रज्ञेचिया । भरोवरी ॥ ८५५ ॥
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् । दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥ ४३॥
तरी भानु हा तेजें । नापेक्षी जेवीं विरजे । कां सिंहें न पाहिजे । जावळिया ॥ ८५६ ॥ ऐसा स्वयंभ जो जीवें लाठु । सावायेंवीण उद्भटु । ते शौर्य गा जेथ श्रेष्ठु । पहिला गुण ॥ ८५७ ॥ आणि सूर्याचेनि प्रतापें । कोडिही नक्षत्र हारपे । ना तो तरी न लोपे । सचंद्रीं तिहीं ॥ ८५८ ॥ तैसेनि आपुले प्रौढीगुणें । जगा या विस्मयो देणें । आपण तरी न क्षोभणें । कायसेनही ॥ ८५९ ॥ तें प्रागल्भ्यरूप तेजा । जिये कर्मीं गुण दुजा । आणि धीरु तो तिजा । जेथींचा गुण ॥ ८६० ॥ वरिपडलिया आकाश । बुद्धीचे डोळे मानस । झांकी ना ते परीयेस । धैर्य जेथें ॥ ८६१ ॥ आणि पाणी हो कां भलतेतुकें । परी तें जिणौनि पद्म फांके । कां आकाश उंचिया जिंके । आवडे तयातें ॥ ८६२ ॥ तेवीं विविध अवस्था । पातलिया जिणौनि पार्था । प्रज्ञाफळ तया अर्था । वेझ देणें जें ॥ ८६३ ॥ तें दक्षत्व गा चोख । जेथ चौथा गुण देख । आणि झुंज अलौकिक । तो पांचवा गुण ॥ ८६४ ॥ आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे । तेवीं समोर शत्रूपुढें । होणें जें कां ॥ ८६५ ॥ माहेवणी प्रयत्नेंसी । चुकविजे सेजे जैसी । रिपू पाठी नेदिजे तैसी । समरांगणीं ॥ ८६६ ॥ हा क्षत्रियाचेया आचारीं । पांचवा गुणेंद्रु अवधारीं । चहूं पुरुषार्थां शिरीं । भक्ति जैसी ॥ ८६७ ॥ आणि जालेनि फुलें फळें । शाखिया जैसीं मोकळे । कां उदार परीमळें । पद्माकरु ॥ ८६८ ॥ नाना आवडीचेनि मापें । चांदिणें भलतेणें घेपे । पुढिलांचेनि संकल्पें । तैसें जें देणें ॥ ८६९ ॥ तें उमप गा दान । जेथ सहावें गुणरत्न । आणि आज्ञे एकायतन । होणें जें कां ॥ ८७० ॥ पोषूनि अवयव आपुले । करविजतीं मानविले । तेवीं पालणें लोभविलें । जग जें भोगणें ॥ ८७१ ॥ तया नाम ईश्वरभावो । जो सर्वसामर्थ्याचा ठावो । तो गुणांमाजीं रावो । सातवा जेथ ॥ ८७२ ॥ ऐसें जें शौर्यादिकीं । इहीं सात गुणविशेखीं । अळंकृत सप्तऋखीं । आकाश जैसें ॥ ८७३ ॥ तैसें सप्तगुणीं विचित्र । कर्म जें जगीं पवित्र । तें सहज जाण क्षात्र । क्षत्रियाचें ॥ ८७४ ॥ नाना क्षत्रिय नव्हे नरु । तो सत्त्वसोनयाचा मेरु । म्हणौनि गुणस्वर्गां आधारु । सातां इयां ॥ ८७५ ॥ नातरी सप्तगुणार्णवीं । परीवारली बरवी । हे क्रिया नव्हे पृथ्वी । भोगीतसे तो ॥ ८७६ ॥ कां गुणांचे सातांही ओघीं । हे क्रिया ते गंगा जगीं । तया महोदधीचिया आंगीं । विलसे जैसी ॥ ८७७ ॥ परी हें बहु असो देख । शौर्यादि गुणात्मक । कर्म गा नैसर्गिक । क्षात्रजातीसी ॥ ८७८ ॥ आतां वैश्याचिये जाती । उचित जे महामती । ते ऐकें गा निरुती । क्रिया सांगों ॥ ८७९ ॥
कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् । परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥ ४४॥
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलाचा आधारु । घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें ॥ ८८० ॥ किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें । कां समर्घीची विकणें । महर्घीवस्तु ॥ ८८१ ॥ येतुलाचि पांडवा । वैश्यातें कर्माचा मेळावा । हा वैश्यजातीस्वभावा । आंतुला जाण ॥ ८८२ ॥ आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्में तिन्ही वर्ण । ययांचें जें शुश्रूषण । तें शूद्रकर्म ॥ ८८३ ॥ पैं द्विजसेवेपरौतें । धांवणें नाहीं शूद्रातें । एवं चतुर्वर्णोचितें । दाविलीं कर्में ॥ ८८४ ॥
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः । स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥ ४५॥
आतां इयेचि विचक्षणा । वेगळालिया वर्णा । उचित जैसें करणां । शब्दादिक ॥ ८८५ ॥ नातरी जळदच्युता । पाणिया उचित सरिता । सरितेसी पंडुसुता । सिंधु उचितु ॥ ८८६ ॥ तैसें वर्णाश्रमवशें । जें करणीय आलें असे । गोरेया आंगा जैसें । गोरेपण ॥ ८८७ ॥ तया स्वभावविहिता कर्मा । शास्त्राचेनि मुखें वीरोत्तमा । प्रवर्तावयालागीं प्रमा । अढळ कीजे ॥ ८८८ ॥ पैं आपुलेंचि रत्न थितें । घेपे पारखियाचेनि हातें । तैसें स्वकर्म आपैतें । शास्त्रें करावीं ॥ ८८९ ॥ जैसी दिठी असे आपुलिया ठायीं । परी दीपेंवीण भोग नाहीं । मार्गु न लाहतां काई । पाय असतां होय ? ॥ ८९० ॥ म्हणौनि ज्ञातिवशें साचारु । सहज असे जो अधिकारु । तो आपुलिया शास्त्रें गोचरु । आपण कीजे ॥ ८९१ ॥ मग घरींचाचि ठेवा । जेवीं डोळ्यां दावी दिवा । तरी घेतां काय पांडवा । आडळु असे ? ॥ ८९२ ॥ तैसें स्वभावें भागा आलें । वरी शास्त्रें खरें केलें । तें विहित जो आपुलें । आचरे गा ॥ ८९३ ॥ परी आळसु सांडुनी । फळकाम दवडुनी । आंगें जीवें मांडुनी । तेथेंचि भरु ॥ ८९४ ॥ वोघीं पडिलें पाणी । नेणें आनानी वाहणी । तैसा जाय आचरणीं । व्यवस्थौनी ॥ ८९५ ॥ अर्जुना जो यापरी । तें विहित कर्म स्वयें करी । तो मोक्षाच्या ऐलद्वारीं । पैठा होय ॥ ८९६ ॥ जे अकरणा आणि निषिद्धा । न वचेचि कांहीं संबंधा । म्हणौनि भवा विरुद्धा । मुकला तो ॥ ८९७ ॥ आणि काम्यकर्मांकडे । न परतेचि जेथ कोडें । तेथ चंदनाचेही खोडे । न लेचि तो ॥ ८९८ ॥ येर नित्य कर्म तंव । फळत्यागें वेंचिलें सर्व । म्हणौनि मोक्षाची शींव । ठाकूं लाहे ॥ ८९९ ॥ ऐसेनि शुभाशुभीं संसारीं । सांडिला तो अवधारीं । वौराग्यमोक्षद्वारीं । उभा ठाके ॥ ९०० ॥ जें सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जें प्रमा । नाना कर्ममार्गश्रमा । शेवटु जेथ ॥ ९०१ ॥ मोक्षफळें दिधली वोल । जें सुकृततरूचें फूल । तयें वैराग्यीं ठेवी पाऊल । भंवरु जैसा ॥ ९०२ ॥ पाहीं आत्मज्ञानसुदिनाचा । वाधावा सांगतया अरुणाचा । उदयो त्या वैराग्याचा । ठावो पावे ॥ ९०३ ॥ किंबहुना आत्मज्ञान । जेणें हाता ये निधान । तें वैराग्य दिव्यांजन । जीवें ले तो ॥ ९०४ ॥ ऐसी मोक्षाची योग्यता । सिद्धी जाय तया पंडुसुता । अनुसरोनि विहिता । कर्मा यया ॥ ९०५ ॥ हें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा । आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ॥ ९०६ ॥ पैं आघवाचि भोगेंसीं । पतिव्रता क्रीडे प्रियेंसीं । कीं तयाचीं नामें जैसीं । तपें तियां केलीं ॥ ९०७ ॥ कां बाळका एकी माये । वांचोनि जिणें काय आहे । म्हणौनि सेविजे कीं तो होये । पाटाचा धर्मु ॥ ९०८ ॥ नाना पाणी म्हणौनि मासा । गंगा न सांडितां जैसा । सर्व तीर्थ सहवासा । वरपडा जाला ॥ ९०९ ॥ तैसें आपुलिया विहिता । उपावो असे न विसंबितां । ऐसा कीजे कीं जगन्नाथा । आभारु पडे ॥ ९१० ॥ अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत । म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेचि तो ॥ ९११ ॥ पैं जीवाचे कसीं उतरली । ते दासी कीं गोसावीण जाली । सिसे वेंचि तया मविली । वही जेवीं ॥ ९१२ ॥ तैसें स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा । येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें ॥ ९१३ ॥